Friday, August 7

डोमकावळे रिपब्लिक


हे रिपब्लिक आहे आमचं
इथल्या पब्लिकच्या
खिडकीखिडकीवर आम्ही बसतो
यांच्या खुर्चीवर कोण?
त्यावर ठरणार
आमचा स्वर कोणता
आणि तो स्वर
केव्हा, कसा आणि कुणावर चढणार !
आम्ही डोमकावळे ...
छे छे ...
डोमकावळ्यांच्या
प्रतिमेचंही
विडंबन आम्ही !

आम्ही तयार करतो
विधानांचे आणि मतमतांतरांचे
शेंबूड
यथेच्च चाटायला
चोची खुपसून

घटनांच्या मेलेल्या उंदरांची
पोटं फाडून
आम्ही ओढत बसतो सनसनाटी
वादविवादांची आतडी !

आम्ही शिंटतो मनसोक्त
सर्व जनतेच्या कानांवर, डोळ्यांवर !
आम्ही आमच्या विष्ठेवर
केवळ ठेवतो निष्ठा
प्रसवतो विष्ठांचे महापूर ...

नव्या नव्या विष्ठेसाठी
वाकड्या मानांनी
तीक्ष्ण नजरांनी
लगेच शोधतो
केवळ आमची भूक भागवणारा
नव्या संधीचा पिंड !!

No comments: