Monday, May 18

लग्न समारंभ आणि 'आपला हात जगन्नाथ' !!

<< आपले लग्न समारंभ >>

आजकाल आपण मध्यमवर्गीय लोक जे लग्न समारंभ साजरे करतो त्यांच्याबद्दल पुन्हा एक सखोल आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला अतिशय थेट वाटू लागलं आहे.

आपल्या साहेबी अनुकरणाचा भाग असलेली बुफे पद्धत तर आपल्या समारंभांमधल्या जेवणाच्या कोणत्याही रिवाजांना बाद करेल अशीच आहे. मुळात भारतीय खाणं हे बुफे पद्धतीला अनुरूप नाही. डाळ / वरण - भात, सार, एक सुख्खी भाजी, एक रस भाजी, भजी, चटणी- कोशिंबीर, लोणचं, शिवाय पुरी आणि पक्वान्न एव्हढा सगळा बेत असतो .. त्यात आजकाल शेवपुरी, सुरळीच्या वड्या, असे काही पदार्थ वाढले आहेतच ...


'आपला हात जगन्नाथ' या बुफे पद्धतीच्या नियमाला शरण जाऊन अनेक वयोवृद्ध आपापल्या 'ताटांची' वजनं उचलण्याचा महत्प्रयास करण्यातच गुंतलेली दिसतात. एक कडेवर आणि एक हातात अश्या मुलांना सांभाळत दोन दोन ताटे हातात असलेल्या आयांचीही काही वेगळी त्रेधा उडत नाही. त्यात कधी ताटच जमिनीवर पडतं, कधी काहींचं अन्न पडतं, मग त्याच्या साफ-सफाईचे अत्यंत ओन्गळ प्रकार त्या सगळ्या गर्दीतच सुरु होतात. तशी काही टेबल-खुर्च्या मांडलेली असतातही पण ती पकडून बसण्याची अहमहमिकाही असतेच ! पाहुणे असलो तरी ''survival of the fittest'' हा नियम इथेही आपली पाठ न सोडायला चुकत नाही.

बुफे पद्धतीचा अवलंब करताना कार्याच्या यजमानांना आजकाल आपण यजमान आहोत आणि आपल्याकडे काही कार्यानिमित्त जेवायला पाहुणे बोलावले आहेत याचाच विसर पडू लागलेला दिसतो. आपण जेवणाची व्यवस्था (!) लावून दिली आहे या समजात (किंवा गैर-समजात !) एकदा का लग्न लागलं की यजमान इतर पै-पाहुण्यांच्या सरबराईत गुंतत जातात आणि (हल्ली आवर्जून हॉलच्याच एक वेगळ्या भागात केलेल्या खास व्यवस्थेत ! ) जेवायला गेलेल्याना मात्र जो अनुभव येतो तो काही औरच ... !


आपण घरी कोणाला जेवायला बोलावलं आणि ते माणूस आल्यावर आपण टी व्ही पाहात बसलो आणि त्या जेवायला आलेल्याला 'स्वतःचं काय ते वाढून घे नि जेव रे बाबा' असं सांगावं तसा हा सर्व अनुभव असतो. त्यात हॉल छोटा आणि गावभरची माणसं बोलावलेली असा प्रकारही सर्रास असतोच ! त्यामुळे नको हे समारंभाचं जेवण अशी आलेल्या सर्वांची एकंदर मानसिकता निर्माण व्हायलाच आपण प्रोत्साहन देतो आहोत याची कोणालाच काहीच कल्पना नसल्याप्रमाणे सर्व यथास्थित चालूच राहातं.


पंगतीच्या जेवणात सर्व काही आलबेल असतं असं काही नाही. तिथे वैयक्तिक लक्ष, बसून जेवण, सगळे पदार्थ वाढले जाणं असे काही फायदे असले तरी पुढल्या पंगतीत जेवायला उत्सुक मंडळी, आधीच्या पंगतीतल्या जेवत असलेल्या लोकांमागेच उभे राहून त्यांना एका अर्थी 'उठा आता' असा सन्देश देत रसभंग करतातच ...


ह्या सगळ्या प्रकारांनी आपल्या कार्यामधे काहीतरी चुकतय याची वधु-वर, माता-पिता यांना कल्पना असते का ? का कल्पना असली तरी आपण कुठे-कुठे लक्ष घालणार, किंवा एव्हढ्या मोठ्या कार्यात अश्या थोड्याफार गोष्टी होणार .. त्यांना काय महत्व द्यायचं ? अश्या विचारातून ते यात लक्षच घालत नाहीत ?


माहीत नाही ...


पण या सगळ्यामधून मार्ग काढता येतो असं मला वाटतं ... आटोपशीरपणा, खरी आस्था, अगत्य आणि विवाहात बोलावलेल्या लोकांबद्दल खरं प्रेम जर सोबत असेल तर यजमानांनी सोय फक्त आपली स्वतःचीच पाहिली असं होणार नाही ...


आणि .. समारंभामधे खरी शोभाही विराजमान होऊ शकेल .. नाहीतर 'घरचं झालं थोडं ...' अश्याच मनःस्थितीत यजमान मंडळी आणि 'भीक नको पण ...' अश्या काहीश्या मनःस्थितीत पाहुणे अशी लग्नं आता तरी आपण सर्वांनीच थांबवावीत असं मनापासून वाटतंय.

2 comments:

आशा जोगळेकर said...

आजकाल वाढायला अन् वाकायला जमत नाही हो बायका मुलींना अन् पाटावर बसताना ही ब-याच जणांची
पंचाइत होते ।

Swapnali said...

I agree with you completely. Changes need to be boldly yet, gracefully made in our customs and traditions.