Monday, September 28

माझा तुझा चंद्र !

माझ्या नवीन (होऊ घातलेल्या) अल्बम मधील एक गीत .. मीच लिहिलेलं ...

पूर्वेला हासणारा
क्षितिजावर वाकणारा
डोळ्यात खुणावणारा
ढगात विसावणारा
माझा तुझा .. हा .. चंद्र !

आकाश तुझे नि माझे
ढळणार्‍या तारकेचे
आकाशाच्या नक्षीला
स्वप्ने चंदेरी विणतो
पुन्हा पुन्हा ... हा .. चंद्र !

एखादी रात्र वेडी
साथही नशाच थोडी
कुठे चुकते पाऊल
तरी त्यावर ताल धरतो
नवा नवा ... हा ... चंद्र !

दोघांचे एक गाणे
एकाच दिशेत जाणे
निळी वाट चालताना
प्रेमातुन पाहणारा
माझा तुझा ... हा .. चंद्र !

कोडे

श्वासांचे कोडे सुटले अन् श्वास कसा थांबला ?
निमिषाची घटना सरल्यागत त्रास कसा संपला ?

थेंबांच्या खुणा पुसणारे ऊन पुन्हा सरसरले
एका थेंबाच्या वक्षी पण सूर्य कसा गुंतला ?

असताना मी, नसल्यागत का जग हे सारे होते ?
निरोप माझा अन् घेण्याचा उत्सव का रंगला ?

क्षणक्षण मोजून झाले ओझे सरल्या वास्तवाचे
कणकण विस्तव घेत जिण्यातून शांतपणा झिंगला !

तुला अखेरी झाले ओझे माझ्या रडगाण्याचे
अन् अश्रूंतच माझ्या का हा जीव तुझा गुंतला ?

शेवटला मी सांगून जातो, पुढचा हा इतिहास ..
दिसेल माझ्या रक्तामध्ये सूर्य तुझा गोंदला !

किंमत

आज एक विचार आला मनात ...
एक माणूस सिग्नलवर पादचारी लोकांना हिरवा सिग्नल असताना रस्ता क्रॉस करत असेल आणि त्याला ठोकर बसते एका गाडीची ... जी एक धनाढ्य, वजनदार माणूस चालवतो आहे ...
पादचारी मरण पावतो ..
या मृत माणसाची किंमत काय ?