Monday, August 29

शहरी पावसाच्या ओव्या !!

पावसा पावसा । पड रे झड रे ।

कुठे काही कोरे । ठेवू नको ॥

 

 

पावसा पावसा । असाच पडून ।

धरणे भरून । जाई आता ॥

 

 

पावसा पावसा । आण आत्ता वात ।

विजेची कपात । नको पुढे ॥

 

 

पावसा पावसा । पीकपाणी येवो ।

महागाई राहो । मर्यादेत ॥

 

 

पावसा पावसा । घरात डांबून ।

कैद करवून । ठेवतोसि ॥

 

पावसा पावसा । सतत पडशी ।

आवाजाने तशी । झोप नाही ॥

 

पावसा पावसा । पोरांची चंगळ ।

भिजूनि बक्कळ । खेळताति ॥

 

पावसा पावसा । जावे कोठे आता ?

सर्वत्र जनता । थिजलेली ||

 

पावसा पावसा । ट्रॅफिक मुरांबे ।

सर्दी नाका झोंबे । सर्वांलागी ॥

 

पावसा पावसा । ट्रेन बंद करी ।

रजा कारभारी । घेता येते ॥

 

पावसा पावसा । रेनकोटा आत ।

धारा शिरतात । गारेगार ॥

 

पावसा भिंतींचे । वॉटर प्रूफिंग ।

असते महाग । भेदू नको ॥

 

पावसा पावसा । गॅलरीत माझ्या ।

शेवाळाचा साचा । झाला असे ॥ 

 

पावसा शरण । वॉशिंग मशिन ।

ड्रायिंगची सोय । नाही आता ॥

 

पावसा पावसा । एव्हढेच पुरे ।

थांब की नंतरे | लगोलग |

 

पावसा पावसा | तुझे कवतिक |

एव्हढेचि देख | आम्हा आता || 

No comments: