Tuesday, July 27

खंडाळ्याचा घाट .. (पाऊसगाणी मालिका .. पाऊसगाणं क्र. ४)


खंडाळ्याचा घाट
कसा घनदाट
धुक्यामधे हरवते
मुंबईची वाट

थंडथंड हवा
अस्सल गारवा
वळणा-वळणांवर
वेगळाच थाट

धुके आरपार
पावसाचा जोर
बोगद्यांच्या बाहेरही
काळोखी बेफाट

धबाधबा पाणी
भिजतात कोणी
साठवून घेत कोणी
स्वर्ग हा डोळ्यांत

अवघड वाटे
तरी मौज येते
यायलाच हवं जिथे
एका पावसात

रंग भिजलेले
डोळ्यात-मनात
नकळत येती पाहा
हातामधे हात

पावसाचा देश
वळणाची रेष
आजुबाजू पसरला
पांचू घनदाट

भिजून थिजून
दरीमध्ये घरे
प्रतिबिंबे साठलेले
तळे काठोकाठ

मनात जागवी
गोड आठवणी
वळण एकेक
एक खूणगाठ

खंडाळ्याचा घाट
दिसे घनदाट
ढगांमधे हरवली
माणसांची वाट !

3 comments:

The Wanderer said...

Aprateem ! :)

Unknown said...

खंडाळ्याचा घाट डोळ्या समोर तरंगु लागला मस्तच....

...winged wanderer... said...

Khupach chaan. I was wondering, where have your poems vanished....and finally I am heard. Bhaari kavita aahe....beshtt !!