Saturday, November 28

कविता

कविता
यमक साधलं जातं 
ती केलेली कविता असते ...
नि नादमाधुर्याच्या वाटेने चालते,
ती असते 
येऊन प्रकट झालेली कविता !

अर्थ, वृत्त, ताल, मात्रा .... 
बद्धता कशाशीच नसते ...
असतं फक्त 
स्वातंत्र्य शब्दांना
कल्पनांचे खेळ पूर्ण करण्याचं ! 

या डावात रमतात काही शब्द ...
काही मात्र दमतात !
निघून जातात मग ..
वाट पहातात ... 
आणखी एखादा  रमणीय खेळ सुरू व्हायची
प्रकट होत असलेल्या एखाद्या कवितेच्या 
कल्पनेचा हात मिळायची !



Thursday, November 12

आठवणी

धुक्यातून अचानक 
समोर आलेल्या वाटसरूप्रमाणे 
आठवणी ...
कुठूनतरी अचानक प्रकटतात !
दोन क्षण गप्पा मारून 
पुन्हा नाहीश्या होतात
एका गडद पडद्या-आड ...
तेच परिचित माणूस
पुन्हा कधी भेटेल 
हे सांगता येत नाही ना ?
तश्याच ....

Monday, November 2

हिवाळा

तुला पाहणे
मी स्वप्नातून
धूसर धूसर
हिवाळ्यातली
सकाळ जशी !

तुझे पाहणे
मला तसे अन्
धुक्यात चमचम
वाट जशी !

तुझ्यामुळे अन्
मनात माझ्या
दवांत भिजली
बाग जशी
!