Thursday, September 28

हायवे

या हायवेला पूर येतो
वेगाचा
विजिगिषेचा
माणसांच्या ऐहिक स्वप्नांचा
या देशाच्या
प्रगतीचे म्हणून जे जे
आलेख काढले जातात
त्यामध्ये हा पूर प्रकटतो
वेगवेगळ्या रेघा, स्तंभ आणि आलेखांच्या
सुबक रूपांमध्ये
मात्र
त्यात कुठेही दिसत अथवा
प्रकटत नाहीत
या हायवेवर
नित्यनियमाने
प्रकटणाऱ्या
मृत प्राण्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या
लाल रंगाचे हे आलेख
फक्त हायवेवरचे जागृत प्रवासी
पाहू शकतात
एखाद्या
देशाच्या प्रगतीत तसंही
वेगपुढे मरणाऱ्यांना
स्थानच कुठे असतं ?
हायवेवर, हायवेच्या बाजूच्या जमिनीत
असंख्य
खिजगणतीत
नसलेल्या देहांच्या
चामड्याची निशाणं
फडकतात
प्रगतीचा झेंडा आणखी आणखी
उंचावत नेणाऱ्या
भरधाव वाहनांच्या वाऱ्यावर !

Wednesday, September 20

मेख

तुझ्या माफीमधेही एक छोटी मेख आहे
तुझ्या शब्दांमधे तिरक्या दिशेची फेक आहे

मला सांगायचे तुजला किती होते तरीही
तुझ्यामाझ्यामधे ही आखलेली रेघ आहे

असे खोटेखुटे जगता जरी धादांत येते
खरे असण्यातही बघ काहिसा आवेग आहे

गरज असते कुणा एका-दुजाला साहण्याची?
जगाला टाळण्यासाठी जिण्याला वेग आहे

कसे शब्दांत समजांचे विषारी बाण लपले?
कसे नाते बळी पडते इथे एकेक आहे?

जगायाला पुरे नुसतेच डोळ्यांचे किनारे
जरासे खोल तेथे भावना उद्रेक आहे

कसे?

मी ऐकत असता गाणी
तू वाऱ्यावर म्हटलेली
हरवला कुठेसा चंद्र
क्षितिजाच्या वरती खाली !

घुमणाऱ्या गाभाऱ्याचा
अस्फुटसा थर्थर ऊर
मी निरांजनाने विझलो
रात्रीच्या गर्द कुशीत !

दंवभाराने ओलेती
होता ही वेडी बाग
अरुणाचे रक्तिम डोळां
अन् कसे उतरले माझ्या ?

हे तुझेच काही कांही
माझ्या विश्वीं उमटेल
अन् नेणिवेतुनी गात्री
मी रोज असा बहरेन !

Wednesday, July 5

जीवना


जीवना वाटते तुझीच भिती
हाय माझ्या विरुद्ध तूच किती !

काय माझी मजाल सांग अता?
लीन मरणापुढ्यात तूच किती?

मी उभा राहतो पुन्हा फिरुनी
हाय मिळतोस तू धुळीस किती !

एक दूज्यास मारते दुनिया
सोबती तू तरी खराच किती?

श्वास माझा बुलंद आजवरी
पावलोपावली भितोस किती?

थांब थोडे, नको भिऊ आता
की तसेही उरून त्रास किती?

Saturday, December 3

नवा ईसीजी


काळजाचे ठोके
चुकत चुकत
नवा ईसीजी तयार झालाय
एक
अतिसंवेदनशील
सतत हलता
तीक्ष्ण
आणि
जोरात ओढलेल्या रेघांचा
ईसीजी !
तो रेकॉर्ड करता येत नाही
कारण साध्यासुध्या ईसीजीमशीनला
इतक्या जोरात सुई त्यावर फिरलेली
सहन नाही होणार
शिवाय या ईसीजीची रेघही
सतत कंपायमान
भूकंप नोंदणाऱ्या रेषेसारखी ..
ईसीजीचा कागद होऊन जाईल
अगदी चोळामोळा !
शब्दांचे कावे, योजनांमधले बारकावे
राजकीय ताल, कौटुंबिक ताण
धर्माचं स्थान, जातीचं भान
आपली ढळती पत, ज्याचं त्याचं मत
मेसेजचं व्हायब्रेशन, डेबिटचं नोटिफिकेशन
ब्लडचं प्रेशर, कोणाचं फ्रेंडली जेश्चर
ट्रॅफिक जॅम, फोनची रॅम
जिथेतिथे रांग, यशाची सारखीच टांग
दुकानांची झगमग, दुपारची वाढती भकभक
कर्जाचे डोंगर, खर्चांचे लोंगर
लिपिड प्रोफाइल, लाईफस्टाइल

टीव्हीवर दिसणारी कचकडी नृत्यं
ओळखीतल्या लोकांची आगळीवेगळी कृत्यं
सुमार गोष्टींचा गवगवा
फुफुसातली हवाबिवा

सगळंच जातंय नोंदवलं
रेकॉर्ड न होऊ शकणाऱ्या
या ईसीजीमध्ये
हृदय कसंबसं का होईना
चालत राहिलंय
याचं बरं वाटत राहील
पण
काहीतरी फाटत राहील
आतमध्ये
खोलखोल
सतत
कुठेही रेकॉर्ड न होता !

Sunday, August 28

ही छाती फुटेल की काय ?


माझा देश हा ‘माझी छाती फुटेल की काय?’ या प्रश्नाचं कारण होऊन बसला आहे.

मला थक्क करणाऱ्या कितीतरी नवनव्या प्रथांमुळे एकीकडे मी अवाक् होत असलो, तरी विलक्षण आश्चर्यचकित मानसिक स्थितीमधून मला अतिशय अपूर्व वाटत आहे. ज्या ज्या प्रथा, ज्या ज्या रितीभातींची कशाशीही तुलना होऊ शकत नाही त्यांच्याबद्दल ; त्या केवळ या देशातच निर्माण होऊ शकतात, पोसल्या जाऊ शकतात याबद्दल; माझी मनोमन खात्री पटत जाते आहे. आता असं अतुलनीय काही फक्त याच देशात सापडणारं असेल तर त्याबद्दल अभिमानाने इथली कोणतीही छाती फुगू लागली पाहिजे ही मला पटू लागलं आहे. पण अशी जर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल छाती फुगवून घेऊ लागलो तर ही माझी टीचभर करंटी छाती फुटेल की काय अशीच माझी परिस्थिती हाऊन बसली आहे. हे म्हणजे अगदी देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं होऊन बसलं आहे. याबद्दलही मला अपूर्व वाटत आहे. थोर थोर व्यक्तींच्या आयुष्यात असा योग आल्याच्या त्यांच्या मुलाखती टीव्हीवरून पाहात असताना मला जे खुजं वाटत असे त्याचं काहीच कारण नाही हे ही मला कळून चुकलं आहे. आता चक्क माझ्याही आयुष्यात माझ्या स्वतःच्या देशानेच ही स्थिती, हा कृतकृत्य करणारा अनुभव आणून ठेवला आहे.

किती भन्नाट देश आहे माझा ! ... आणि आजची त्याची स्थिती !!

ज्या देशात प्रत्येकालाच जणू काही काहीतरी जिंकल्याची; काहीतरी जबरदस्त होत असल्याची; एक प्रकारची संपन्नता केवळ आपल्या अवतीभवती नांदत असल्याची; सतत, सेकंदा-सेकंदाला ठाम खात्रीयुक्त जाणीव असेल असा एकही देश या पृथ्वीतलावर नसेल. अगदी जगावर राज्य करण्याचा कांगावा करणाऱ्या अमेरिकेतही लोक इतके सुखी नाहीत. खरं तर लोक सुखी किती आहेत हे पाहाण्याचे वेगवेगळे निर्देशांक हे ही त्या कांगावखोर देशाच्या कारस्थानाचाच एक भाग असणार. आता त्या कर्मदरिद्री अमेरिका देशात संपूर्ण वर्षात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सण-उत्सव असतील. त्यातलाही सार्वत्रिक म्हणावा असा एकच. पण माझ्या या देशात पाहा. वर्षातल्या एखाद्या महिन्यात इथे वाजंत्री वाजतच नाहीत असं कधीच शक्य नाही. किंबहुना परंपरागत वाजंत्री वाजवण्याचे क्षण तर आहेतच त्यात आता भर पडत चालली आहे. पूर्वी फक्त एकेका घराच्या अंगणात होणारे हे सण, उत्सव आता सर्व समाज साजरे करू लागला आहे.

इथे सतत सण असणार, उत्सव असणार. खरं तर फक्त हिंदूंचेच नव्हे तर इतर धर्मांचेही ! पण हिंदू धर्माच्या सणांची काय शान आहे ! काय तो दिमाख ! अहाहा ! काय ती दृश्यं ! विजयनगर ह्या प्राचीन नगरीच्या वर्णनांमधे अरबी आणि इतर परदेशी व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेली वर्णंनंही खुजी वाटावीत अशी समृध्दता ह्या सणांमधून, उत्सवांमधून नुसती ओसंडून वाहात असते. ह्याशिवाय त्या नालायक इंग्रजाचं दैव बलवत्तर असल्याने त्याला जी या भूमीवर राज्य करण्याची संधी मिळाली, आणि त्यानंतर ग्रह पालटल्यावर निघूनही जावं लागलं, त्या इंग्रजाने आणखी दोन तीन सण माझ्या या देशाला बहाल केले. तो गेल्यानंतर गेल्या सत्तर वर्षांमधे ह्या अशा उत्सवी दिवसांमधे वृध्दीच होत जात आहे. लोकशाही सरकारांनी आम्हा जनतेवर केलेल्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे, त्याचा एक वेगळाच अभिमान छातीमधे तग धरू लागला आहे तो वेगळाच.

राजकीयच कशाला, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीत आमच्या देशाने कितीतरी उत्सव पारंपरिक स्वरूपात असतात त्यापेक्षा किती समृध्द स्वरूपात आणि कसे साजरे करता येतात याची असंख्य उदाहरणं खरंतर जगाला घालून दिली आहेत. ते जे वर्ल्ड रेकॉर्ड्सचे ग्रंथ वगैरे काढून पोट भरणारे क्षूद्र काही लोक आहेत त्यांना भारताच्या केवळ ह्या एका क्षेत्रातल्या प्रगतीवर ग्रंथ काढण्यास हा जन्मही पुरणार नाही इतके जागतिक उच्चांक ह्या क्षेत्रात तयार झाले असणारच. अर्थात् हे “वर्ल्ड वर्ल्ड” असं म्हणत जे केलं जातं ते सगळं त्या अमेरिकन कांगाव्याचाच भाग असल्याने हे क्षूद्र ग्रंथकार ह्या कशाचीही साधी दखलही घेत नाहीत. पण क्रिकेटसारख्या खेळाला केवळ आपलंसं करून त्या इंग्रजावर जे उपकार माझ्या देशाने केले आहेत ते त्याने इथे रेल्वे आणून केले असतील त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. म्हणजे बघा ना, रेल्वे काय हो, माझा देश गरीब असतानाही काही आफ्रिकन देशांमधे घेऊन गेला होता हे मला सांगितलं गेलंय. पण एखाद्या देशाचा केवळ एखादा खेळ असा पूर्णपणे आपलासा करून घ्यायचा. नंतर त्याच्यात इतकी आर्थिक उन्नती करत जायची की तो खेळ केवळ या नव्या देशाने निर्माण केलेल्या नव्या आर्थिक समीकरणांवरच पोसला जावा ? अहो हे इतर कुठल्या खेळाबाबत कोणीही करून दाखवलं आहे का ? उदाहारणार्थ भारत सोडताना आम्ही आणलेल्या इंग्रजी शिक्षण वगैरे गोष्टींमुळे तुमच्या मुली “भोंडला” हा खेळ कदाचित सोडतील तर तो आम्ही खेळू लागतो असं करून दाखवण्याची इंग्रजाची शामतच नाही. हीच नाही तर उद्या भोंडला ऑलिंपिक्सचा भाग करून दाखवण्याची तर बातच सोडा.

पण माझ्या देशाला या परावलंबित्वाची गरजच काय ? आता बघा ना ... आयपीएल नांवाचा जो आधुनिक सण माझ्या देशाने निर्माण केलाय तो तर ऐन परिक्षांच्या मोसमात येत असूनही फार जंगी साजरा केला जातो.

या देशात जन्माणाऱ्या मुलामुलींना कसलंही भय नाही. याची खात्री गृहित धरणारंच हे वातावरण आहे. इथली समृध्द माती, परंपरा, देव, दैवीपणा, तीर्थस्थळं या सगळ्यांमुळे इथे माणसंही भन्नाट निर्माण होत चालली आहेत. दहीहंडीच्या सर्व नऊ-दहा थरांच्या वर चढणाऱ्या बाल-गोविंदाला तो साक्षात श्रीकृष्णाचा प्रतिनिधी असल्याने कसलाच धोका नाही आणि त्याला वज्रबाहुत्वाचं वरदान मिळेल, प्रसंगी ही माती त्याला अलगद झेलेल ही खात्री इथल्या प्रत्येकाच्या मनात असल्याखेरीज हा सण शक्य आहे का सांगा. खरंतर धर्माच्या अधिष्ठानामुळे माझ्या आजूबाजूला किती अचाट गोष्टी लोक सहजि करत चालले आहेत ह्या एका साक्षात्कारानेही मी स्तंभित आणि स्तीमित होत चाललो आहे. माझी छाती अभिमानाने फुलवणाऱ्या गोष्टीत ह्या एका बाबीची भर टाकायला हरकतच नाही.
जवळपास प्रत्येकाला एक आध्यात्मिक गुरू आहे. त्याचे काही सण प्रत्येकाच्या पोतडीत वेगळेच. ह्या गुरूंनी भरलेल्या देशात काही वर्षांनी गुरूपौर्णिमेला राष्ट्रीय उत्सावाचं महत्वा द्यावं लागेल याची मला खात्रीच आहे. आपले नवे पंतप्रधान ह्या उत्साहात स्वच्छता, योग आणि असा प्रकारच्या इतर दिवसांची अनन्यसाधारण भर टाकत आहेत ते वेगळंच. अशा अर्थी कचरा काढण्याचाही सण केला जाऊ शकतो अशी नवी मांडणी हा माझा देशच करू लागला आहे.

आपल्या प्रत्येक कृतीला धार्मिक अधिष्ठान पाहिजे हे इथल्या नव्या दमाच्या राज्यकर्त्यांनाही पटलं आहे. विविध सणावारांच्या सार्वजनिक होण्यातून समाज संघटित होत जातो आणि म्हणूनच समाजाला जराही असंघटित वाटू नये यासाठी दर महिन्यात किंवा ठराविक वारंवारितेने काही ना काही धार्मिक घडवण्याच्या अनुष्ठानात ते मग्न होत चालले आहेत. अमेरिकेत त्या भारतियांच्या विरूध्द म्हटल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रंपच्या विरूध्द नुसती भाषणं करून त्या हिलरीला जे तुटपुंजं यश मिळेल त्यापेक्षा कितीतरी यश हे इथल्या अगदी छोट्यात छोट्या नगरांच्या नगरसेविकाही चैत्रात-श्रावणात मेंदी काढण्याचे कॅम्प आयोजित करून साधतात. आता मेंदी काढायला चार-पांचशे बायका येणार तर मग नृत्य-गान नको का?

संपूर्ण युरोप अमेरिकेत रॉक आणि पॉप ‘कॉन्सर्ट्स्’ना दिसणार नाही इतकी झगमग ह्या उत्सवांमधे इथे दिसते. विवध प्रकारचे, विविध आकारांचे झोत टाकणारे किंवा लोळ फेकणारे दिवे, ते एखाद्या टेंपोवरही लावता यावेत यासाठी छोटे जनरेटर्स आणि मोठ्या रोषणाईसाठी कितीतरी मोठे जनरेटर्स, देखावे ओढणाऱ्या गाड्या, लेझीम ढोल पथकांमधे झालेली लक्षणीय वाढ, त्यांची रोज संध्याकाळी चालणारी प्रॅक्टिस सेशन्स .. अहाहा काय ती दृश्यं !! माझ्या पुणे शहराच्या नदीकाठच्या रसत्यालगत दर पन्नास फुटावर एक ढोलपथक तालीम करताना दिसतं. संध्याकाळी हा काठ नुसता फुलून जातो. ह्या देशात ही समृध्दता इथले कानही समृध्द करते. मुर्दाड कानांना ८० डेसीबेल्सच्या वरचे आवाज सहन होत नाहीत. पण या इथले कान दिवसेंदिवस, ह्या सर्व उत्सवी वातावरणातून “दिव्य कान” होत चालले आहेत. नव्हे, ते यामुळेच दिव्य होत जातील अशी खात्री मला आता वाटू लागली आहे.

कान कणखर, सणांमधे जेवून पोटं कणखर, ढोल-पालख्या नाचवून पाठीचे कणे कणखर, झाडापानांच्या सणांमुळे निसर्ग कणखर अशी इथल्या सर्वांची प्रकृतीही विलक्षण सुधारणार आहे यात शंका नाही. परवा एका मित्राने ज्ञानात भर टाकली की कुंभमेळ्यातले साधू जे विलक्षण खेळ आणि क्रीडाप्रकार करून दाखवतात ते ऑलिम्पियन्सच्या बापजाद्यांना केवळ स्वप्नांत खेळणंही शक्य नाही. असं म्हणून त्याने कुंभमेळ्यातील साधू स्वतःच्या लिंगाने चक्क एक गाडी ओढत असल्याचं दाखवलं. मी शाळेत असतानाचे कुंभमेळ्यातले साधूही इतके उत्साहाने काही करून दाखवणारे नव्हते. किंबहुना त्यांना तेव्हढं उत्साही किंवा उत्सवी वाटण्यासारखंच नसेल तेव्हा काही. इथेही धर्माचं अधिष्ठान आलंच. पण तेच फक्त उपयोगी नाही. मानसिक स्थिती उत्साहवर्धक आणि उत्सवी असल्याखेरीज इतकं ऊर्जावाहित्व येणार कुठून ?

माझा आणखी एक मित्र सध्या एका कामात गुंतला आहे. त्याने मला सांगितलं की तसंही गणपतीचे मांडव दहीहंडीलाच घातलं जातात. तर त्यांचा वापर मंडळांना करता यावा आणि दहिहंडीच्या उत्सवालाही एक विशेष वैज्ञानिक धार मिळावी म्हणून तो कार्यरत आहे. त्याची कंपनी सध्या एक पोर्टेबल फाइव्ह डी शो विकसित करत आहे. त्या शोची अशी कल्पना आहे की खरीखुरी दहीहंडी काही प्रत्येकालाच खेळता येत नाही त्यामुळे प्रत्येकजण आनंदाला मुकतो. हे त्या उंच बांधलेल्या दहिहंडीतून प्रत्येकाच्या आनंदावर पडणारं विरजण यापुढे पडणार नाही किंवा पडलंच तरी त्यामुळे नव्या आनंदाचं उत्तम दही, ताक, लोणी अशी क्रमवारी साधता येईल असं तो ठामपणे सांगू लागला. ते असं करणार आहेत की तो शो त्या दहिहंडीच्या शेजारच्या मांडवात असेल. आपण तिकिट काढून आत जायचं. कृष्णाचे कपडे आपल्याला दिले जातील ते घालायचे आणि मग शो सुरू. थ्री डी ग्राफिक्सच्या आणि मोशन सेन्सिंग तंत्रज्ञानाची त्याच्याशी सांगड घालत तिकिट काढून तात्पुरते कृष्ण झालेल्या आपल्यापैकी प्रत्येकाला एका महाप्रचंड दहीहंडीच्या अगदी वरच्या थरात पोहोचणं, हंडी फोडणं असे आनंदच नव्हे तर चक्क त्या हंडीतलं पाणी आपल्या अंगावर पडण्याचा प्रत्यक्ष सानुभव आनंदही घेता येईल. असाच प्रकारचे भन्नाट थ्रीडी फोर डी आणि फाइव्ह डी देखावे आगामी गणेशोत्सवातही मौज आणतील हा विश्वास त्याला वाटतो.

विज्ञानाची आपल्या धर्माशी आणि उत्सवांशी सांगड घालणाऱ्या ह्या माझ्या देशात लेसर, डॉल्बी, डीजे असा शब्दांनी नवे आयाम प्रस्थापित केले आहेत आणि ते इतर कोणत्याही देशामधे शक्य झालेलं नाही. आपल्या एखाद्या देवाच्या केवळ विसर्जनासाठी तीन तीन दिवस रांगा लावून तेव्हढ्याच उत्साहात कोणताही देश नाचू शकत नाही. फेसबुकवर-व्हॉट्सॅपवर उत्साहवर्धक पोस्ट्स् टाकणं, गाडी घेणं, नवनवे फोन घेणं, ते बदलणं, कपड्यांपासून सर्वकाही क्लिक् करून मिळवणं, किटी पार्टी, भिशी, रमी, रम असे नवेनवे सण-उत्सव तर आहेतच. ते ह्या सगळ्यात तंत्रज्ञानाला हाताशी घेऊनच साजरे होतात.

नाक्यानाक्यावर रिक्शावाल्यांच्या, मालवाहतूकदारांच्या, व्यापाऱ्यांच्या एकत्रित सत्यनारायण पूजा, खंडेनवमी, लक्ष्मीपूजनं अशा नव्या सार्वजनिक सणा-उत्सवांना नवी ऊर्मी प्राप्त होत आहे. गांवागांवातले गांवदेवांचे उत्सव पैशांच्या झळाळीने दिमाखदार होत चालले आहेत. पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय दुखवटे पाळणं आपण सोडून दिलं आहे. सणांच्या सुट्यांमधे मात्र वाढ झाली आहे. प्रत्येक सणासुदीच्या निमित्ताने सिरियलींमधे नवी वाक्यं लिहिली जाणं ते स्पेशल एपिसोडची रचना होणं, किंवा प्रत्येक इदेला, दिवाळीला किंवा तत्सम सणाला आपला सिनेमा येणारच असं ब्रॅन्डिंग सिनेतारकांनी करणं हे आपल्या देशात तग धरून वाढू लागलं आहे. लोक त्याकडे मुद्दाम पाहू लागले आहेत. अलिकडे आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो पण अगदी भारतीय पंचांगांचा विचार केला तरीही चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच ते फाल्गुन पौर्णिमा आणि रंगपंचमी पर्यंत सणांचा, उत्सवांचा तुटवडा नव्हताच. पूर्वी ह्या सणांच्या अधूनमधून शेतीची कामं माणसं करीत असत पण आता शेतीच नसल्याने आणि प्रत्येकाच्या पाकिटात पैशाचं पीक पूर्वीपेक्षा उत्तम येत असल्याने हे सर्व होत असावं असा माझ्या अपरिपक्व मनाने विचार केला होता. पण ते खरं नाही.

खरं हेच आहे की कोणत्यातरी विलक्षण, अनाकलनीय ऊर्जेने माझ्या या देशाला भारून टाकलं आहे. पूर्वी हरलेल्यालाही आपण जिंकतच चाललो आहोत असं वाटू लागलं आहे. आपण काही यापुढे कधीच हरणार नाही असं प्रत्येकालाच पटलेलं आहे. छोट्या छोट्या लढाया तर माणूस जिंकतोच आहे. मोठ्या लढाया होत नाहीच्चेत.

प्रत्येकाला केस पांढरे झाल्याने हरल्याचं वाटायची, आपण काळे आहोत म्हणून जिंकत नाही असं वाटण्याची, आपले कपडे सफेद नाहीत, केस मुलायम नाहीत, कपडे मुलायम नाहीत, अंग तुकतुकीत नाही या कश्शा कश्शानेच काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय आता आहेतच.

अजून खरं तर अमरत्व माणसाला मिळालेलं नाही, पण अमरत्वाचा वर मिळालेला एखादा ययाति जसा उत्साहाने भरून गेला असेल तसा माझा देश भारला गेला आहे.

माझी छाती मात्र हा सर्व उत्साह तिच्यात सामावून घ्यायला असमर्थ होत चालली आहे. दडपत चालली आहे. उद्या जर का माझी छाती फुटल्याचं तुम्हा कोणाच्या कानावर आलं तर ते या माझ्या देशाच्या या “नव नवल नयनोत्सवामुळे” किंवा नवोन्मेषी-नवोत्सवी वातावरणाच्या उत्साहातून आणि त्याबद्दलच्या मला वाटत चाललेल्या विस्मयजनक अभिमानातूनच झालं आहे याची सर्वांनी खात्री बाळगावी.

Sunday, May 15

नव्या शाहिरास ..


शब्दांना चढू दे धार - थांब - बोलू नको
शस्त्रांचे पडू दे वार - बोल - थांबू नको !!

धर्मांचे अफिमी रान - पूर्ण - जाणून घे
सर्पांनी भरू दे वाट - चाल - टाळू नको !!

कष्टांची धरी जो कास - फास - त्याला इथे
रक्ताचा करी तो  घाम - त्यास - कापू नको !!

शिष्टाई कराया धूर्त - फार - येतील रे
तर्कांच्या शब्द भ्रमात - मार्ग - शोधू नको !!

युगांची जरी का वाट - तीव्र - काळोख हा !
दिव्याने जळू दे दीप - माळ - तोडू नको !!

विचारी कुणी भेटेल - आज - कोणी कुठे
सुरांना मिळू दे सूर - साथ - सोडू नको !!

अपूर्ण


पांघरूण अपुरं पडतं
नेहेमीच
जरा वर ओढलं की
पाय उघडे पडतात
आपलं चांगलेपणही
असंच
अपुरंच पडत राहातं
आपण कितीही
चांगलं वागू
चांगले होऊ
चांगले विचार करू
चांगली स्वप्नं बघू
या जगात
कोणीतरी, कुठेतरी
आपल्याला
वाईट म्हणत राहावं
अशी बेटं
उरतातच
आपल्या पांघरूणाखालून
पावलं उघडी पडावीत
तसे
आपण उघडे
पडतच राहातो !

Tuesday, April 12

पुन्हा एकदा !


सूर साधेन मी पुन्हा एकदा !
गीत गाईन मी पुन्हा एकदा !

काळजाने दिशा कशी सांडली ?
वाट चालेन मी पुन्हा एकदा !

वादळाला अता पुरा भाळलो
लाट होईन मी पुन्हा एकदा !

मीच वेडापिसा तुझ्या गावचा
मी नशा, नाद मी पुन्हा एकदा !

मी तुझ्या मागुनी कधी चाललो?
दूर जाईन मी पुन्हा एकदा !

संपलो सांडलो तुला वाटले
जीव लावेन मी पुन्हा एकदा !

सूर माझा तुझा जरी वेगळा
साथ देईन मी पुन्हा एकदा !

राख माझीच ही नका आवरू
झेप घेईन मी पुन्हा एकदा !

काजवे माजले अशी रात्र ही !
सूर्य होईन मी पुन्हा एकदा !

कापले मारले जरी का मला
येथ येईन मी पुन्हा एकदा !

पुरे


जीवना, तू नको जगायला शिकवू
हात देऊ नको, नको मला दमवू !

वेगळे सांगणे नको मला कसले
सांग साधे जरा उगा नको दिपवू !

यातना वेदना पुरे अता नसत्या
हास थोडे पुन्हा, नको सदा भिववू !

काय नाहीस तू केले कुणा अजुनी?
जीवना, थांब रे, कोणा नको थकवू !

फार ना मागणे माझे अता उरले
शांत हो, शांत हो, सारे पुन्हा सजवू !

Monday, April 4

किती !


जीवना ही तुझी कमाल किती ?
श्वास झाले तुझे सवाल किती !

दूर होतो अडून मी उरलो
पावले सांगतात हाल किती ?

मीच ज्यांची मिजास चालवली
तेच मारेकरी खुशाल किती !

हाय, धोंडे जिथे तिथे सजले
देव झालेत ते विशाल किती !

जे नको तेच सारखे जगलो
बांधले यातना महाल किती !

मीच जाईन सोडुनी दुनिया
मीच होऊ अता मशाल किती ?

जिंकलो आज मी जरी असलो
वादळे वागली विजाळ किती ?

Monday, March 28

उत्सवी उत्सवी !


आम्ही उत्सवी उत्सवी
उत्सवात रमणारे
जग मरे स्ट्रेसपायी
आम्ही मजा करणारे ।

देश अमुचा महान
त्याची तुलनाच नाही
मोजावया इतिहास
भारंभार पंचांगेही ।

इंग्रजाची कृपा त्यात
कॅलेंडरही लाभले
दिवसांना आता येथ
मोल दुहेरी लाभले ।

पारंपरिक एखादा
एक इंग्रजी दिवस
साजराही होत जावा
जशी सोय ज्यास-त्यास ।

अशा सोयीने लोकांस
दोन लाभती निमित्ते
एका घटनेचे जसे
कालरूपी दोन पत्ते ।

दोन पाने जोकराची
जशी धरावी हातात
इथे उत्सवी माणसे
नित्य असे खेळतात ।

जयंती, अथवा दिन
कुणा एका महात्म्याचा
पाळायचा हे जाणून
तारखेनं अन् तिथीनं ।

कसे पुराणाच्या काळी
इंग्रज हे नव्हतेच ?
देवदेवतांच्या भाळी
तिथी प्रत्येकी एकच ।

इंग्रजांची हीच कृपा
भक्तां लागली जाणवू
दिनविशेषाच्या झेपा
भूतकाळी धावू धावू ।

सापडता दिन ऐसे
एका जागी दोन दोन
सण दोन व्हावे तसे
दोन बाह्या सर्सावून ।

असे शेकडो महात्मे
त्यांचे दिवस दुप्पट
सोडूनिया कामेधामे
सण करूया चौपट ।

असा समाज बांधावा
जो की उत्साही उत्सवी
भूतकाळी रमवावा
पुढे फिकीर नसावी ।

उत्सवांचे बळ मोठे
राज्य चालते मजेने
खुर्ची बळकट होते
अश्या गाफील प्रजेने ।

उत्साहाचे ठोस काही
जेव्हा नुरते कारण
तेव्हा द्यावे लोकां काही
असे नवे नवे सण ।

आम्ही उत्सवी उत्साही
आम्हां नाहीत दुष्काळ
खेद नाही खंत नाही
सांगू नका काळ वेळ ।

आम्ही वापरू हे रस्ते
वेठी धरू व्यवस्थेला
आम्हां अभिमान सस्ते
जागू पुढाऱ्याच्या ताला ।

परंपरा अभिमान
रसायने उतू जाती
सदा बाळगू उरात
जशा जखमा वाहती ।

आम्ही उत्साही उत्साही
जातो वाहून वाहून
आम्ही उत्सवी उत्सवी
आम्ही बेभान बेभान ।