Tuesday, July 7

विरहाच्या कविता

विरहाच्या कविता
१.
मी नसताना तुझ्या जगाला खंतही नाही कशी तीळभर ?
तुझ्याविना अन् माझ्या हृदयी क्षणक्षण माजत असह्य थरथर...
कुठली गाणी आणि विराणी, तू नसताना गातो मी?
अर्थांसाठी शब्दांभवती स्वर-तालाची नुसती भिर-भिर !
ऊन-चांदणे, जल-रंगही हे, फिके-फिके बघ तू जाता ..
रंग वाहता एक जिव्हारी तूच दिलेला अखंड झर-झर !
माझे असणे नसणे आता तुझ्या नसू दे गणतीला ..
जन्मांची पण सुटण्या गणिते तुझी वजावट नकोच क्षणभर !
२.
चुकलो का, ते सांग ना ? मी तुला भेटून गं ?
मिटलो का अन्, सांग ना ? जाता तू निघून गं ?
या मनाचे या जगाशी काय नाते सांग ना ?
मिळतो का ते सांग ना ? जन्मही मागून गं ?
भिन्न धागे मी न् तू , तरी एक नक्षी का दिसे ?
कोण गेले सांग, असले वस्त्र हे विणून गं ?
सांज पक्षी का उडाले ? का बुडाला सूर्य अन् ?
चांदणे का सांग, माझे मन असे विखरून गं ?
3.
तू किती जाशील दूर ?
मी तुला हृदयात माझ्या कोंडलेले !
हे तुला माहीत असुनी,
टाळण्याचे,
काय हे तू मांडलेले ?
मी तुला दिसता अता
का वळविशी नजरेस तू ?
मग किनारी पापण्यांच्या
आर्त ओले थेंब
का ते थांबलेले ?
साद ऐकूनही मला
प्रतिसादही तू ना दिला ..
ओठ दातांनी दटावून,
नाव माझे
का असे मग दाबलेले ?
मीच आता खोडतो प्रतिमा तुझी,
टाळायला हे टाळणे ...
अंतरी पण खोलवर,
अस्तित्व हे तुझेच अवघे गोंदलेले !

No comments: