Wednesday, May 18

फेसबुक !

हे फेसबुक

 

तुझा चेहरा शोधतोय मी त्यात ..

 

त्या काळचा तुझा चेहरा

आज कसा दिसत असेल

ह्या कल्पनेने माझं मन हैराण

आणि माझ्या तोंडाला व्हर्चुअल फेस ..

 

भूतकाळातला तुझा चेहरा घेऊन

वर्तमानकाळातल्या सर्च मधे 

मी करून घेतो माझीच ससेहोलपट

 

माझा आत्ताचा चेहरा 

मनातला वेडेपणा मात्र तेव्हाचा ..

 

भटकत राहातो ..

 

तुझं बदललेलं नाव माहित नाही

म्हणून चरफडत राहातो ..

 

तेव्हा आणि आत्ता

आत्ता आणि तेव्हा

केव्हाचं काय हे कळत नाही ..

शोध तेव्हाचा की ओढ तेव्हाची ?

ओढ आत्ताची का शोध आत्ताचाच ?

 

एक विलक्षण कुतरओढ !

 

दोन-चार हजार फ्रेन्डस् बनतात

त्यांचे नव्याने जुने वर्ग भरतात

आणि त्या वर्गातही माझी नजर 

तुलाच शोधत राहाते !

 

तेव्हा तू स्वप्नवत वाटल्या क्षणापासून

खजील झालेला माझा

तेव्हाचा चेहरा

आता आतल्या आत राहात नाही 

 

पुन्हा भूतकाळाचे सगळे थर फोडून वर येतो

आणि

दिसू लागतो मला

 

माझं प्रोफाइल पिक्चर म्हणून !

 

 

 

(माझे एक कवी मित्र नितिन कुलकर्णी यांच्या दोन ओळींमधून सुटलेली डोक्याची खाज आज या ओळींमधून सुटली किंवा शमली !)

No comments: