Monday, November 24

'एक्स्प्रेशन लॅब'चा सोलो फेस्टिवल २०१४


हे या महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे. काही वर्षांपूर्वी स्वानुभवातून, माझ्या वाचनातून आणि माझ्या गुरूस्थानी असलेल्या अनेकांकडून मिळालेल्या प्रेरणेतून काही विचार मंथन करून मी एक्स्प्रेशन लॅब ही माझी अशी नाट्य-प्रशिक्षण पध्दत सुरू केली. मी काही फार क्रांतीकारी शिकवतो असा माझा नक्कीच दावा नाही. माझे विद्यार्थी मात्र माझ्याशी सतत जोडलेले राहातात. सतत मला काही ना काही विचारतात. मला त्यांच्यापैकी बरेचसे सर म्हणत नाहीत, "अरे प्रदीपदादा" म्हणतात, प्रसंगी माझ्या मदतीला धावून येतात हे मात्र नक्की. मला एक्स्प्रेशन लॅब हे एका कुटुंबाप्रमाणे वाटतं आणि त्यामुळे मी, त्यातला सर्वात मोठा माणूस हा त्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या परीने घेत राहातो. ह्या प्रशिक्षणाला कोणतीही प्रतारणा चिकटलेली नाही. जे मी करू शकत नाही त्याच्याबद्दल उगाच वल्गना मी करत नाही. माझ्या कोणत्याही सहाय्यकालाच "माझ्या वर्गात शिकव रे आज" असं मी सांगत नाही. मी शक्य तितके जास्त वर्ग स्वतःच घेत असतो. काही जण माझ्याशिवाय जे शिकवायला येऊ शकतात असं दिसतं, त्यांचा स्वतःचा नाट्य-कलाक्षेत्रातला प्रवास मलाही लाजवणारा असा प्रगल्भच असतो. अशी काही पथ्य मी पाळतो. अवाच्यासवा फी घेणं हा माझा उद्देश कधीच नव्हता. नाटक हे काहीतरी खालच्या पातळीवरचं आहे आणि ते शिकून पुढे जाता येतं वगैरे फालतूपणा मला मान्य नाही. नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमातला अभिनय हा अभिनयच असतो त्यात फारसा फरक नाही, पण नटाला मात्र तीनही माध्यमं एकमेकांपेक्षा भिन्नतेने पाहाता आली पाहिजेत, हाताळता आली पाहिजेत इतका महत्वाचा मुद्दा मात्र मी मान्यच करतो. आपल्याला ड्रायव्हिंग येत असतं. आपण पुण्यात गाडी चालवतो, मुंबईत चालवतो आणि इंग्लंडमधे चालवतो तेव्हा गाडी तीच असली तरीही चालवतानाचं भान मात्र वेगवेगळं असावं लागतं, असतं, किंवा अमेरिकेसारख्या देशात गाडीमधेच बदल होतात, चालकाला गाडीच्या डावीकडे बसावं लागतं, पण तरीही यंत्र तेच त्यामुळे भान खूप प्रमाणात वेगळं ठेवून ते चालवावं लागेल तसं या तीन माध्यमांबाबत नटाचं आहे. हे माझं मानणं आहे. असो.

माझ्याकडे शिकणाऱ्या नटाला आपल्या कलेची अधिक जबाबदारी घेता यावी यासाठी मला काहीतरी करायचं होतं. जबाबदारी म्हणजे, कला साकार करण्याचं काम त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात जाणीवेतून करायला तयार व्हावं, कलेचा सम्यक विचार त्यांच्या कामाच्या मुळाशी असावा ह्यासाठी काहीतरी करायला हवं असं मला वाटत होतं. नव्या कलाकारांना संधी जितकी लवकर मिळेल तेव्हढं नकळत घडणारं सर्व काही स्पष्ट जाणिवेतून घडवता येऊ लागतं.  या क्षेत्रात वावरताना या क्षेत्रातल्या इतर सर्व काम करणाऱ्या सहकाऱ्यांविषयी आपुलकी आणि आदर त्यांच्या मनात असावा, त्या त्या कामाच्या विभाजनाचं प्रयोजन त्यांना नीट माहित असावं असं सगळं मला हवं होतं. म्हणजे प्रकाशयोजनाकार किंवा नेपथ्यरचनाकार किंवा त्यांच्या कामातले अगदी मजूरही तिथे नक्की काहीतरी करीत आहेत आणि ते नक्की काय करीत आहेत याची स्पष्ट जाणीव त्यांच्यामधे मूळ धरून असावी हे मला हवं होतं. यासाठी काही करावं या दृष्टिने मी एखादं वर्ष अस्वस्थ होतो. पण गेल्या वर्षी ऑगस्टमधे मला ही कल्पना सुचली आणि त्या दृष्टीने मी मोर्चेबांधणी सुरू केली.

पु.ल. किंवा लक्ष्मणराव देशपांडे करायचे तो एकपात्री प्रयोग नव्हे किंवा कीर्तनकार करतात तसा नव्हे तर मी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांमधे जे पाहिले होते तसे एकल किंवा सोलो नाट्य-प्रयोग ह्या माझ्या विद्यार्थ्यांनी सादर करावेत असं माझ्या मनात आलं. पण म्हणजे काय, हे त्यांना कोणालाच माहित नव्हतं. मग मराठीत असे प्रयोग सादर केलेले माझ्या जवळचे दोन दिग्दर्शक म्हणजे अतुल पेठे आणि वरूण नार्वेकर (आणि त्यांच्यासोबत महादेवभाई मराठीत सादर करणारा कलाकार ओंकार गोवर्धन) यांच्या मदतीने मी इच्छुक विद्यार्थ्यांना या दिशेने थोडं फार प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. आशुतोष पोतदार या मित्राचं भारतीय रंगभूमीच्या पातळीवर बरंच काम सतत चालू होतं त्यामुळे त्याला, दृक-श्राव्य स्वरूपात एक सत्र घ्यायची विनंती केली. या सत्रात एकंदर रंगमंचीय अवकाशाचा नाटकासारखा वापर करून सादर करायच्या या एकल-नाट्याचा विचार कसा करता येईल हे त्याने खूप चांगलं सांगितलं. यानंतर कोणाची इच्छा असेल त्याला सर्व तांत्रिक मदत करून हा एक स्पर्धात्मक महोत्सव आयोजित करायचं ठरलं. गेल्या वर्षी बावीस विद्यार्थ्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. चार-पांच जण प्रत्येकाला मदतीला होते. वीसेकजण आयोजनात होते, पांच-पंधराजण तांत्रिक बाजू सर्वांसाठीच सांभाळत होते. असे साधारण सव्वाशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. मयुरेश्वर काळे या मित्राच्या सहकार्याने मी हा महोत्सवाचा कार्यक्रम नीट राबवू शकलो. महोत्सवातून तीन उत्कृष्ट सादरीकरणं निवडण्यासाठी चार जणांची परीक्षण समिती नेमली होती. डॉ. अजय जोशी, किरण यज्ञोपवीत, मोहित टाकळकर आणि राजश्री सावंत-वाड हे ते चार जण ! ह्या चौघांच्या मते, तीनच नाही तर सहा सादरीकरणं चागल्या दर्जात निवडता येणार होती. त्यामुळे तीन उत्कृष्ट सादरीकरणं आणि तीन उत्तेजनार्थ सादरीकरणं अशी सहा निवडली गेली. उत्तेजनार्थ सादरीकरणांना प्रशस्तीपत्र आणि उत्कृष्ट सादरीकरणांना प्रत्येकी रूपये दहा हजार रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवलं गेलं. पुढे वर्षभरात त्या सहांसोबत (मला त्याखेरीज वैयक्तिकरित्या आवडलेल्या) आणखी दोन सादरीकरणांचे प्रयोग एक्स्प्रेशन लॅबतर्फेच सादर केले. चार सादरीकरणांचे प्रयोग बेळगांव येथे इनर व्हील क्लबच्या पुढाकाराने सादर केले गेले. या सर्वाचा खर्च माझ्या जिवावर करण्याचा प्रयत्न मी करत होतो. काही वेळा तारांबळही उडत होती, पण जमलं.

आता या वर्षी हा महोत्सव करावा की नाही ह्याचा मी विचार करत होतो तेव्हा मला माझ्या नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांमुळेच पुन्हा चेतना आली आणि मी ठरवलं की करू या पुन्हा ते सर्व. अर्थात् गेल्या वर्षीच्या अनुभवातून शिकलेल्या काही बाबी ह्यावर्षी सुधारता येतील ह्या पध्दतीने आखणी करू लागलो.

गेल्या वर्षी २२ सादरीकरणं झाली असली तरीही त्यापैकी मी पुढे चालू ठेवलेल्या ८ खेरीज इतरांना पुढे ते चालूच राहावं हे प्रकर्षाने वाटलं नाही. म्हणजे नंतर त्यांनी आपापली सादरीकरणं लोकांसमोर आणण्यापासून दूरच ठेवली. ह्याचं कारणं ह्या सादरीकरणाच्या पध्दतीविषयी मनात असलेला गोंधळ गेल्या वर्षी जास्त प्रमाणात शेवटपर्यंत सर्वांवर काम करीत होता. या वर्षी ह्या महोत्सवामधे 'नेमेचि येतो मग पावसाळा' अशी भावना किंवा 'बन चुके'पणाही यायला नको होता. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे यावर्षी मला जी काही सादरीकरणं होतील त्यातली जास्तीत जास्त रंगमंचावर नंतरही सादर होत राहाण्याच्या दृष्टीने "तयार" असू शकतील का हा विचार मनात होता.

ऑगस्ट महिन्यात मी या वर्षीच्या महोत्सवाची बांधणी सुरू केली. प्रशिक्षण शिबिरं तेव्हाच सुरू केली. आशुतोष पोतदार, डॉ. अजय जोशी, अभय महाजन, हृषिकेश पवार यांनी प्रशिक्षण वर्ग घेतले. पुढे गेल्या वर्षीच्या विजेत्या सहा जणांनी आपले अनुभव सर्वांना सांगितले. यानंतर ह्या वर्षीच्या महोत्सवात कोणाला सहभागी व्हायचं आहे हे विचारलं गेलं. मला वाटलं होतं की संख्या घटेल, पण चक्क तीस जण पुढे आले. मग ह्या सर्वांनी आपल्या नाट्याच्या कल्पनेवर किंवा संहितेवर काम करायला वेळ दिला गेला. संहिता किंवा कल्पना समोर आल्यानंतर त्यावर काम सुरू करताना पुन्हा मार्गदर्शनाची व्यवस्था केली गेली. ह्यासाठी "तीन किंवा चार जणांना एक मार्गदर्शक" अशी नेमणूक केली. पुन्हा आशुतोष पोतदार, मोहित टाकळकर, अभय महाजन, अश्विनी गिरी, आनंद चाबुकस्वार, रूपाली भावे, हृषिकेश पवार, चिन्मय केळकर, राजश्री सावंत-वाड, अनुपम बर्वे यांनी मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनाचा उद्देश हा होता की कलाकारांना आपापल्या विषयाच्या किंवा संहितेच्या संदर्भात अधिकाधिक पैलू आणि शक्यता किंवा प्रसंगी मर्यादांचंही दर्शन घडावं. त्यादृष्टीने त्यांनी वेळीच जागरूक असावं.

या सर्वानंतर आता बहुतेकांची सादरीकरणं तयार आहेत. आता २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवसांत या तीस जणांना आणखी एका वेगळ्या मार्गदर्शन सत्राला सामोर जायचं आहे. दोन मार्गदर्शक-परीक्षकांची एक समिती ह्या सर्वांची सादरीकरणं तालीम स्वरूपात पाहाणार आहे. ती पाहून अजून काय करायला हवंय, काय शक्यता अजूनही तपासल्या गेल्या नाहीत, ह्या सादरीकरणाचं तांत्रिक स्वरूप कसं असेल, त्यात काय काळजी घ्यायला हवी अशा पध्दतीच्या सूचना ही समिती त्यांना करणार आहे. ३० तारखेनंतरही चार दिवस हातात आहेत त्यामधे ह्या नव्या मार्गदर्शनाचा विचार करून काही करता येणं शक्य आहे.

आणि ते सर्व झाल्यावर सर्वच्या सर्व म्हणजे ३० कलाकार आपली एकल-नाट्यं भरत नाट्य मंदिरात ४ ते ६ डिसेंबर ह्या तीन दिवसांत आयोजित केलेल्या महोत्सवात सादर करतील. ७ तारखेला रात्री ३ सर्वोत्कृष्ट सादरीकरणांचा सन्मान केला जाईल.

ह्या वर्षीच्या पारितोषिकाचं स्वरूप वेगळं आहे. ह्या तीन उत्कृष्ट सादरीकरणांचे प्रत्येकी तीन ते पांच प्रयोग एक्स्प्रेशन लॅबकडूनच सादर केले जातील हे एक आणि दुसरं म्हणजे ह्या तीन सादरकर्त्यांना पुढे काही वेगळं तंत्र शिकण्याकरता भारतातील एखाद्या ख्यातनाम प्रशिक्षकाकडे किंवा प्रशिक्षण संस्थेकडे पाठवलं जाणार आहे. अर्थात तिथे येणारा प्रशिक्षणाचा सर्व खर्च एक्स्प्रेशन लॅब उचलणार आहे. महोत्सवाला प्रायोजकत्व मिळालं किंवा खूप प्रमाणात नफा होऊ शकला तर महोत्सवातील शक्य तितक्या सोलो सादरीकरणांना त्यांच्या पुढच्या प्रयोगांसाठी मदत केली जाईल.

माझा एक मित्र थोडं खवचटपणे म्हणाला, "काय, तुझ्या एक्स्प्रेशन लॅबचं ते "अरंगेत्रम" कधी आहे रे?" मला हसू आलं. अरंगेत्रम हा एक वेगळा विधी आहे. त्यात काही पारंपरिक पध्दती आहेत, दक्षिणा वगैरे आहेत, उपचार आहेत, चालीरिती आहेत, कर्मकांड आहे. मी त्या पध्दतीने जाणारा माणूसही नाही. कर्मकांडाचा तर मला तिटकारा आहे. दक्षिणा घेणं सोडा, इथे माझ्या विद्यार्थ्यांना एखादा खर्च सोसत नसेल तर तोही मी अंगावर घ्यायला तयार आहे. तसा मी भणंगच आहे. ह्या उपक्रमाला असं काही विधींचं स्वरूप नाही. आपल्या मुलीचं लग्न असल्यागत उत्साह अरंगेत्रम-मूर्तीच्या पालकांमधे असतो. माझ्या मुलांचे पालक असले तर नाटक करतो-करते म्हणून रागावलेलेच असू शकतात. असो हा असा "फरक स्पष्ट करा" हा प्रश्न इथे सोडवण्याचं कारण, अरंगेत्रम या पध्दतीवर टीका करणं हा नाही तर माझ्या डोक्यातली कल्पना तिथून आलेली नाही हे सांगणं हाच आहे. दुसरा एक मित्र माझ्या मागे एका विद्यार्थ्याला म्हणाला, "अरे हे तुमचं काहीतरी इंटर्नल आहे रे ... एक्सरसाइज वगैरे .. त्यासाठी इतका जीव कुठे आटवतो?" सुदैवाने ह्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी सर्वोत्तम तिघांमधे निवडलेलं होतं. त्याचा नंतरचा एक प्रयोग पाहायला सुनील सुकथनकर, सुमित्रा भावे, किंवा त्यानंतर एकदा अतुल पेठे आले होते. त्या सर्वांच्या अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने प्रत्यक्ष ऐकल्या होत्या त्यामुळे ह्या सन्माननीय मित्राची ही प्रतिक्रीया त्याने मनावर नक्कीच घेतली नाही.

"एकाच प्रशिक्षण प्रणालीच्या तीस विद्यार्थ्यांनी लोकांसमोर येत तीस एकल-नाट्य सादर करायची असा उपक्रम भारतातच नव्हे तर जगात कुठेही होत नसावा" असं दुसरा एक मित्र म्हणाला. आपल्याबद्दल असं काही बोललं गेलं की आपण लगेच फुशारकीत जातोच. मी ही हे ऐकताच जरासा फुशारलो. पण मग भानावर आलो ...

एक खरं ... मला आणि या तीस जणांना (आणि प्रेक्षकांना ... जर कोणी फिरकलेच तर) खूप मजा येणार आहे. बाकी हे असं आणखी कुठे होतं का, किती वेळा झालंय, कसं, का वगैरे शोध ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ द्या ... आम्ही लागतो आपले आमच्या कामाला !

2 comments:

Mohana Prabhudesai Joglekar said...

फार सुरेख माहिती दिली आहे तुम्ही प्रकल्पाची. फक्त एक्सप्रेशन लॅब ऐवजी एखादं मराठीच नाव असायला हवं होतं असं वाटून गेलं. मन:पूर्वक शुभेच्छा. आम्ही दरवर्षी २ एकांकिका करतो आणि दरवेळेला सत्वपरिक्षा असल्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडतो, त्यामुळे तुमच्या कामाचं मोल किती आहे याची जाणीव आहे. जमलं तर हा दुवा पहा आमच्या एकांकिकाबद्दल - http://marathiekankika.wordpress.com/

Mohana Prabhudesai Joglekar said...

फार सुरेख माहिती दिली आहे तुम्ही प्रकल्पाची. फक्त एक्सप्रेशन लॅब ऐवजी एखादं मराठीच नाव असायला हवं होतं असं वाटून गेलं. मन:पूर्वक शुभेच्छा. आम्ही दरवर्षी २ एकांकिका करतो आणि दरवेळेला सत्वपरिक्षा असल्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडतो, त्यामुळे तुमच्या कामाचं मोल किती आहे याची जाणीव आहे. जमलं तर हा दुवा पहा आमच्या एकांकिकाबद्दल - http://marathiekankika.wordpress.com/