Thursday, October 25

तू ....

तू जेव्हा गाशील गाणी
जगण्याला चढेल भूल 
झटकून धूळ जन्मांची 
नाते अपुले चमकेल !

तू आई अन् अंगाई
होशील ऊब दुलईची
थरथरेल हृदयाखाली
मायेची रक्तिम ओल !

तू सहवासाची गुपिते
गाण्यांत पेरशील जेव्हा
असण्या नसण्यातून तेव्हा
श्वासांचे प्रेम उरेल ! 

तू नक्षत्रांच्या हाका
धरशील शब्दगर्भात
प्राक्तनापल्याडच माझे
अस्तित्व मला गवसेल !

वा-यांचे स्वरविभ्रम तू
जडवशील ओळींवरती
हलके माझ्या गांवाला
मग क्षितिज नवे उगवेल ! 

तू एक कहाणी माझी
एकामागे विणशील
अधुरेपण मी म्हणणारे
तू तू म्हणता संपेल !

No comments: