Monday, November 28

नवयुगी कथा !

शहरे करण्या
गावे हटवली 
जमीन व्यापली
सर्वत्र की !

पावले पावले
पुढे पुढे येता
नगर-नायटा 
वाढतोचि !

गुंठा गुंठा विके 
बळीराजा आज
पैशांचा अन माज
अतोनात 

शेती-भाती नको
ओळखी ना नाती
रंगवण्या राती
सज्ज झाला !

जमिनी विकाव्या
धन मेळवावे
अन उधळावे 
सोपे सूत्र !

जमिनीला आई 
कोण म्हणताहे ?
तिचा वाहताहे 
भार कोण ?

पीक इमल्यांचे
निघावे शेतात
अशी करी बात
शेतकरी !

झाट झाली शेती
कष्टणे सोसेना 
अशी सारी दैना
पाठीवर !

घेउनी पाहावे
हातावर हात
नव-शिरीमंत
पोरं-बाळं !

बळीराजा तुझी 
कथा नवयुगी
गाडी चार चाकी 
आली दारा !

डोळे मिटताना 
वाटे स्वप्नवत 
स्वप्नामध्ये फक्त 
इमारती !

बेफाट वाढल्या 
सर्वत्र कबरी
नवीन नगरी
रूप त्यांचे !

कबरीच्या आत
शांत निजली ती
काळी आई माती
कायमची ! 

No comments: