Sunday, July 1

महा(न)उपवास ...

साजूक तुपाचा
उपवास माझा
शिरा हवा ताजा
सोडण्यास ||

स्तोत्राचा तोबरा 
सकाळी भरून
पुण्याची करीन
निश्चिती मी ||

मोठा उपवास
दिवसभराचा
ठेवावा सुट्टीचा 
नको काज ||

बघावा म्हणतो
तुकाराम ताजा
ऐकावा एखादा
भीमसेन ||

दुपारी तंगड्या 
द्याव्या पसरून
देहास भरून
फराळाने ||

सायंकाळी एक
साबुदाणा वडा
उडप्याकडला
खावा जरा ||

महा-उपवास
महा पुण्य त्याचे
भरोनी घेण्याचे
सुटो नये ||

साधेल ते साधो
विठो न का साधो
फराळ न बाधो
मज उद्या ||

Photo Borrowed from purvasdaawat.blogspot.com

1 comment:

Panchtarankit said...

सात्विक आहार कधीही चांगला.