माझे आई-वडिल नोकरी करण्याकरता मुंबईमधे आले. त्यांनी या काळात स्वतःची उत्तम प्रगति साधली आणि रिटायर झाल्यावर ते पुन्हा कोकणात गेले. या दरम्यानच्या काळात त्यानी रहाण्याच्या अनेक जागा बदलल्या. माझे वडिल प्रथम शिवाजी मंदिर च्या फ़ुटपाथ लगतच्या ताम्बे गादिवाल्यांच्या दुकानाबाहेर रात्र काढत असत .. मग ते माटुंगा रोडच्या त्यांच्या नातेवाईकांकडे राहू लागले. मग लग्न झाल्यावर जोगेश्वरीला जागा घेतली. त्यानंतर पार्ले ! आणि मग रिटायर झाल्यावर संगमेश्वर ...
या दरम्यान स्थावर मालमत्ता या सदरात कितीतरी प्रकार त्या दोघांनी केले .. म्हणजे स्वतःच घर घेणे, पगड़ी सिस्टम मधली छोटी किंवा नंतर मोठी जागा घेणे .. एखादा प्लॉट घेणे, त्याची देखरेख करणे, टैक्स भरणे .. असं बरंच काही ...
मी आता विचार करतो तेव्हा मला वाटतं की किती कुठल्या कुठल्या जागा, प्लॉट्स, हा सगळा व्याप त्यानी सांभाळला तेव्हा ती दोघंही खूप साधी माणसं होती. त्यांनी त्या त्या जागांबाबत कितीतरी स्वप्नं पहिली होती .. ती पाहताना आम्हा दोघाही मुलाना त्यांची ती स्वप्नं नि पर्यायाने त्यावर बेतलेली आमचीही स्वप्नं दिसली होती .. हळूहळू त्यांच्या प्राथमिकता बदलल्या आणि त्यांनी त्यातल्या काही जागा कायमच्या सोडल्या .. विकल्या किंवा तत्सम काही व्यवहार करुन ते सर्व बदलून गेलं.
त्या जागा, ती स्वप्नं सर्वच ... गेलं ..
गेलं? कुठे गेलं ? कसं गेलं ?
माणूस ज्या गोष्टीची स्वप्नं पाहतो त्या गोष्टीशी ती स्वप्नं पाहताना त्याने जोडलेलं ते नातं कुठे जातं ?
1 comment:
त्यांची जागा दुसरी नवी मोठी किंवा लहान स्वप्न घेतात, जसे जीवनांत बदल घडतील त्या प्रमाणे, अन् ती पहिली स्वप्नं विरून जातात.
Post a Comment