Thursday, November 11

भिक्कार सावकार

किती जरी असली स्तोत्रं

ह्या देवाच्या दयेचे गोडवे गाणारी

तरी मला दिसत आली आहे

ती त्याची दहशतच !

जमीनदारी आसुडांची आठवण करून देत,

पिढ्यानपिढ्या एकाच दु:खाची हाडके

माणूस नावाच्या एका कुत्र्यापुढे टाकून

मौज पाहाणारी दहशत ...

दिसतात सर्वत्र

दयावंत देवाचा कोप नको म्हणून

केलेले उपास-तापास, नवस-सायास !

कृपावंत देव म्हणजे

दयेच्या, कृपेच्या तिजोरीशेजारी बसलेला

सावकारच जणू !

काही घेतल्याशिवाय कृपा ना देणारा ..

रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांमधे

दिसतात ब्रँच ऑफिसेस !

ती चालतात जोरात ..

त्यांच्या वाढत चाललेल्या कळसांवर

ह्या साहूचे झेंडे फडकतात ...

श्रद्धेच्या गुडविलचा घेत वारेमाप फायदा,

मग दहशतीला रुपे मिळतात

धर्मांची, पंथांची, उपासना मार्गांची !

सुरूच असते अविरत

ह्या वेगळ्या अर्थशास्त्राचे मार्केटिंग ...

ह्या दयेच्या करंसीचे

"अर्थ"शास्त्र

न समजणारा ..

मी ..

रस्त्यावरचा

एक वेडा नागडा भिक्कारी ठरलेला !

No comments: