मृत्यू माझा कवटाळून मी जगायचे आता ...
जन्माच्या अन रितेपणाला भरायचे आता ...
कश्यापाठचे? कुणासाठीचे अविरत धावत जाणे?
वैराणातच मृगजळ प्राशून निजायचे आता ...
संध्याछाया, धूसर माया, थकले मन पांगळे
क्षण पायांशी सरसर लाटा भिजायचे आता ...
अर्थांसाठी धडधड, खळखळ अवघी, केविलवाणी
निरर्थ काळोखातच केवळ बुडायचे आता ...
छातीखाली कैदी अवखळ पक्षी फडफडणारा
अधीर त्याने तोडून चौकट उडायचे आता ...
बिंब कशाचे ? देह कुणाचा ? कोण इथे जन्मले ?
दिशांतराला या प्रश्नांच्या निघायचे आता ...
1 comment:
सुंदर कविता. शेवटची द्विपदी विशेष आवडली. प्रदीप, ह्याला चाल लावून गायला आहेस का? असल्यास आणि जालावर कुठे अपलोड केली असल्यास त्याचा दुवा कळव. ऐकायला खूप आवडेल.
Post a Comment