(दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला हे कळल्यावर मला सुचलेलं काही .....)
पुलंच्या उद्यानात फिरायला गेलो
तर भेटले तिथे दादोजी !
मी म्हणालो,
"दादोजी, अहो, काय झाले ?
हे काय तुमच्या नशिबी आले ?
अर्धी बाही वर करून
वर्षानुवर्षं पाहिले होते
पुस्तकात,
शिल्प म्हणून पाहिले होते
एकदाच ओझरते
लाल महालात,
आणखी कोठे कोठे
तुमची चित्रेच होती पाहिली ..
अहो, त्या काळी तुमच्या,
तुमचे फोटो कुठे होते ?
एक पुतळा उभा केला
त्याला म्हटले दादोजी
पण कल्पनेतले
दादोजी अगदी
तुमच्यासारखेच होते !
अलिकडे, माणसे बोलू लागली,
वाद-विवाद चर्चांमधे
तुम्हाला ओढू लागली,
खरं सांगतो दादोजी,
तुम्हाला होती एक
ब्राह्मण जात
ती तेव्हा आम्हाला कळली ...
आमच्यासाठी तुम्ही
शूर मर्द मराठी मावळा !
महाराजांच्या स्वराज्यातला
नव्हेत डोमकावळा !
तुमचा वेष लढवय्याचा,
ढाल-तलवारीचा ..
बाजीप्रभूंसारखी
तुमची शेंडी नव्हती दिसत,
किंवा त्यात नव्हते जानवे
गागाभट्टाच्या चित्रासारखे,
पुढेपुढे मिरवत !
आमची होती बडबड गाणी
खोट्या घोड्यांवरची ..
शहाजीचा शिवाजी,
शिवाजीचा संभाजी ...
मधेच अचानक
या सगळ्यात
कुठून उपटलात दादोजी ?"
सुस्कार्याने हसत हलके
दादोजी मग म्हणाले ..
"आम्ही कुठले मधे यायला ?
आम्ही आमचे काम केले.
आमचे आमचे जीवन होते
कर्तव्याने निभावून नेले ..
आमच्यानंतर कोणी कोणी
कुठे कुठे काय लिहिले
कुठे कोणी काय भकले,
मार्ग काय कळायला ?
आम्ही कोणीच ओलांडली
नव्हती आमची रेखा !
नव्हत्या आम्हाला अडवत
आमच्या जानव्याच्याही रेघा !
शेंडीपेक्षा आमचा जोर
मनगटातच जास्त होता
खांदा आमचा कोणाच्याही
खांद्यापासून हटत नव्हता ..
अरे, जातीपाती पाहून शत्रू
आम्हाला मते थोडीच देणार होता ?
दादोजीला माहित नाही
पुढे कोण काय म्हणते,
इतकेच होते मह्त्वाचे
महाराज समोर घडत होते
डोळ्यांमधे माऊलीच्या
स्वराज्याचे स्वप्न होते !"
मी म्हटले,"दादोजी,
आता इथेच का मुक्काम ?
कसा आणि किती दिवस ..?"
तर मधेच अडवत दादोजी
पाठ फिरवून चालू लागले,
पुतळा म्हणून ते थिजता-थिजता
शब्द माझ्या कानी आले,
"रामराज्याचा आदर्श बेटा,
ध्यानात कायम असू दे,
धोब्यासाठी राणीसुद्धा
रानावनात हिंडते,
आम्ही साधे नोकरदार
आमची काय कथा ?
नको पुरवू पाठपुरावा
वेळ घालवू वृथा !
आमच्यासाठी नको
करायला कोणीच मिरासदारी !
नको कुठलीच दादागिरी ..
अरे, बिन-संकल्पी भंपक राजे
खूप माजले राज्यात,
अश्या महालात
राहणे नको
उद्यानाची सावली बरी !
लोकापवादाच्या
नजरांपेक्षा
दुपारीची
उन्हे बरी,
डोमकावळ्यांच्या
थुंकीपेक्षा
चिमण्या-कावळ्यांची
विष्टा बरी !"
12 comments:
Khup chan lihale ahe
apratim
खुप छान..!
अप्रतिम ! हा एवढा एकच शब्द आहे माझ्याकडे :)
खरोखर अप्रतिम !
मस्तच...खर्रेच अप्रतिम...!!!
सुंदर.................जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांनी जरूर वाचावी ....दादोजी कोंडदेव ब्राम्हण होते हे आत्ता आत्ता आम्हास कळले.
अप्रतिम...
Too Good!!!
amazing
1 number!! khupach chhan. awadla.
APRATIM!
Post a Comment