Wednesday, January 23

प्रल्हाद !

बोलण्यापुरता । आस्वाद कलेचा ।
मध्यम वर्गाचा । दंभ नवे ।। 

अपत्याची कला । दाखविती फोल ।
नाही तिला मोल । पैशांविना ।।

संस्कारापुरते । कलांचे सोबती ।
मग मात्र भीती । वाटे त्यांना ।।

कला विकण्याची । नसेल हातोटी ।
आई-बापा खोटी । पोराचीच ।।

हिरण्यकश्यपु । असे आधुनिक ।
त्याना कशी भीक । घालावी हो ?

कलेचाचि ध्यास । अश्या वेळी घ्यावा ।
नरसिंह व्हावा । कलेचाच ।।

आपुल्या कलेत । व्हावे श्रद्धावान ।
जेणे तिला मान । मिळवावा ।

फाडुनिया पोट । दंभ उकरावे ।
सत्व दाखवावे । आपुलेचि ।।

कलाकार जन्म । असाचि मिळेना ।
फुकाचि टिकेना । ध्यानी घ्यावे ।।

मायबाप जरी । किती सन्मानीय ।
कलेवरी पाय । त्यांचा नको ।।

आपुल्या कलेचे । त्राते आपणचि ।
मध्यम वर्गाची । रीत ऐसी ।।

जमताति भुते । मिळता सन्मान।
तोपर्यंत घाण । वाटे त्याना ।।

कला सन्मानाने । जोपासा जनहो ।
पैश्यासाठी टाहो । कशासाठी ?

प्रल्हाद असे जे । मध्यमवर्गात ।
नारायण त्यांत । कला रूप ।।

No comments: