Thursday, July 16

हुरहूर

आभाळ वाहते ... झरझर झरझर
पाणी तटाटते ... भरभर भरभर
खळखळे तुडुम्ब .. निर्झर निर्झर
मनात नभाचे ... काहूर काहूर
दिठीला बावरी ... हुरहूर हुरहूर
ओठांशी नाजुक ... थरथर थरथर
मन कोणासाठी ... अधीर अधीर ?
भेटीची आस ही ... अनिवार अनिवार ?

Tuesday, July 7

विरहाच्या कविता

विरहाच्या कविता
१.
मी नसताना तुझ्या जगाला खंतही नाही कशी तीळभर ?
तुझ्याविना अन् माझ्या हृदयी क्षणक्षण माजत असह्य थरथर...
कुठली गाणी आणि विराणी, तू नसताना गातो मी?
अर्थांसाठी शब्दांभवती स्वर-तालाची नुसती भिर-भिर !
ऊन-चांदणे, जल-रंगही हे, फिके-फिके बघ तू जाता ..
रंग वाहता एक जिव्हारी तूच दिलेला अखंड झर-झर !
माझे असणे नसणे आता तुझ्या नसू दे गणतीला ..
जन्मांची पण सुटण्या गणिते तुझी वजावट नकोच क्षणभर !
२.
चुकलो का, ते सांग ना ? मी तुला भेटून गं ?
मिटलो का अन्, सांग ना ? जाता तू निघून गं ?
या मनाचे या जगाशी काय नाते सांग ना ?
मिळतो का ते सांग ना ? जन्मही मागून गं ?
भिन्न धागे मी न् तू , तरी एक नक्षी का दिसे ?
कोण गेले सांग, असले वस्त्र हे विणून गं ?
सांज पक्षी का उडाले ? का बुडाला सूर्य अन् ?
चांदणे का सांग, माझे मन असे विखरून गं ?
3.
तू किती जाशील दूर ?
मी तुला हृदयात माझ्या कोंडलेले !
हे तुला माहीत असुनी,
टाळण्याचे,
काय हे तू मांडलेले ?
मी तुला दिसता अता
का वळविशी नजरेस तू ?
मग किनारी पापण्यांच्या
आर्त ओले थेंब
का ते थांबलेले ?
साद ऐकूनही मला
प्रतिसादही तू ना दिला ..
ओठ दातांनी दटावून,
नाव माझे
का असे मग दाबलेले ?
मीच आता खोडतो प्रतिमा तुझी,
टाळायला हे टाळणे ...
अंतरी पण खोलवर,
अस्तित्व हे तुझेच अवघे गोंदलेले !

Friday, July 3

हे आभाळा !

दाटलेल्या डोळ्यांनी तू पाहिलेस माझ्याकडे हे आभाळा,
तेव्हा माझ्या लाचार डोळ्यातून वाहू लागले अश्रू ...
तूही पाठवलेस पाण्याचे काही थेम्ब ..
जे मी झेलले माझ्या हातात ...
माझ्या हातात एक संगम ...
माझे अश्रू नि तुझे पाणी यांचा संगम !

दाटलेल्या डोळ्यांनी तू पाहिलेस माझ्याकडे हे आभाळा,
तेव्हा मी तुझ्याकडे पाहणे सोडून देणार होतो ...
पण त्याने काय होणार ..?
मी तुझ्याकडेच पाहावे लागते ..
तू तुझी ही काळी माया देत नाहीस तोवर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे?

हे काळे छत्र काढून घेऊ नकोस .. हे आभाळा !

अखेर ...

अखेर आला कृष्णाच्या मुरलीचा सांगावा
अखेर आली पश्चिम-गंधित शीतल मंद हवा !


अखेर दाटी-वाटीने जमले हे मेघ किती ..
आर्द्र क्षणानी अखेर भिजली रणरणती माती !


दान भुईवर अखेर सरसर सरसर धावून आले
मनामधे आनंदाचे मग भरभर भरते आले


बघत राहिलो सरी-वर-सरी येऊन-जाऊन
'पहिले भिजणे' अखेर माझे गेले राहून !

Wednesday, July 1

प्राक्तनाचे दान ... ?

कोरड्या मातीस आता स्वप्न थेम्बांचे पडावे ..
स्वेद-गंगेने नवे आयुष्य या बीजास द्यावे !

या निळया भट्टित जळतो सूर्य नावाचा निखारा !
कृष्ण मेघांआड़ त्याने एकदा आता विझावे !

माणसाची आजच्या ही ऊर्ध्वगामी दृष्टी का ?
दान त्याला प्राक्तनाचे या नभाने आज द्यावे !