Sunday, June 13

आला आला पाऊस !

आला आला
मावळतीचा
नेमाचा
पाऊस !

कधी सरींचा
कधी मंदसा
रिपरिपता
पाऊस !

लखलखणारा
पाझरणारा
घों घों घों
पाऊस !

झाडांमधुनी
कौलांखाली
पागोळ्या
पाऊस !

रातकिड्यांचा
बेटकुळ्यांचा
चिकचिकता
पाऊस !

महापुराचा
थैमानाचा
सणसणता
पाऊस !

हिरवाईचा
नीलकांतीचा
इंद्रधनू
पाऊस !

फुलाफुलांचा
झुल्या-झुल्यांचा
हिंदोळा
पाऊस !

शब्दा आतुन
रेषांमधला
रंगीला
पाऊस !

वाटेवरचा
आतुरतेच्या
अधीरसा
पाऊस !

प्रेमासाठी
इकडे तिकडे
घुमणारा
पाऊस !

चिंबचिंबत्या
बहाण्यांचा अन्
वहावता
पाऊस !

पानांमध्ये
ओठांवरती
रसरसता
पाऊस !

हवाहवासा
नकोनकोसा
नाकळता
पाऊस !

छळ-छळणारा
रड्-रडणारा
सतावता
पाऊस !

आवरणारा
सावरणारा
जगणारा
पाऊस !

जाता जाता
आठवणींनी
उरणारा
पाऊस !

1 comment:

Maitra Jeevache said...

Pavasachi vividh rupe pahun thand vatale. Thanks
sudheer & deepa