Saturday, May 23

'' घो मला असला हवा ''

कोकणची भुरळ सर्वांनाच पडते. आज मी '' घो मला असला हवा ''  पाहिला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे (मला वाटतं ..) देवराई सिनेमापासून कोंकण-प्रेमात आहेत. त्यानी या चित्रपटासाठी निवडलेली कथा छान आहे. अगदी कोंकणचीच आहे. पण सिनेमा बघताना सतत एक गोष्ट जाणवत  राहिली. दिग्दर्शक एखाद्या गोष्टीच्या प्रेमात असूनही ती गोष्ट चित्रपटात तशीच्यातशी वठेलच याची काहीही हमी नसते. म्हणजे दिग्दर्शकाला कोकण आवडतय हे ठीक, कलाकारांना ही ते नुसतं आवडून भागणार नाही. कोकण म्हणजे उकडीचे मोदक, मासे आणि वाळूचे किनारे एव्हढीच  मर्यादित व्याख्या माहित असलेल्या कलाकारांना हाताशी घेऊन कोकण तसंच्या तसं उतरवता येणं कठीण आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात जवळ्पास सर्वच कलाकारांचं वागणं, बोलणं या एका पातळीवर खटकत राहातं. त्यामुळे सिनेमाचा परिणाम साधत नाही. माझ्यासारखा कोकण्या तर सारखा हळहळतो. म्हणजे असं की इतके चांगले सीन सुचले आहेत, गाण्यांची सादरीकरणाची इतकी रंजक रचना सुचली आहे, साधली आहे तरीही हा पहिला भाग मात्र आपल्याला कोकणाची भुरळ घालू शकत नाही. सातत्याने आपण बाहेर पडतो .. विचार करतो की का हे कलाकार असे वरवरचं वागता-बोलताहेत. सिनेमाचा दुसरा भाग कथानकाच्या पातळीवर रंजक पण सादरिकरणात गोंधळाचा वाटतोय असो .. 

भावे-सुकथनकर जोडीचा हा सिनेमा नक्कीच कोकणासारखा  exotic आहे.  संगीत, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण आणि लेखन या सगळ्यात त्याचं प्रतिबिम्ब आहे. म्हणजे .. तश्या वातावरणाचं एक उत्तम चित्र हा सिनेमा करताना  त्या दोघांच्या मनात नक्कीच होतं हे जाणवत राहातं ...

... आणि ...

...  ते प्रत्यक्षात सिनेमात उतरताना गफलत झाली आहे हे ही सतत जाणवत राहातं. 

No comments: