Tuesday, August 23

चेहरे !

'' हे sss ... अगदी आमीरसारखं वाटतंय ... !"
एक आवाज ..
मोबाईल वर बोलणारा
त्या आवाजाच्या चेहर्‍यावर
घाम, एक्साइट्मेंट आणि
गालांवर तिरंग्याच्या रंगपट्या !!

माझ्या समोरून एक मोर्चा जातोय ..
हातात मेणबत्या घेऊन ...
हातातल्या मेणबत्या
विझू नयेत म्हणून
विशेष उलट्या ग्लाससारखी सोय
त्यातल्या प्रत्येक मेणबत्तीला !

"भारत माता की .... "
असा अजून एक आवाज !
या आवाजाच्या चेहर्‍यावर
आणखी जास्त घाम ..
कसलातरी राग,
लाल डोळे,
ताणलेल्या शिरा !

या आरोळीच्या आवाहनासोबत
"जय !"
असा एक मोठा आवाज !
या आवाजाला कोणताही एक चेहरा नाही
त्याला आहेत फक्त पावलं ..
तालात झपझप चालणारी ..
बंद मुठी..
हवेत उगारलेल्या ...
आणि
तटाटलेल्या नसा !

"भारत माता की .."
या आवाहनावर
माझेही ओठ नकळत हलतात ..
त्या भल्या मोठ्या आवाजावर
"जय !" या शब्दाचं
परफेक्ट लिप सिन्क !

डोळ्यासमोरून
आणखी एक चेहरा सरकतो
तारवटलेल्या डोळ्यांचा ..
एका तीक्ष्ण भपकेदार वासाचा !
धुंद !

त्या नंतर तिथून
आणखी एक चेहरा सरकतो
अण्णांचा !
कोणत्यातरी आणखी एका चेहर्‍याच्या हातातल्या
पाटीवर ..
हसर्‍या अण्णांचा चेहरा !

दोन गटांमधल्या जागेतून
मी
कसाबसा रस्ता ओलांडतो ..

माझ्या मनात
सगळे चेहरे ...
सगळे आवाज !

त्या सगळ्यात..
खरा चेहरा कोणता ?

ह्या प्रश्नाने माझ्या मनात
डोकं वर काढलंय ..

मी आता रस्ता ओलांडून
पलिकडे आलो आहे !
आणि अलीकडे मागे उरलेली ...
सतत वाहात चाललेली
एक उत्स्फूर्तता ..
एका आंदोलनाच्या निमित्ताने !

No comments: