माझा हसरा चेहरा ..
व्हॉटस्ऍप माझा मोहरा
असं मला जाणवतं
तेव्हा साळसूद व्हॉटस्ऍप
माझ्या खिशात शिरतं
साळसूद डाऊनलोड होतं
डाउनलोड कंप्लीट ... इंस्टॉलिंग म्हणतं
साळसूद !
मग एक एक दिवस
व्हॉटस्ऍप काय आहे ?
कुतूहल, शोध ...
हरघडी वाजणारं व्हॉटस्ऍप
काय काय आणून ओततं !
साळसूद व्हॉटस्ऍप
साळसूदपणे डाउनलोड होतच राहातं
मेंदूच्या हार्ड डिस्कपर्यंत
इन्स्टॉल होतच राहातं !
मी काही म्हणू पाहातो
व्हॉटस्ऍप तेच म्हणते बहुधा
मी काही करू पाहातो
व्हॉटस्ऍप
तेच करू पाहाते
जे जे मी
तेच व्हॉटस्ऍप
व्हॉटस्ऍप = मी
मी = व्हॉटस्ऍप
माझी ताकद आहे
जणू व्हॉटस्ऍप,
माझी अभिव्यक्ती !
मजा येते !
मजा येतच राहाते !
माझ्या आत मजा शिरतच राहाते
आता मी
व्हॉटस्ऍपमधे शिरलेला असतो
मजा येते
आणखी मजा येते
आणखी आणखी मजा
आणखी आणखी आणखी आणखी
येते !
माझी मज्जा संस्था
आता फक्त
मजा संस्था !
नशा चढते
आणखी नशा चढते
आणखी आणखी नशा
आणखी आणखी आणखी आणखी
चढते !
मी व्हॉटस्ऍप फॉरवर्ड करतो
आणखी आणखी फॉरवर्ड
आणखी आणखी आणखी आणखी
करतो !
व्हॉटस्ऍप मला फॉरवर्ड करतं !
व्हॉटस्ऍप इज अ न्यू वर्ड
व्हॉटस्ऍप इज अ न्यू वर्ल्ड !
व्हॉटस्ऍप माझं अस्त्र
व्हॉटस्ऍप माझं शस्त्र !
व्हॉटस्ऍपच्या पात्याला
चमचमतेय
माझीच धार !
व्हॉटस्ऍपच्या नळीमधे
मी दबा धरून
गोळीसारखा!
व्हॉटस्ऍपच्या पंजांना
माझी अणकुचीदार नखं ...
व्हॉटस्ऍप खुपसू शकतं
आता कुणाच्याही मानेत
माझे तीक्ष्ण सुळे!
व्हॉटस्ऍप माझं मिसाइल
मी एंटर दाबलं
की बुंगाट सुटणारं ...
कशावरही, कुणावरही, कधीही, कसंही
कोसळणारं ...
माझं ड्रोन झालंय व्हॉटस्ऍप !
मी बाळगून आहे एक अणू बॉम्ब
माझ्या व्हॉटस्ऍपच्या भूमीगत
युध्दतळामधे !
माझ्या व्हॉटस्ऍपला रेडार !
माझ्या व्हॉटस्ऍपमधे
एक महायुध्द ?
पण कोणाविरूध्द ?
कोणाही विरूध्द?
विरूध्दच !
No comments:
Post a Comment