Wednesday, February 2

जादूची फुंकर ...


चिपळूणला आईकडे बर्‍याच दिवसांत एस.टी. ने गेलो नव्हतो. यावेळी का कोणास ठाऊक पण महामंडळाकडे पुन्हा वळलो .. महामंडळाच्या लाल डब्यातून असो, किंवा निम-आराम किंवा आराम बस मधून, प्रवासाला निश्चित असं वेळापत्रक असतं त्यामुळे ताशी ४०-४५ कि.मी.पेक्षा जास्त दराने अंतर कापलं जाणार नाही याची मानसिक तयारी असतेच. ती ज्यांची नसते असे महाभाग हा संपूर्ण प्रवास चरफडत पार पाडतात .. आणि इतरजण मात्र एखाद्या माहेरवाशिणिला माहेरचं एखादं काही, सासरी वेगळं काही पटल्यानंतरही जितकं खटकेल तितक्याच शांतपणाने त्या प्रवासाशी मिळतं घेत असतात. तर काल माझा असा प्रवास अनेक वर्षांनी मी अनुभवत होतो. पुणे-चिपळूण अंतर साधारण २३५ कि.मी. आणि मधे दोन घाट त्यामुळे साधारण ६ तासांची हमी असं लक्षात घेऊनच मी गाडीत बसलो होतो. पण हल्ली महामंडळाने केलेल्या काही सुटसुटीतपणाच्या योजनांमुळे, सातार्‍याला ड्रायव्हर-कंडक्टर जोडी-बदलासाठी फार वेळ गाडी थांबत नाही; एकच जोडी ही गाडी चिपळूणपर्यंत नेते किंवा रस्त्याचं आधुनिकीकरण या नि अश्या काही बाबींमुळे अर्धा तास कमी लागून लवकर किंवा "किती झटकन आलो" असं भासमान सुख मिळण्याची शक्यता खास होती .. पण तरीही या दोघांच्या राज्यात आपण एक सामान्य प्रजा म्हणून बसायचं असतं हा माझा अनेक वर्षांचा कोंकणातल्या लाल डब्यांमधल्या प्रवासांचा अनुभव मला नक्कीच मदत करणाराच होता.

गाडी सुटली. नेहेमीप्रमाणे संबंधितांना फोन, लघुसंदेश सुटले .. तिकिटं देण्याचा कार्यक्रम पार पडेपर्यंत शिरवळमधे आमच्या गाडीची नोंद आमच्या चालकाने केली होती आणि गाडी पुढे निघाली. आता पुढला थांबा सातारा ! अश्या मानसिक तयारीतूनच बहुधा पण एक डुलकीही झाली. ही डुलकी मोडली, ती गाडी मुख्य रस्ता सोडून खडबडीत भागावर चालू लागली आहे या जाणिवेने. तर गाडी रस्त्यालगतच्या नव्याने बांधण्यात आलेल्या पारगांव-खंडाळा या खंबाटकी घाटापूर्वी येणार्‍या स्थानकात शिरली होती. या जागेपासून पुढेच पूर्वी एक टोल नाका होता, जो आता टोल वसूली पूर्ण झाल्यामुळे (चक्क) बंद केला गेला आहे (याचं श्रेय मात्र अण्णा हजारेंना नसावं कारण त्यांच्या आंदोलनापूर्वी काही दिवस हा नाका बंद केला गेला.) तर तात्पर्य हे की या स्थानकात गाडी थांबून तसं वेळेचं गणित फार बिघडेल असं वाटलं नव्हतं कारण तसंही या भागात त्या टोल नाक्यावर पंधरा-वीस मिनिटांचा वेळ जात असेच.

पारगांव-खंडाळा हे महामार्गापासून थोडंसंच आत असलेलं एक (बहुधा) बाजाराचं गांव. त्यामुळे तिथे दुकानं, वस्ती बर्‍यापैकी आहे. पण लांब पल्याच्या गाड्यांचा फायदा इथल्या स्थानिकांना मिळावा म्हणून हे स्थानक बहुधा नव्यानं बांधलं असावं. हे पूर्वी नव्ह्तं हे नक्कीच .. त्यामुळे इथे चालक-वाहक जरी जेवायला २० मिनिटं थांबले तरी आपण काय नि कोठे जेवणार हा प्रश्नच होता. मग अश्यावेळी अंदाज घेत एखादा वडापाव, चहा आणि वेफर्स खावे का असा विचार करत आणि या स्थानकाकडे पाहाताना पोलादपूर स्थानकाची आठवण काढत त्यातली साधर्म्य पाहात मी वेळ काढत फिरत होतो. 

बरेचसे स्थानिक विक्रेते हिंदीत मला काही विचारून जात होते. माणसं पाहून नेमकं विचारण्याची, आणि भाषेचा नेमका वापर त्या-त्या पद्धतीने बदलत जाण्याची त्या सर्वांची शैली मला विशेष वाटू लागली. मग पांच रुपयात पाव शेर चणे मागणार्‍या एका गांवाकडच्या म्हातार्‍या गिर्‍हाइकाला त्याच्याच शब्दांत पकडत इरसालपणे शेरे मारत आजूबाजूच्या प्रवाशांकडून दाद उकळत आणखी धंदा साधणारा एक विक्रेताही मला भावला. असं सगळं आजूबाजूला .. आणखी जोडीदार मिळवून आता डबे काढू लागलेले आमचे चालक-वाहक, खमंग तेलकट वासांमुळे पोटातली जाणवू लागलेली भूक आणि बस-स्थानकाचा एक खास असा बस्स, गजबजाट !

त्या गजबजाटामधेच गेला काही वेळ एक शीळ माझ्या कानावर पडत होती. कोण वाजवतंय, कुठे आहे असे प्रश्न पडत नव्हते पण एक गाणं वाजवलं जातंय आणि ते अधूनमधून ऐकू येतंय हे जाणवत होतं त्या त्या वेळी. मामाकडे असताना गावात डोंगरावरच्या पाटीलवाडीत किंवा बौद्धवाडीत लाऊडस्पीकर लावल्यावर वार्‍याच्या झोताबरोबर आवाज येत-जात असे तेव्हा एखादं गाणं जसं ऐकू येई, तसं हे चालू होतं. हळूहळू त्या गाण्यावर कान स्थिरावत गेले तेव्हा "जब भी जी चाहे नयीं दुनिया बसा लेते है लोग । एक चेहरे पे कईं चेहरे लगा लेते हैं लोग । " हे ते गाणं हे लक्षात आलं. मधेच दोन शब्द किंवा एखाद-दुसरी किंवा अर्धीमुर्धी ओळ उमटून परत हरवून जाणारं ते कुणाच्यातरी शीळ वाजवण्यातून चांगलं वठत असलेलं ते गाणं जरावेळानं संपलं आणि दुसरं गाणं त्याच शीळेवर सुरू झालं .. तोच माणूस ती वाजवतो आहे हे कानांना कळत होतंच .. ओ बसंती पवन पागल ना जा रे ना जा .. हे गाणं आता असंच वाजत-वाजत, फिरत-फिरत, नाहीसं होत, पुन्हा प्रकटत अचानक माझ्या फार जवळून वाजू लागलं .. वळून पाहिलं तर तो एक बिस्किट गोळ्या विकणारा !

एक पन्नाशीचा बिस्किटं, वेफर्स आणि गोळ्यांची पाकिटं विकणारा विक्रेता शीळ वाजवत आपला धंदा करत होता. सर्व माल पांच पांच रुपये. त्यामुळे एकीकडे तोंडातून ही शीळ आणि दुसरीकडे हाताने आणि हावभावांनी गिर्‍हाईकाशी संपर्क असं त्याचं चालू होतं. बोलायचं कामच नाही. तोंडाने शीळ आणि हातांनी खुणा फक्त. तो कोणाशीही काही्ही बोलतच नव्हता. शीळ ऐकून लोक वळत होते जे पाहिजे ते उचलत होते आणि पांचाच्या पटीतले पैसे ठेवत होते .. आणि तो तसे ते परतही देत होता. बसेसच्या खिडक्यांखालून, स्थानकातल्या गर्दीतून हे असं मस्त चालू होतं.

मग ते गाणं मी जवळपास त्याचा पाठलाग केल्यागत फिरून ऐकलं. केव्हातरी ते गाणं संपताना त्याच्या हे लक्षात आलं. त्याने भुवयांनी खुणा करत मला "काय हवंय ..? सगळा माल पांच-पांच रुपये .." हे पुन्हा सांगितलं .. मी "शीळ कितीला ?" असं खुणेने विचारलं. तसा तो लाजून हसला .. काहीच बोलला नाही. जवळच्या एका कट्ट्यावर त्याने आपलं सामान टेकवलं आणि मग तिथेच एक मैफिल जमली. रस्म-ए-उल्फत आणि मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है .. ही दोन गाणी .. काही इतरही जमले .. आजूबाजूचा सगळा फापटपसारा, सगळा गोंधळ एका बाजूला चालूच होता आणि एका बाजूला आमची ही मैफिल.

अचानक आमच्या गाडीची घंटी वाजू लागल्याचं माझ्या लक्षात आलं. मी खिशातून वीस रुपयांची एक नोट काढून त्याला देत नुसतं ओठांनीच थॅंक्यू म्हणालो आणि तिथून निघालो. 

मला जवळपास धावतच गाडीकडे यावं लागलो. पटकन सातार्‍याला पोहोचायचं असून पारगांवातच या गाडीचा इतका टाईमपास झाल्याचं सहन न झालेला एक सातारकर प्रवासी मला शिव्या घालत असावा. मी आत येताच गाडीचा रिव्हर्स पडला. मी माझ्या जागेवर बसताना मला दिसलं ते एव्हढंच की तो विक्रेता पुन्हा त्याच्या शीळयुक्त व्यापाराला लागला होता. आता त्याने कोणतं गाणं घेतलंय ते मात्र मला समजणार नव्हतं.

त्याच्या शीळ-मैफिलीच्या प्रभावाखाली आणि त्यामुळे फुललेला हसरा चेहरा घेऊन मी त्यानंतर काही वेळ बसलो होतो. आता खंबाटकी घाटात बस चढणीवर आली आणि मागे सोडलेलं पारगांव खाली लांबवर दिसू लागलं. या गांवाशी खरंतर काहीच ओळख नाही. सातार्‍याच्या दिशेने जाताना असंच ते दिसतं तिथे पसरलेलं. नेहेमीच. आज मात्र त्याच्या विषयी एक आपुलकीची भावना मनात येत होती. त्यात जमलेली ती शीळ-मैफिल आठवत होती .. मला वाटतं आता ती तर मला नेहेमीच आठवेल. कधी गाडी थांबली तर किंवा थांबवून पाहावंसं वाटेल. अशी सगळी आपुलकी आज काही क्षणात निर्माण झाली की ! कशी ? का ?

जादू आहे ही. माणसा-माणसांमधली. आज तीच जादू अवतरली तिथे. ती शीळ. तिच्यातली ती फुंकर .. आणि त्या फुंकरीत भरली होती तीच जादू !

प्रदीप वैद्य .. (२ फेब्रु .. खंबाटकी घाटानंतर बसमधे)