Saturday, January 8

बॉम्ब !

( इतिहास, धर्म, जात यांचा आधार घेऊन होणार्‍या अपप्रचाराला / विचित्र आंदोलनांच्या आवाहनांना / जुन्या गोष्टींच्या आधारे नवीन जातीय शेगड्या पेटवणार्‍यांच्या भाषणांना बळी पडणार्‍या माझ्या बंधूंना ...)

आम्हाला फक्त भडकायचे आहे ...
कोणावर, कशावर हे नक्की नाही ..
नक्की असायची गरज नाही ..
पण कोणावर तरी भडकायचे आहे !

भडकवणारा कोणी असेल
तेव्हढाच आम्हाला प्रिय आहे
भडकण्यातच मौज आहे
भडकण्याची सर्व मजा आहे !

सूड भावना असलीच पाहिजे
जहरी जीभ सुटलीच पाहिजे
कोणालातरी मारण्या-जाळण्याची
फुर-फुरी तर उठलीच पाहिजे

सूड घेता आला तर
जीवनाला अर्थ आहे
चूड लावला नाही तर
जीवन सारे व्यर्थ आहे

कोणाकडे आहे का तेल ?
पेट्रोल नाही, डिझेल नाही
कानामधे हवंय आम्हाला
भावना भडकण्याचं तेल !

आम्ही भडकून पेटू शकतो
आम्ही भडकलो की पेटवू शकतो
आमच्या डोक्यात राख आहे
काहीही जाळून टाकू शकतो

आम्हाला दुसरा उद्योग नाही
असायची काही गरज नाही
ज्याला जिकडे हवे तिकडे
आमच्या रागाची आग जाई !

आम्ही आहोत तरूण
राहू तुम्हाला धरून
आमच्या खाण्या 'पिण्याची'
ठेवा सोय करून !

एखादी सेना, एखादी ब्रिगेड
बघा सुरू करून ..
आम्ही लगेच येऊ
तिचे मेंबर म्हणून ..

खरं-खोटं तुम्ही पाहा
आम्ही फक्त काढू जाळ
आम्हाला उद्योग देत राहा
अन तुम्ही व्हा मालामाल !

अहो, धंदाच तर करायचा आहे
लोकशाही ही मंडईच आहे
जाती-पातीच्या दुकानामधे
काड्यापेट्यांचा माल आहे !

आम्ही आहोत सुरूंग
दारू आहोत आम्ही
देश नावाचा एक बॉम्ब येथे
तयार करतोय नामी ..

एक दिवस फोडायचा आहे
बॉम्ब असा धडामकन
इतिहास नको भूगोल नको
खपून जाऊ सगळेजण

गावात शेती, छोटी नोकरी
कोणाला आहे हवी आता
पेटून उठण्याची शक्ती
जाणवते जर आम्हाला ?

आम्ही फक्त पेटत राहू
पेटत राहू पेटवत राहू !
सगळं काही राख करू
त्याच्यामधेच आम्ही मरू !

3 comments:

RUSHIKESH KARPE said...

himalayachya chaticha fodun ha kot,
gulam kele yane lok tees kot,
bhoogolachya vidhyartha bagh hi khaibar khind,
etihasachya vidhyartha bagh hi aapuli dhind..
...........shri gokhale

संदीप कासकर said...

आपली कविता अप्रतीम आहे. पण फक्त कविता म्हणूनच. एके काळी युध्द तलवारीच्या जोरावर लढवले जायचे, त्यानंतरच्या काळात बंदुकां,लढाउ विमानं,अणुशस्त्र वापरली गेली. आज त्या प्रकारचे युध्द होणार नाही. आज युध्द हे लोकसंखेच्या जोरावर केले जात आहे. आपल्या लोकांना तीथे पाठवायचं, ताथे आपली लोकसंख्या वाढवायची, आपली ताकत वाढवायची, आपले मतदार संघ उभे करायचे आणि मग म्हणायचं हे आता आमचं.
आपण मुगलांपासून, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवू शकलो- कारण तेव्हा सूध्दा सामान्य माणूस पेटून उठला म्हणूनच. आज भारता बाहेरचे शत्रू आपण ओळखतो, पण महाराष्ट्रावर आक्रमण केणारे का नाही ओळखत? भाषेवर प्रांतरचना झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ आपणास ठाउक असेलच. त्यावेळी सूध्दा सामान्य माणूस पेटून उठला तो आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतिसाठी. त्यात कोणाचाही स्वार्थ नव्हता. मला कुठल्या राजकीय पक्षाचं मत मांडायचे नाही पण आजही लढा देण्यामागे कोणाचाही स्वार्थ नाही- कारण आज लढा देणार्यांमध्ये उच्चशिक्षित, सूसज्ञ व्यकती आहेत. आपणही कधी महाराष्ट्रासाठी काही चांगले करू इछ्चित असाल तर आपणास सूध्दा महाराष्ट्राचे सहकार्य नककी मीळेल.
जय हिंद-जय महाराष्ट्र
आपला नम्र,
संदीप कासकर.

प्रकाश पोळ said...

कविता छान आहे. पण इतिहास आणि सत्याचा अपलाप करणारी आहे. जातीच्या नावावर समाजाला भडकावण्याचा उद्योग सुरु आहे आणि समाज ही त्याला बळी पडतोय हे जे चित्र तुम्हीं उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करता आहात तो कधी यशस्वी होणार नाही. कारण हा जो तथाकथित जातीवाद समाजात चालू आहे याच्या पाठीशी कोणत्या शक्ती आहेत याचं शोध आपण घ्यावा. जेम्स लेन द्वारे छ. शिवराय आणि जिजाऊ यांची अश्लील बदनामी केली गेली तरीही आम्ही गप्प राहावे अशी आपण अपेक्षा का करता ? ज्या जाती वर्चस्वाच्या भावनेने जिजाऊ बद्दल तो वादग्रस्त मजकूर लिहिलं गेला त्या जातीवादाबद्दल आपण कधीच का बोलत नाही. शिवरायांची बदनामी झाली तेव्हा केली नाही तेवढी ओरड दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यावर केली जाते याचं अर्थ काय ?
बहुजन संघटनांनी पुराव्याच्या आधारे दादोजी शिवारायंचे गुरु नाहीत हे सिद्ध केले. त्यांचे पुरावे खोडून काध्याचे सोडून विडंबन कसले करता ?

www.sahyadribana.co.cc