Friday, February 8

किती ?

काल ७ फेब्रु - हा माझा दिवंगत कवी मित्र नितीन आखवे याचा जन्मदिवस !
काल रात्रीची झोप उगाचच अस्वस्थ होती .. त्यात स्वप्नात नितीनसोबत काढलेल्या अनेक चांगल्या वाईट क्षणांचा एक चित्रपट सतत चालू होता 
नितीनच्या प्रिय स्मृतीलाला माझ्याकडून ह्या काही धडपडत्या ओळी ...


किती ?
आज अचानक भेटता सांगू किती ? बोलू किती ?
या आजच्या भेटीतले ठेऊ किती ? नेऊ किती ?

अपुऱ्याच माझ्या मैफिली अधुरे जिणे भेटीविना
तू मागता माझी कथा थांबू किती ? बोलू किती ?

सांगायचे आभासते हृदयामध्ये अन वाजते 
शब्दांत ते यावे कसे ? सांडू किती ? शोधू किती ?

माझ्या मनाचा चंद्र तू विरहात अवसेची दशा
अपुल्या स्मृतींची आसवे उजळू किती ? विझवू किती ?

भेटू पुन्हा जन्मांतरी काळापुढे जाऊ तरी 
हा खेळ जन्मांचा पुन्हा मांडू किती ? मोडू किती ?

1 comment:

Yashodhan Walimbe said...
This comment has been removed by the author.