Showing posts with label रविंद्रनाथ टागोर. Show all posts
Showing posts with label रविंद्रनाथ टागोर. Show all posts

Wednesday, September 1

लाल चाफा

तुझ्या वाहत्या पाण्याच्या लाटांवर
माझं चित्र कसं विखुरलय ...
तुझ्या काठावर मी उभा
अविचल, निश्चल
माझ्या फुलांच्या डोळ्यांचा मी !
माझ्या गंभीरतेतच आत
खोल खोल दडलंय माझं झुलणं ..
माझं पालवणं
बहरणं
आणि
एक अनामिक जीवनेच्छा !
गंभीर गाभार्‍यातून सरसरतो
फुलणारा पूर
भिडतो आभाळाला
आणि
नीरव शांततेची एक पहाट
छेदतो ..
पूर्व दिशेला !

मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर
मुक्त अनुवाद मी केला ''चैत्र'' या नाटकासाठी.

तुझ्या नव्या रूपाबद्दल ..

तुझी वाट अनिवार पाहाता पाहाता

अन

आयुष्याचे कण मोजता मोजता

वसंताच्या एका शुभ्र सकाळचं तुझं येणं ..

मृत्यूच्या सूक्ष्म जाणिवांवरही विजय मिळवलेलं तुझं रूप ...

चैतन्याने भारलेला तुझा आवाज ...

सृष्टीतल्या अवघ्या फुलांचा दरवळ

केसांत माळलेली फुलं ?

की

चांदण्यात हरवलेली ?

असे लाखो संभ्रम !

आणि

त्यातच आणखी संभ्रमात पाडणारं

तुझं हे हंसू !

या तुझ्या दिसण्यात,

हसण्यात ..

मृत्यूने

आपले बाण तर लपवून ठेवले नाहीत ना ?

(मूळ कविता : रविंद्रनाथ टागोर. मी केलेला मुक्त अनुवाद .. नाटक चैत्र. त्यात अश्या अनेक कविता आहेत ज्या प्रयोगात वापरल्या नव्हत्या.)