शाळेत असताना दुसऱ्यांच्या वाढदिवसाची गणितंही खूप महत्वाची ठरायची. तेव्हा ही गणितं एखाद्याचा वाढदिवस सुट्टीच्या काळात येणं, रविवारी येणं ह्यातून येणाऱ्या एका वेगळ्याच असुरक्षिततेची असायची. लहानपणी, विशेषतः प्राथमिक शाळेत हे जास्त व्हायचं. कारण वाढदिवसाला सगळ्या वर्गाला काहीतरी वाटलं जायचं. एखादी पेन्सिल ते अगदी टिफिन कॅरियरपर्यंत भेटवस्तूपासून एखादा गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स् असं काहीही. वर्गात ५२ मुलं असायची. चारपांच किंवा अगदी दहाबारा जणांचे वाढदिवस दिवाळीच्या, नाताळच्या आणि उन्हाळी सुट्टीने खाऊन टाकले तरीही चाळीसेक वाढदिवस वर्षभरात उरायचेच. आमच्या घरात तेव्हा काही वाढदिवस जोरदार साजरा करायची प्रथा नव्हती. ते परवडणारंही नव्हतं.
केक वगैरे म्हणजे "श्रीमंती थाट" वाटणाऱ्या स्तरात मी वाढत होतो त्यामुळे माझाही समज तसाच होता. अर्थात् तेव्हा केक्स् पण सर्वत्र बनत नव्हते. जे केक्स आमच्या आजूबाजूला आम्हाला पाहायला मिळायचे किंवा आम्ही ज्यांना केक म्हणायचो त्या खरंतर पेस्ट्रीज् च्या नकला असतात हे मला पुढे आठवी नववीत कळलं. माझं सगळं शिक्षण मुंबईत झालंय. मी शाळेत असताना केक कापण्याची पध्दत खरंतर जुहू भागात किंवा वांद्रा ते अंधेरीच्या पश्चिम उपनगरात जास्त प्रकर्षाने होती. माझ्या आजूबाजूला गोल्ड स्पॉटचा नंबर या बाबतीत पहिला होता. वेफर्स, एखादा समोसा किंवा बटाटा वडा किंवा कचोरी असं काही खायला देऊन सोबत गोल्ड स्पॉट असा बेत म्हणजे काय भारी वाढदिवस !
आमच्या घरी शिरा वगैरे केला जात असे. कधी तो माझ्या अगदी जवळच्या मित्रांना किंवा जवळ राहाणाऱ्या मामाला, त्याच्या आईला म्हणजे मावशी-आज्जीला किंवा माझ्या मामेभावंडाना बोलावून त्यांच्यासह खाणं, जायफळ घातलेली कॉफी सोबत पिणं असं काही वाढदिवस म्हणून केलं जायचं. पण हे काही प्लॅन वगैरे करून होत असे असं नाही. आता जिला गटारी म्हणून लोकमान्यता जास्त मिळाली आहे त्या अमावस्येचं मला माहित असलेलं नांव "दिव्यांची अंवस" असं आहे. दीप अमावस्या हा माझा तिथीप्रमाणे वाढदिवस. (पुढे जाऊन मी हे जे वेगळे किंवा नाटकातले "दिवे" लावू किंवा "पाजळू" लागलोय ते इतकं प्लॅन्ड कसं असू शकतं नाही का?) माझा वाढदिवस बऱ्याचदा आषाढ महिना संपताना दिव्याच्या पूजेसोबत आई साजरा करत असे. त्या दिवशी शिरा, खीर असा काहीतरी चांगला स्वैपाक आई करत असे, दिव्यांच्या पूजेसोबत ती मलाही ओवाळत असे त्यामुळे, "आपला वाढदिवस एखाद्या सणाच्या दिवशी असल्याची" धन्यता मला लाभे.
माझा वाढदिवस तारखेप्रमाणे सात ऑगस्टला येतो. माझ्या वर्गात माझा एकट्याचाच वाढदिवस त्या दिवशी आहे ना ह्याची पहिल्या दिवशीच खात्री पटली की बरं वाटे. तरीही मंगेश शेटे ह्या माझ्या वर्गमित्राचा वाढदिवस आठ ऑगस्ट होता. (तो आता आमच्यात नाही म्हणून "होता" असं म्हणतोय) तर माझी आणि त्याची आई (मी प्राथमिक शाळेत असताना – तिसरी पर्यंत) "वाढदिवसाला तुम्ही काय वाटणार आहात वर्गात?" ह्याची ठरवाठरव एकत्र करत असत. ह्यात परत जुलै मधल्या इतर वाढदिवसकऱ्यांनी काय वाटलंय ह्याचा हिशेबही मिळवला जात असे.
इयत्ता पहिलीपासूनच मी गाणारा म्हणून शाळेत प्रसिध्द होऊ लागलो होतो. मग माझ्या वाढदिवसाला माझ्या वर्गशिक्षिकांनी मला गाणं म्हणायला सांगायचं ही एक प्रथा पडली होती. मला तर मी वाढदिवसांना म्हटलेली गाणी अजून आठवतात. पहिलीत "माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो", दुसरीत "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख", तिसरीत "मयुरा रे फुलवीत ये रे पिसारा" ... अशी ही सगळी गाणी म्हणताना मी कुठे उभा होतो, आमच्या बर्वेबाईंची तेव्हाची चर्या असं सगळं मला नीट आठवतं. असो. आमच्या शाळेत मला चांगली वाटणारी एक प्रथा होती. शाळा भरताना, मधली सुटी संपताना घंटी वाजल्यानंतर एक कोणतं तरी गाणं लावलं जायचं. ते गाणं संपायच्या आत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्गांमधे पोहोचलं पाहिजे असा वकूब होता. त्यासाठीच्या ह्या रेकॉर्ड्स् शाळेत असत. शाळेचे टोल मारणारे शिपाई टर्नटेबलवर ती रेकॉर्ड ठेवून तिचा पहिला शांततेचा भाग असे त्यावेळात टोल वाजवत असत. म्हणजे त्या टोलांच्या वेळात रेकॉर्डच्या कोऱ्या भागाचे दोन चार फेरे होत आणि टोलातूनच गाणं सुरू होत असे. काही गाणी अशी शाळेत ऐकत लिहून घेऊनच मी बसवली होती. कधी कधी ओळखीच्या शिपायांना मी "आज अमुक गाणं लावा ना" अशी विनंतीवजा फर्माहिशही करत असे, ती ते बऱ्याचदा ऐकतही असत. चौथीपासून मला असं वाटू लागलं की वर्गात काही वस्तूचं वाटप करायचं सोडून आपण शाळेलाच एखादी रेकॉर्ड भेट द्यावी. मी काही हे करणारा पहिला नव्हतो. ह्यापूर्वीही लोकांनी हे केलं होतं.
आमच्या चाळीत कर्णिककाकांकडे रेकॉर्डप्लेयर होता. त्यांच्या मुली (रश्मीताई आणि ज्योतीताई) त्यावर बहुतांश इंग्लिश-हिंदी गाणी ऐकत. "अभंग तुकयाचे" आणि "शोले"च्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स त्यांची कव्हर्स हातात घेऊन ऐकत त्यांच्या घरात मी तासन्तास घालवल्याचं मला आठवतं. तर ह्या रेकॉर्ड्स पार्ल्यामधे तेव्हा इस्टर्न रेडियो इलेक्ट्रीकल्स ह्या एकाच दुकानात मिळत असत. चौथीच्या ऑगस्ट महिन्यात मी तिथे गेलो. शाळेसाठी भेट म्हणून अशी रेकॉर्ड घ्यायला. मला नाट्यसंगीत (अजूनही) आवडतं. त्याचा नाटकातला अतिरेक आता आवडत नसला तरीही संगीत प्रकार म्हणून आणि माझ्या सौंदर्यदृष्टीतला माझा महत्वाचा संस्कार-टप्पा म्हणून त्याचं मला खूप महत्व वाटतं. रामदास कामत माझ्या घरासमोर असेलल्या गोमंतक सोसायटीत राहायचे. त्यांचा मुलगा कौस्तुभ माझा चांगला मित्रही होता. तर मला त्या दिवशी रामदास कामतांची छोटी रेकॉर्ड मिळाली. त्या रेकॉर्डमधे त्यांची चार गाणी होती. "यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला" आणि "देवाघरचे ज्ञात कुणाला" ही दोन त्यात होती हे मला आठवतंय. मी ती रेकॉर्ड घेतली. छान पॅकिंग करून शाळेत दिली.
गाणारा होतो (आणि मी बऱ्यापैकी गायचोही) त्यामुळे शाळेची प्रार्थना आणि शाळा संपतानाचं वंदे मातरम म्हणायला पहिल्या मजल्यावर मी जायचो. शाळा सुटायच्या आधी पांच मिनिटं मी वर्गातून यासाठी बाहेर जायचो आणि शाळा भरली की हे म्हणून मी वर्गात यायचो. तर मी रेकॉर्ड दिली आणि शाळा भरण्याची घंटा वाजल्यावर जे गाणं लागलं ते "देवाघरचे ज्ञात कुणाला" होतं. मग आमची प्रार्थना होत असे. या कुंदेंदु तुषार हार धवला ... ही प्रार्थना झाली आणि मी वर्गाकडे गेलो. तेव्हा शाळेत सर्वांसाठी असलेल्या सूचना आमचे उपमुख्याध्यापक म्हात्रे सर देऊ लागले होते. मी वर्गात पोहोचेपर्यंत सूचना संपल्या होत्या .. त्यानंतर म्हात्रेसरांनी माझं नांव घेऊन ह्या रोज प्रार्थना म्हणणाऱ्या चौथी-एक मधल्या प्रदीप वैद्यचा वाढदिवस असल्याने आज जे गाणं लावलं होतं ते त्याने शाळेला भेट दिलेल्या रेकॉर्डमधलं होतं हे सांगितलं आणि वर्गातल्या मुलांनी टाळ्या पिटल्या तेव्हा मला मी काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटून गेलं होतं. मग वर्गशिक्षिका आंबर्डेकर बाईंनी कौतुक केलं. त्या तासाच्या शेवटी मी प्रथेप्रमाणे गाणं म्हटलं वगैरे.
अशा वाढदिवसांपासून सुरूवात होत होत आताच्या फेसबुक-व्हॉट्सऍप वाढदिवसांपर्यंत पन्नास वर्षांपैकी हा पंचेचाळीस वर्षांचा हा प्रवास फारच छान आठवतो. पुढे वाढदिवस म्हणजे गिफ्ट्स् ! द्यायची, घ्यायची ... त्यासाठी प्लॅनिंग वगैरे करायचं. अशी एक अवस्थाही गेली. एका मैत्रिणीला "आय् ऍम ग्लॅड यू वेअर बॉर्न" असा संदेश असंलेलं जे ग्रीटिंग कार्ड दिलं होतं ते आजही आठवतंय. बाकी मग फुलं, गुलाबाची फुलं, ग्रीटिंग कार्ड्स, डेअरी मिल्क, किट-कॅट, अमूल चॉकलेट्, हॉटेलमधले डोसे-इडल्या, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, मिल्कशेक, फालुदा, फाउंटन पेन्स, गुलाम अलीच्या कॅसेट्स्, पर्फ्युम्स, डिओस्प्रेज्, सीडीज् अशा गिफ्ट्स् च्या बदलत्या रेलचेलीतून वाढदिवस होत राहिले. कॉलेजमधे आवडत्या व्यक्तींसोबत सिनेमा, भटकंती वगैरे प्रकारही ... पण ह्या सगळ्यात केक मात्र नव्हता.
मला वाढदिवसाला केक दिसायचा तो कुडाळकरांकडे. लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीपैकी) हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ होते. आमचं त्यांच्याकडे येणंजाणंही होतं. माझी आई मोदक फार छान करते, तेव्हाही करायची, त्यामुळे आईला (मंगलावहिनींना) गणेश चतुर्थीला अगदी आग्रही आमंत्रणाने मोदक बनवायला बोलावलं जायचं. तसंच लक्ष्मीकांत (म्हणजे भाई) अर्थात् भाईकाकांच्या मुलांच्या म्हणजे टिंकू आणि चुटकीच्या वाढदिवसाला आम्हाला बोलावणं असे. भल्यामोठ्या केकचा एक भलामोठा तुकडा आम्हाला मिळत असे. त्यांचे भाऊ शशिकांत (म्हणजे दादा) अर्थात् दादाकाकांच्या मुलांच्या म्हणजे बंटी आणि राखी ह्यांच्या वाढदिवसालाही केक असे. ह्या केकचं तेव्हा आम्हाला खूप अप्रूप वाटे. त्यात अंडं असतं म्हणून आई काही तिच्या वाट्याला आलेला केक खात नसे तर तो ही आम्हालाच मिळे. एव्हढीच असली तरीही चांगली मजा होती ही. आम्हाला कधीच असं वाटलं नाही (का ते माहित नाही .. संस्कार असतील, समजूतदारपणा असेल ... काहीही असेल) की आमच्या आईबाबांनी केक आणावा, तो आम्ही कापावा इतरांना द्यावा. तेव्हा केक महागही वाटत असे ते वेगळंच. पुढे पुढे केक आमच्या आसपासही दिसू लागला. म्हणजे आमच्या चाळीतही कापला जाऊ लागला. पण आम्ही मोठे झालो होतो. आम्ही आम्ही असं मी जे म्हणतोय ते मी आणि माझी बहीण ह्या अर्थी आहे.
असो. आश्चर्य असं की माझ्या आयुष्यात मी कापलेला माझ्या वाढदिवसाचा पहिला केक २००८ साली (बहुतेक हे साल बरोबर नसेलही पण) सात ऑगस्टलाच "मात्र-रात्र"चा प्रयोग होता, तेव्हा "सुदर्शन"मधे मी कापला होता तो ! आसक्तने माझ्या आयुष्यात हे ही आणलं. आता माझ्यासोबत दिवे लावण्याच्या माझ्या कामात गुंतलेले सगळे सहकारी मित्र दरवर्षी केक घेऊन घरी येतातच. माझ्या वाढदिवसाला केक मी कापलाच नाही असं होतच नाही. पहिला केक जसा पुण्याने मला दिला तशीच आणखी एक गंमतही आहे. ह्या आधी मी सांगितलं त्याप्रमाणे मला वाढदिवसाला ओवाळलं जायचं पण ते दिव्यांच्या अंवसेला. सात ऑगस्टला मला प्रथम कोणी ओवाळलं असेल तर ते रूपालीच्या आईने. (म्हणजे माझी सासू) आहे की नाही गंमत ?
ह्या सगळ्या प्रकारांमधून येत येत मी ह्या एकावन्नाव्या वर्षापर्यंत आलो. कालच्या दिवसात व्हॉट्सॅप, फेसबुक आणि टेक्स्ट मेसेज् ह्या सर्व मार्गांनी मला सदिच्छा देणाऱ्यांची संख्या २७८१ इतकी झाली आहे. हे खूप भारावून नेणारं आहे. आजच्या जगात (ते कितीही सहजसाध्य असलं तरीही) दुसऱ्या एखाद्या माणसासाठी ते एक मिनिट माणसं काढताहेत आणि काल इतक्या जणांकरता मी तो माणूस होतो ही गोष्ट मला माझी शिधोरी वाटते. पुढे चालत राहाण्याची शिधोरी.
ह्या २७८१ व्यक्तींशिवाय, मला प्रत्यक्ष भेटायला आलेल्या, किंवा फोन करून बोललेल्या व्यक्ती आहेतच ... काहींनी आज बीलेटेड सदिच्छा पाठवल्या आहेत ..
आपला वाढदिवस अशा अशा स्थित्यंतरांमधून जाताना पाहून खूपच रोमांचक वाटतंय. त्यातूनच ह्या आठवणी, हे विचार ... हे सगळं ...
No comments:
Post a Comment