म्हणे आनंदाला | नाही मिती ||
दुःख दैन्य सारे | देवाच्या कृपेने |
परी दूर जाणे | दुरापास्त ||
लोकशाही नामे | कलि-युगी खेळ |
देवालाही मेळ | लागो नाही ||
घोटाळ्यांचे देण्या | नैवेद्य देवाला |
नेता आसुसला | हर एक ||
सहस्र सहस्र | ''कोटी''च्याच माळा |
राष्ट्र-देवतेला | अर्पिताति ||
दिसे ना का तुम्हा ? देवा दैन्य ऐसे |
विघ्नहर ऐसे | नाम घेता ?
उत्सव सणांची | अफू जन घेती |
घोटाळे भोगती | नेते नित्य ||
मनामध्ये भक्ती | भावाचाच देव |
भाव घेई जीव | बाजारात ||
महागाई नाव | नव्या देवतेचे |
नेत्यांना पूजेचे | वेड तिच्या ||
लंबोदर होणे | जमेल न आता |
देवा पडतील | उपवास ||
वाहने पाळणे | आता कसले हो ?
उंदीरच राहो | सोबतीला ||
भक्त दीन तरी | उत्सव करिती |
देवा त्यांना भीती | तुमचीच ||
कृपावंत तुम्ही | ऐकलेले आम्ही |
मात्र तसे तुम्ही | आहा का हो ?
राख-भुरी-माती | आम्हाला सोडती |
सर्व नेते नेती | रत्नादिक ||
देशाचाच पैसा | खाई नेतासुर |
किती पाहा क्रूर | झाला आता ||
दैत्यांचे विघ्नांचे | विनाशक तुम्ही |
पाहू किती आम्ही ? वाट आता ||
उत्सवाचे मन | नाही कोणाकडे |
तरी धिंडवडे | काढतो की ||
तुम्हा कसे बाप्पा | चालते हे ऐसे ?
काही करावेसे | सुचते का ?
चमत्कार स्वप्न | तुम्हीच दाविले |
आम्हा घडविले | पंगु मात्र ||
चमत्कार आता | मनामध्ये होवो |
लोकशक्ती येवो | आकारास ||
उलथून जावो | भ्रष्ट राज्यकर्ते |
तेव्हा सुखकर्ते | म्हणू तुम्हा ||
No comments:
Post a Comment