Tuesday, October 16

मागणं ..

हे कविते

तुझ्यासाठी काही मागतो आहे
तथास्तु म्हणशील ?

माझ्या डोळ्यांमधली
कवी बनू पाहाणारी नजर मरू दे 
माणसाचं बघणं त्यांत वसू दे निरंतर !

मान्यता ओढू पाहाणार्या 
माझ्या मनाचा कावा बारकावा ओळखून
आकर्षक पहेरावा करून
दाटीवाटी, गर्दी करणारे
फिल्मी स्ट्रगलर्ससारखे स्टार बनू पाहाणारे
शब्द मला कळू देत
मिळू दे मला एक नग्न शब्द 
केवळ अर्थ वाहणारा !

नको उभारायला मी
काचेच्या, कागदाच्या किंवा कोणत्याही
वेष्टनाचं सोवळं तुझ्यासाठी 
तुला केवळ माझा नाही
प्रत्येक वाचकाचा, श्रोत्याचा स्पर्श लाभू दे !

तुझ्या अंतरात
माझी वेदना असू दे
तिला उपद्रव नको माझाही ...
तिला धरू दे हात खुशाल 
कोणाचाही !

हे कविते
तुझ्यासाठी काही मागतो आहे
तथास्तु म्हणशील ?


1 comment:

aativas said...

म्हणो ती 'तथास्तु'