Thursday, May 28

नियम, शिक्षा, माणुसकी आणि क्रांती

नियम कश्याकरता असतात ? कुणाकरता असतात ? ते पाळल्याने काय होतं ? आणि न पाळल्यास जी शिक्षेची तरतूद असते ... ती शिक्षा नंतर कोणालाही अमानुष का वाटते? अश्या प्रश्नांमधे मी सध्या पडलो आहे.

अमुक नियम आहेत हे आपल्याला माहित असतं ... आपण ते पाळणार असं कबूल केलेलं असतं .. (म्हणजे काही वेळा आपणच आपल्याला गृहीत धरलेलं असतं.... हे आत्ता गृहीत धरून) म्हणजे असं की '' आपल्याला काय प्रोब्लेम आहे नियम पाळायला'' असा एक आपण आपलाच positive समज करून घेतलेला असतो. आणि एक दिवस आपण तो नियम मोडतो ..

नियम मोडताना आपला नाईलाज असेल तर आपल्या मनात आपण परिणामांचीही तयारी करून ठेवलेली असतेच खरतर .. पण प्रत्यक्ष शिक्षा समोर येउन ठेपली की आपण थेट माणुसकीच्या गप्पा करू लागतो. नियमाप्रमाणे शिक्षा करणारा माणूसच मग उलट न्यायाने आपण अमानुष आणि माणुसकीच्या विरोधात जाणारा ठरवू लागतो.

पण माणुसकीचा खरा अर्थ काय ? माणुसकी म्हणजे माणसाला माणसाने दाखवलेली भूतदया का?

असा जर अर्थ असेल तर ..
  • माणूस स्वतःच्या सोयीसाठी बनवलेल्या गोष्टी मोडतो (नियम .. उदा. लाल सिग्नल तोडणे आणि घाईत पुढे जाणे ... ) तेव्हा इतर माणसांविषयी जरा तरी भूतदया त्याला वाटत असते का?
किंवा ..
  • स्वतःला इतर कोणी भूतदयेने वागवावं अश्या परिस्थितीत माणूस स्वतःला का नेऊन ठेवत असेल?
असे काही प्रश्न पडतात ...

पण जर,

''माणूस''पणा असा जर माणूसकीचा अर्थ धरला तर मात्र काही प्रश्न पडतात ...

  • माणूस नियम का आहेत हे समजून घेत नाही तेव्हा तो माणसासारखा वागत असतो का ?
  • नियम मान्य करणे, आणि आपल्या सोयीचं असेल तेव्हा ते मोडणे हे वर्तन माणसाला शोभतं का ?
  • नियम तोडणारा केवळ शिक्षा होते आहे म्हणून माणूस मानायचा तर ज्यांनी जिवापलिकडे जाऊन कधी नियम आटोकाट पाळले असतील ते काय मूर्ख असतात का ?
  • मग एक युक्तिवाद असतो की जे शहाणे आहेत त्यांनी आणखी शहाण्यासारखं वागावं, शिक्षा वगैरे करू नये .. पण या युक्तिवादातून मूर्खपणाचं समर्थन करण्याचा वेडेपणाच आपण करत नसतो का ?
  • माणसांनी माणसांकरता केलेले नियम पाळणं आणि त्यांचा आदर करणं हे जास्त ''माणुसकी''चं लक्षण नाही का ?
असो ...

नियमांपेक्षा सोयच माणूस जास्त पाहातो.

खरतर नियम करणारा माणूसही सर्वांची सोय होईल किंवा सर्वांचीच सोय नाही झाली तरी कमीतकमी गैरसोयीत सर्वांना कल्याणप्रद अशी परिस्थिति निर्माण होऊ शकेल हा विचार करत असतो .. .. नियम मोडणारा माणूस नियामामागचा हा विचार धुडकावून लावत असतो .. काही वेळा जाचक नियम, रुढी याबाबत ते होतं तेव्हा तिथेच क्रांती सुरु होतेही ....

पण प्रत्येक वेळी हे असं करणं क्रांती वगैरे नसते हे नियम मोडताना लक्षात असावं हे बरं ...

न पेक्षा ही अशी नियम-'उत्क्रांति' ही क्रांतीच्या नावाखाली स्वतःची केलेली ''क्रांतिकारक सोयच'' असते याहून अधिक काय ??

No comments: