Tuesday, September 25

सुराज्य !

राजकारणाचे | नवे नवे रंग |
सुराज्याचे भंग | स्वप्न सारे || 

सत्तेच्या आसनी | चाललासे खेळ |
सारा बट्याबोळ | लोक-शाही ||

भ्रष्टाचार मोठे | नेत्यांचे खुशाल |
जनतेचे हाल | साहजिक ||

एकाला बोचावी | दुज्याची ताकद |
कोणी ना वाकत | कोणापुढे ||

देतो राजीनामा | एकाने म्हणावे |
दुज्यानी म्हणावे | मागे घ्या हो ||

किंवा मग जोर | तिज्यानी करावा |
आसनास द्यावा | पाठिंबाच ||

कोलांट उड्यांची | कसरत मोठी |
अशी करणारी | माकडे ही ||

साधतात नित्य | गणित पैश्याचे |
मुळी ना तत्वांचे | बांधील हे ||

खातात मिळूनी | अजीर्ण होईतो |
एखादा तोडतो | भागीदारी ||

मुदतीच्या आधी | निवडणुकीचे |
भय दावण्याचे | एकमेका ||

तुझे तू सांभाळ | झाकुनिया माझे |
असे नित्य यांचे | चाललेले ||

यामध्ये दुरावा | तो ही व्यवहार |
नसतो प्रहार | खराखुरा ||

सत्तेचा व्यापार | करती हे सारे |
आम्ही बघणारे | नपुंसक ||

कधी या विघ्नांचा | नाश व्हावयाचा ?
माणूस - माणूस | व्हावा कधी ?

1 comment:

aativas said...

प्रश्नच आहे हा!!