Thursday, August 9

सुपर-काला

(आपल्या समाजात सण-वार, देव-दैवतं यांच्या निमित्ताने दिसतो तो विरोधाभास कालवून केलेली ही एक हंडी .. नुकतंच सन्नी दही हंडी ला येणार हे वाचून जे विचार मनात आले त्यांचा हा एक सुपर-काला)

आमुच्या देवांचे
रक्षक आम्हीच
म्हणू कोणी नीच
नये आम्हां ||

आम्ही सण-वार
करून साजरे
आमुचे मुजरे
देतो त्यांना ||

डोळे देवांकडे
वळता आमुच्या
धरूच तुमच्या
मानगुटी ||

पावित्र्य संस्कृती
जपावी आम्हीच
अधिकार हाच
आम्हा जाणा ||

देवतांची चित्रे 
नग्न काढणारे
होतात ते प्यारे
पर-देशा ||

शाम्पेन मारुती
जुळवता नाव
आम्ही घेतो धाव
नाट्य-गृहा ||

तंग कपड्यास
आमचा विरोध
व्यंग-उपरोध
वर्ज्य आम्हा ||

आमची दैवते
आम्हा प्रिय मोठी
आम्ही त्यांच्यासाठी
काही करू ||

आमच्या सणाला
मुन्नी आणि शीला
येती नाचायला
डिस्कोसंगे ||

काळाचे आव्हान
आम्ही ओळखतो
सणामध्ये देतो
नाविन्य की ||

मिरवणुकीत 
प्रतीवर्षी हिट 
किंवा सुप्परहीट
गाणे हवे ||

उधाण आम्हाला
उत्सव देवांचे 
सिने तारकांचे 
पीक येते ||

सिने तारकांना
जोडूनच पैसा
सणाकडे ऐसा
ओढतो की ||

सणासाठी पैसा
पैशासाठी सण
अर्थाचे कारण 
सांस्कृतिक ||

संस्कृतीला देण्या
उंची अमुकशी
तमुकचि खाशी 
युक्ती काढू ||

मग येते सनी
दही हंडी साठी
असो तिच्या पाठी 
काही गैर ||

सन्नी किंवा मुन्नी
बदनाम स्त्रिया
त्यांस कैसे वाया
जाऊ द्यावे ?

उदार असावे
आलिंगन द्यावे
आपुले म्हणावे
उपेक्षिता ||

अश्या विचाराचे
किंवा अधिष्ठान
सन्नी ही लिओन
आणते की ||

बोका म्हणे आता
सन्नी येई दारा
दिवाळी दसरा
तोचि जाणा ||

No comments: