Tuesday, March 1

दगडफुलं !

आम्ही काही नातेवाईक दर वर्षी दिवाळीचे चार दिवस धूर आणि फटाक्यांच्या आवाजातून सुटका करून घेण्यासाठी पुण्याबाहेर पळतो. आजकाल अगदी कुठेही जा .. आमच्यासारखे बरेच लोक आम्ही जातो तिथे आलेले असतात आणि ते तिथे येऊन फटाके वाजवतातच. पण निदान ते काही मिनिटंच वाजवतात हे त्यातल्या त्यात सुखाचं. तर २००४ च्या दिवाळीतली ही गोष्ट. हे नको ते नको म्हणता म्हणता पांचगणी-महाबळेश्वर असा आमचा बेत ठरून आम्ही पांचगणीला आलो होतो. आम्ही राहात असलेलं हॉटेल हे शासकीय पर्यटन विभागाचं असल्याने सेवकांचा आणि सेवेचा तसाच जेवणाचा आणि चवीचा एकमेकांशी सुतराम संबंध नव्हता. आणि या निराशेवर अकाली आलेल्या पावसाचा आणखी एक दाट दमट कुबट थर चढला. खोलीत बसणं अशक्य होऊ लागलं. मग काहीतरी बदल शोधत आम्ही बाहेर पडलो.

सुदैवाने जरा उघडीप होती. आकाश जांभळं निळं होतं. अगदी बोरकर किंवा अरुणाताईंच्या कृष्णाची आठवण करून देणारं. टेबललॅंडच्या चार-पाच मैलाच्या विस्तीर्ण पठारावर आम्ही पोहोचलो. जागोजाग पाण्याची डबकी आणि लाल रंगाचा चिखल. पण आता सूर्य मावळतीकडे कलू लागल्याने वरच्या रंगांमधेही जो लाल रंग फुटला होता त्याने मनाल उभारी येऊ लागली. हॉटेलमधे मुद्दामच टाळलेला संध्याकाळचा चहा घेण्यासाठी विचारपूस करावीच लागली नाही. तिथेच जवळ असलेल्या ॐ साई टी स्टॉल मधून एक हसतमुख तरतरीत इसम थेट खुर्च्या मांडत आम्हाला बोलावू लागला होता. पावसाळी दमटपणात हॉटेलच्या कोंदट वातावरणाला विसरायला लावणारे भुट्टा आणि चहा असे दोन उत्तम प्रकार समोर होते. आमच्यातल्या काहीजणांने मग एका घोडागाडीतून टॅबललँड सवारी केली. पण आम्हा खाली उरलेल्यांची स्पर्धा   भरभर चढू पाहाणार्‍या अंधाराशी होती. आम्हाला तिथेच जवळ असलेलं केव्ह रेस्तराँ पाहायला जायचं होतं पण ते आता शक्य दिसत नव्हतं. मग तिथेच बसून गाडीवर सवारीला गेलेल्या आमच्यातल्या काही जणांची वाट पाहाणं हा एकच पर्याय आता उरला होता. गाडीमधले लोक हातात चहा घेऊन गेले होते तो त्या खड्याखुड्यांच्या सवारीत सांडून जात होता. त्यांच्या अंगाला हिसडे बसत होते आणि आज टेबललँडवर फारसं कोणीच नसल्याने त्यांचं ओरडणं आम्हाला दूरवरून ऐकू येत होतं. ते बर्‍यापैकी दूर गेले होते आणि मी ॐ साई टी स्टॉलची कुतूहलातून पाहाणी करू लागलो. वीज नव्हती पण ती आजच्या अनावश्यक पावसाची कृपा होती हे तिथे टांगलेल्या बल्बज् वरून लक्षात येत होतं. गिर्‍हाइक जवळपासही नव्हतं. आम्हीच काय ते गिहाइक. एक बाई चहाचा ठेला सांभाळत उभी होती. ती आम्ही दिलेल्या नव्या ऑर्डरचा चहा बनवू लागली. ती वय आणि वागण्यावरून मालकीण असावी असं कळत होतं. एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी आणि तिचा भाऊ, साधारण दहा बारा वर्षांचा अशी दोघं बाजूला खेळत होती. बॅटरीवर चालवत असलेल्या टेपरेकॉर्डर्वर गाणी लावून त्यांचा नाच चालू होता. ती दोघं नाचत होती तिथेच मागे आणखी एक स्टॉल होता .. त्यात एकावर एक असे वीस बावीस पेले ठेवले होते .. हे सगळे पेले तीन चेंडू मारून खाली पाडून टाकण्याचा हा खेळ. आज गिहाइक नसल्याने ह्या दोन मुलांचा हा स्टॉल अगदीच रिकामा होता. अचानक मिळालेली सुट्टी नाचून साजरी होत होती. ओघातच कळत गेलं की हे दोन्हीही स्टॉल्स त्या हसतमुख मालकांचेच होते. गाडीतून परत आलेल्या माणसांनाही चहाची तल्लफ होतीच. मग त्यांच्यासाठी पुन्हा चहा झाला आणि आम्ही परत निघालो.

केव्ह रेस्तराँ पाहायला आम्ही दुसर्‍या दिवशी संध्याकाळी गेलो. आज पाऊस नसल्याने धंदा तेजीत होता. आम्ही गाडीतून बाहेर पडताच कितीतरी घोडेवाले आमच्यावर झेपावले. पण मग एका घोडेवाल्याने आमची रपेट कालच झाली आहे असं जाहीर केलं तसे सगळे आमच्यावर वेळ वाया घालवणं सोडून आपल्या धंद्याच्या मार्गाने पांगले. ॐ साई चे मालक हसत हसत आमचं स्वागत करायला सिद्ध झाले होते. काल भिजलेल्या खुर्च्या मांडणारे ते आज धूळ झटकत खुर्च्या मांडत आमची कालची ऑर्डर आम्हाला सांगू लागले. तीच ऑर्डर आज आहे ना ह्याची अशी खात्री करून घेऊन ती त्यांच्या सौंकडे पाठवत ते आणखी गिहाइकं पाहू लागले, काही आधी आलेल्यांचे हिशेब पूर्ण करू लागले. मुलांना आज काम होतं. मुलगा चटपटीत्पणे काही माणसा-पोरांना पटवत होता आणी घेऊन येत होता आणि मुलगी खेळाचं नियंत्रण, हिशेब वगैरे पाहात होती. चहा झाल्यावर आम्ही केव्ह च्या दिशेला निघालो .. आम्ही परत आल्यावर पैसे दिले तरी चालतील असं मालक म्हणाले. त्यांचं नाव जाधव असल्याचं आमच्यातल्या एका ज्येष्ठांनी त्यांच्याशी मारलेल्या विविध गप्पांचं आम्हाला झालेलं फलित. 

अरूंद शिडीच्या पायर्‍या उतरताना शेपटी असलेली कितीतरी माकडं नि त्यांच्याशी विचित्र खेळ खेळणारी बिन-शेपटीची उंची कपड्यातली माकडं यांच्यातून वाट काढत जावं लागलं. त्या भुयार्वजा वाटेतून स्वतःला सांभाळत आणि या (बिनशेपटीच्या) माकडचाळ्यांनी काही विचित्र घडू नये यासाठी प्रार्थना करत आम्ही खाली आलो. जाधवांनी बोलता बोलता गुहेतल्या हॉटेल्वाल्या माणसाचं नाव बोडस आहे असं सांगितलं होतं. गुहेतल्या हॉटेलविषयी आमच्या काहीजणांच्या रोमँटिक कल्पना होत्या. तिथे आपण एक सरप्राइज कँडललाइट डिनर इतर सगळ्यांना देऊ असा बेत आमच्यामधल्या एका तरूण जोडप्याने केलाही होता. पण हे हॉटेल अगदी साधं होतं. तिथे फक्त भजी, मिसळ आणि चहा मिळतो हे तिथे गेल्या-गेल्या कळलं. एखाद्या कँटीनच्या स्वरूपाचं पण कल्पकतेने ओंडक्याचा वापर करून केलेल्या खुर्च्या-टेबल्सची योजना असलेलं. मी बोडस कोण हे आता पाहू लागलो. बोडस छाप चेहरा शोधणं अगदीच कठीण नव्हतं. पण तेव्हाच तिथे एक मुंगुसांची जोडी आली. मी त्यांच्याकडे पाहू लागलो. दरम्यान माझ्या बायकोने बोडसांशी बोलायला सुरूवातही केली होती. पंच्याहत्तरीचा माणूस. अर्धा चेहरा पांढर्‍या दाढीने आणि उरलेला सुरकुत्यांनी भरलेला. शिडशिडीत अंगकाठी, तरतरीत डोळे. आम्ही मराठी असल्याची खात्री करून ते मराठीत बोलू लागले होते. माझ्या बायकोला तिथल्या नोकराने बोडस ठार बहिरे असल्याचं सांगूनही तिच्या अभिनय कौशल्यातून तिने "तुम्ही हे हॉटेल एव्हढ्यावरच का थांबवलंय ?" हा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला होताच. ८३-८४ च्या आसपास बोडसांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी ही गुहा पाचगणी नगरपरिषदेकडून लीजने हे जागा घेतली. पांच लाख रुपये त्यासाठी मोजून सांगली-कोरेगांवचा हा माणूस इथे येऊ लागला. पन्नासेक कामगार हाताशी घेत चिखल. राडा-रोडा यांनी भरलेली ही गुहा साफ केली. इथे एरवी वाघळं, साप आणि जंगली जनावरांचा वावर म्हणून हे स्थान दुर्लक्षितच होतं तिथे बोडसांचं हे छोटेखानी हॉटेल सुरू झालं. पण ते तसंच उरण्याचं कारण मात्र दडलं होतं ते त्याच्या सुरू होण्यातच. म्हणजे असं की ते सुरू झालं आणि त्या स्थानाला एकदम मह्त्व आलं. कोणाचेतरी डोळे चमकले आणि ह्याच जागी बिअर-बार केला पाहिजे हे स्वप्न त्या डोळ्यात विलसू लागलं. आता बिअर-बार काढला पाहिजे हे स्वप्न त्या काळी ज्या पद्धतीच्या माणसांना पडत होतं त्याच पद्धतीचा हा दुसरा माणूस पार्टनरशिप प्रपोजल घेऊन येऊ लागला .. बोडस ते नाकारू लागले आणि मग एक अठरा वर्षांचा संघर्ष सुरू झाला. स्थानिक विरोधक, त्यांना सामील दिल्लीपती आणि तरीही पाठीशी उभे असलेले काही आणि दैवावरचा हवाला यांनी भरलेली एक कहाणी आम्ही अंधार पडेपर्यंत ऐकली. कोर्टकचेर्‍या, स्टे ऑर्डर्स, गुंडांचे हल्ले, साठ न देत गेलेलं शरीर आणि तरीही डोक्यातलं स्वप्न डोळ्यात तेवत ठेवणारी जिद्द अशी एक चित्रपटाची शोभणारी कहाणी त्या गुहेच्या काळ्या पोटात उलगडत गेली. निवृत्तीच्या वयात आयुष्यभराची कमाई म्हणजे पांच लाख रुपये हातात घेऊन कोणीही नवं स्वप्न पाहात नाहीत. हा एक विलक्षण म्हातारा त्या विरळ्या स्वप्नाळूंमधला. आम्ही दोघं फक्त त्यांचं हे सगळं ऐकलं. भजी, चहा, मिसळ काहीच घेतलं नाही. इतरांना हा आम्ही बोलत बसलेला वेळ काढायला ते सगळं आवश्यक वाटलं असेलच.

आम्ही पुन्हा वर आलो. चहावाल्यांचा हिशेब करण्यापूर्वी आमच्यातली काही मंडळी पुन्हा चहा प्यायली. टेबललँडवर पूर्वी घोडा फिरवणारे आणि आता हे दोन ठेले टाकून व्यवसाय करणारे जाधव आणि त्यांचं कुटुंब. नवरा-बायकोचा दिवस इथेच निघतो. मुलं मधेच शाळेत जाऊन येतात. चहा झाले हिशेब झाले आणि आम्ही काहीजण वर दिसणार्‍या असंख्य चांदण्या पाहाण्यात गर्क झालो. आमच्यातले वयाने मोठे काहीजण त्यांच्या आयुष्यातल्या काही संघर्षांविषयी बोलू लागले होते. एकीकडे भविष्याची चर्चा सुरू झाली होती. काही वेळ असाच गेला. आणि मग कोणीतरी म्हणालं "अरे चला .. आता इथे आपणच उरलोय फक्त"

आम्ही निघालो. गाडीत बसताना माझं लक्ष माझ्या पायापासच्या पांढर्‍या दगडफुलांकडे गेलं. वाचली होती ती. कदाचित मी चिरडलं असतं त्यांना. पण मुळातच खडकावर उगवलेलं ते झाड आणि त्याच्यावरची ती फुलं आतापर्यंत किती माणसं, किती घोडी, किती गाड्या इथून गेल्या असूनही तग धरून होती. खडकावर उमललेली, तगलेली समाधानाची दोन हसरी फुलं !

(ले लेखन पांचगणीतच २००४ मधे नंतर हॉटेल मधे केलंय. आजही पांचगणीमधून पुढे जाताना केव्ह हॉटेल्मधे बोडसांना आणि टेबल लँडवरच्या जाधवांना भेटायची इच्छा होते .. एक्दा पाय वळतीलही तिकडे .. पण बोडसांचं वय आता नव्वदीच्या जवळ असेल .. ते नसतीलही कदाचित अशी शक्यता .. पण त्यांचं वय नव्वदीत असेल हाच विचार मनाला जास्त पटतो ..)

No comments: