Monday, February 6

मतदान

गल्लोगल्ली येती 
मागायला मते 
शितासाठी भुते 
लाळ-घोटी ||

नाही त्यांना चाड
चिंता नाही जरा
त्यांच्या मतदारा
कष्ट काय ||

पदरात हवे
मत फक्त बाप्पा 
सुधाराच्या गप्पा
मारतील ||

निवडून येता
होतील अदृश्य 
तुम्ही ते अस्पृश्य 
व्हाल तेव्हा ||

एकेका मताचे
भांडवल त्यांचे
पीक फायद्याचे 
सत्ता-रुपी ||

भोळेपणाचा हा
मुखवटा आज
सत्ताधारी माज
पाच वर्षे ||

भुलू नये आता
त्यांच्या आवाहना
पदरी वेदना
पडो नये ||

लुबाडूनी घेती
हक्क मताचा तो
जिंकलेला होतो
अदृश्यचि ||

खोटे शिक्के सारे 
एखादा अस्सल 
शोधण्या अक्कल 
मिळो सर्वा ||

बुडवा अघोर
राक्षस हे सारे
सत्पात्री करा रे 
मतदान || 


No comments: