Saturday, June 30

वाट विठ्ठलाची !

चंद्रभागेतीरी
विठ्ठल ठाकला
अखंड सोहोळा
सर्व लोका ।।

विठ्ठल आगळा
माणशी वेगळा
कधीही सोवळा
नाही झाला ।।

आस मृत्तिकेची
आषाढ घनांस
तैसा पंढरीस
वारकरी ।।

विठ्ठल ही वृत्ती
विठ्ठल प्रवृत्ती
विठ्ठल निवृत्ती
कितेकांसी ।।

जन्माचे तारण
जीवन विधान
आनंद निधान
विठुराया ।।

भक्तीलोक होई
इहलोक सारा
विठ्ठल उतारा
दंभावरी ।।

सामान्याचा भाव
साधीसुधी भक्ती
त्यातूनचि शक्ती
मूर्तीला या ।।

तीव्र भावनेचे
मात्र संमीलन
उत्स्फूर्त खेलन
ऊर्जारूपी ।।

साधावया साधी
एक गळाभेट
कोटी पायपीट
पावलांची ।।

युगांची सवय
एका समाजाला
एकाचि दिशेला
चालण्याची ।।

दिशा बंधुतेची
निशाणे ऐक्याची
वाट विठ्ठलाची
समतेची ।।

No comments: