Tuesday, June 5

त्याचा गाव ...

तो भेटला
डोळ्यात एक विषारीपणा घेऊन
माझा जुना मित्र
फार जुना नाही
पण फार नाही नवाही
कसला तरी राग डोक्यात अखंड धुमसणारा तो ...
तो हल्ली कुठे कुठे काही काही करत असतो - अर्थात नाटक .. 
असं आमच्या सोबतच एक आवाज पुटपुटला
आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही
तसेच घरी गेलो .. अर्थात आपल्या आपल्या घरी !

हल्ली मला तो रोज दिसतो भेटतो
तसाच ...
रागाचे डोळे घेऊन ...
हसत-बोलत असतो कोणाकोणाशी 
पण थांबला की डोळे पुन्हा होतात रागीट.

आता आम्ही बोलत नाही
माझ्यापुरतं असं की
बोलू शकत नाही, बोलण्यासारखं काही 
आमच्यात उरलंच नाही म्हणून मी गप्पच बसतो
तो असतो तेव्हा तर विशेष गप्प
असं आहे खरं ...

परवा आमचा एक मित्र मला म्हणाला
तू मधेच सोडलीस साथ असं त्याला वाटतं म्हणून
रागावलेला असेल तो ...
किंवा ज्या गावी तो आत्ता आहे तिथे त्याला जायचंच नव्हतं 
ते तुझ्यामुळे त्याला जावं लागलं म्हणून असेल ...

असेल ते असेल .. मी म्हणालो .. आणि निघालो ...
माझ्या रस्त्याने माझ्या घरी जाताना
मनात आलं ...
आपल्याला जायचं नसेल तिकडे आपण खरंच जातो का ?
जाणारे पाय आपलेच तर असतात ...
ते पाय हलवणारा  तो  .. आपणच असतो !
हे त्याला माहित नाही का ?
असेलही - नसेलही !

आपण सगळे खरंतर एकत्र कधी नसतोच 
शेजार शेजारच्या रुळावर 
कधीतरी  एकाच दिशेने धावत जातो
पण ते तसं काही वेळच चालू शकतं 

त्या एकत्र धावण्यात ईर्षा आली की
आपल्या नकळत आपण जोरात पळू लागतो
काही वेळा तसंच पळून पळून आपण पाहातो तर 
आपण एकटे, आजूबाजूला कोणीही नाही पळणारं

आपल्याला वाटतं आपण जिंकलो !
आपल्याला वाट मिळाली आणि 
आपण ती वाट सुसाट पार केली
पण खरंतर 
प्रत्येकाचं असंच झालेलं असतं ...
आपापल्या वाटेवर 
चालत, धावत, पडत, पळत 
कसे का होईना 
आपण पोहोचतो ते आपल्या स्वतःच्याच गावी !

( यात ''मी'' असा उल्लेख आल्यामुळे हे माझ्याच आयुष्याशी संबंधित आहे असा गैरसमज करून तसे प्रश्न स्वतःला पाडून घेऊ नका ...)

1 comment:

aativas said...

आपण पोचतो ते आपल्याच गावी .. पण अनेकदा कोणालातरी अपयशाच धनी बनवलं की आपल्याला बरं वाटत इतकंच असतं ते!!