Sunday, April 1

शहाणपणाची भाषा

अनेकदा असं असतं की एखादा शहाणपणाचा सल्ला, सुविचार किंवा किस्सा हा वेगवेगळी रूपं घेऊन आपल्यासमोर येत असतो. आपल्याला शाळेत शिक्षकांनी काही सांगितलं असतं, घरचे किंवा नातेवाईक एक सांगत असतात, उजव्या किंवा डाव्या अशा ज्या कुठल्या विचारधारेच्या निमित्ताने आपण जे जे म्हणून काही शहाणपण ऐकत असतो त्या सगळ्यात काही दुसरंच सांगितलं जात असतं आमि मग कधीतरी आपण इजिप्त किंवा भलत्याच कुठल्या देशात फिरत असतो तिथला गाइड आपल्याला तीच गोष्ट स्थानिक लोककथेत सांगितली जाते असं सांगतो. तात्पर्य माणसाला जाणवणारं शहाणपण हे सर्वत्र सारखंच असतं. सेल्फ हेल्प बुक्स हा असा सार्वत्रिक शहाणपाणाला साक्षात्कारी रूप देऊन विकाऊ बनवण्याचा बऱ्याचदा तद्दन वाटणारा प्रकार झालेला दिसतो. त्यामुळे हल्ली आपण असं काही शहाणपणाविषयी बोलावं-लिहावं तर ते एखाद्या अशा पुस्तकातून घेतलं गेलं की काय असं वाटू शकेल असा एक घोळ होऊन बसला आहे. तात्पर्य हे की मी यापुढे जे लिहिणार आहे ते कदाचित त्या चालीवरचं वाटेल .. पण मला नाटकवाला म्हणून अनेक वर्षं सातत्याने जाणवणाऱ्या काही बाबी मी इथे नमूद करू इच्छितो. 
एकंदरच माझ्या आजूबाजूच्या नाट्यकलेच्या प्रांतात मला एक सार्वत्रिक नकारात्मकता जाणवते. अं-हं, मी सध्या आजूबाजूला काय चालू आहे याबद्दल काही मांडताना जो नकारात्मक सूर बहुतांश नाटककार लावतात त्याबद्दल बोलत नाही आहे. असा नकारात्मक सूर हा त्यांच्या मतांचा भाग असेल आणि तो कलाकार म्हणून त्यांना आवश्यक वाटत असेल तर तो नक्कीच स्वागतार्ह आहे.
मी जो नकारात्मक सूर म्हणतो आहे तो नाट्यकलेच्या एकंदर व्यवहाराबाबत म्हणतो आहे. मी काही यापासून पूर्णपणे मुक्त आहे असं मी म्हणत नाही. पण मी स्वतःही हे किती वेळा करत असे आणि आता करतो याचं निरीक्षण मी सातत्याने करत आलो आहे. हे मला अगदी प्रत्यक्ष दडपणाच्या स्वरूपात स्पष्ट जाणवत असे त्या क्षणांचं उदाहरण घेऊनच सांगतो. मी मुंबईत जे काही थोडं फार नाटक केलं ते एका हौशी स्वरूपाच्या संस्थेतून. या संस्थेच्या कामकाजात प्रथम काही वर्षं आम्ही आमच्या मोठ्यांचं ऐकत असू आणि ते जे सांगतील ते काम करत असू. त्या सर्वांच्या अंगी चिकाटी हा गुण फार जोरकस होता. आम्ही भलभलत्या परिस्थितीतून तग धरून नाटक, संगीतविषयक अनेक मोठेमोठे कार्यक्रम तेव्हा राबवले पण त्या प्रत्येक वेळी कुणाकडे काही साह्य मागायला जाताना मनात एक प्रचंड धाकधूक असायची. पार्ल्यात असल्यामुळे सांस्कृतिक कामावर प्रेम करणारे आणि त्याला स्वतःहून मदतीचा हात पुढे करणारे कितीतरी आपले लोक होते. ते सगळे हक्काचे होते. पण तरीही स्मरणिकेसाठी जाहिरात मागायला जाताना, देणगी मागताना हृदयात थरकाप असायचाच. आमचे एक काका होते. अगदी हक्काचे. ते वेळेस पांच आकडी मदतही करत. त्यावेळी म्हणजे सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी पांच आकडी मदत म्हणजे बघा .. तर त्यांच्याशी फोन आधाच झालेला असायचा. आम्ही मुलं तो चेक किंवा पाकिट आणायलाच गेलेली असायचो, पण तेव्हाही मनात धाकधूक असायचीच. काहीतरी गडबड होईल का असी थेट नसली तरी ते पैसे प्रत्यक्ष हातात येईपर्यंत विश्वास बसत नसे की काही चांगलं होणार आहे. त्या काकांचीही गंमत अशी की ते छान मदत करायचे, काहीतरी खाऊ द्यायचे (हे त्यांची बायको करत असे .. त्या त्यांच्याकडे आम्ही गेलो की काहीतरी वेगळा, दाक्षिणात्य आणि खूप चविष्ट खाऊ पुढे करतच असत) तर तो खाऊ खाताना, चहा पिताना ज्या गप्पा होत त्यात हे काका आवर्जून त्यांच्या बालपणी ते कसे भिक्षा मागत मोठे झाले याचे किस्से सांगत. ॐ भवति भिक्षां मे देहि .. अशी आरोळीही ठोकून दाखवत. भिक्षा हे भिकेचं गोंडस रूप असल्याचं मला त्यावेळी आवर्जून वाटून जात असे. मला नवल वाटत असे की ते असं का नेहमी सांगतात. म्हणजे ते आता इतके मोठे झाले आहेत, आम्हाला ते आनंदानेच मदत करतात तर मग दर वेळी आम्ही भीक घ्यायला आलो आहोत अशा स्वरूपाचं हे ऐकायला मला जरा वावगंच वाटायचं .. पण बंडखोरी त्यावेळी तरी इतकी अंगात शिरली किंवा स्थिरावली नव्हती .. शिवाय गरजवंताला अक्कल नसते या चालीवर गरजवंत बंडखोर कसा असून चालेल? यावरच विश्वास जास्त होता.
असो. आपण जे काही काम करत आहोत त्याला गरज पडल्यास जे काही साह्य लागेल ते घेताना शरम किंवा लाज वाटण्यामागे आपला एक प्रकारचा मध्यमवर्गीय संस्कारही आपल्यावर सतत काम करत असतो. हे एरवी पैसे कर्जाऊ घेताना वाटणारच. पण पैशांबाबत आणि एकंदरच साधन सामुग्रीबाबत आपले मध्यमवर्गीय समज नाटकवाले म्हणूनही आपल्या सतत आडच येत राहातात हे माझं निरीक्षण आहे. मध्यमवर्गीय विचारांमधे कलाविचार बसवणं हे सरोदसाठी शिवलेल्या गवसणीमधे तंबोरा घुसवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.
उदाहरणार्थ नाटक करायला घेताना त्याचे कमीतकमी अमुक प्रयोग करण्यासाठी ते आपण करतो का ? आपण बऱ्याचदा पहिल्या एक दोन प्रयोगांपलिकडे त्या नाटकाचा प्रवास पाहिलेलाच नसतो. आपल्याकडे आपण सर्वसामान्यपणे “नाटक बसवतो”. मी गांवाला गुरं राखण्याचं कामही काही वेळा केलं आहे. या गुरं राखण्याच्या कामात म्हशींना पाण्यात बसवतात. मला नाटक बसवणं हा शब्द प्रयोग म्हशी बसवल्यासारखा वाटतो. नाटक आपण उभं का करू नये ? ते चालायला हवं असेल तर कमीत कमी हे व्हायला हवं की नाही ? असे बालिश प्रश्न मी स्वतःला पाडून घेतलं आहेत. मी आवर्जून हाच शब्दप्रयोग वापरत असतो. नाटक उभं राहातं, उभं राहिलं .. आता ते चालायला लागेल .. हे कसं छान वाटतं की नाही .. कधी चटकन् दुडूदुडू धावायला लागेल अशी शक्यता ही जाणवून जाते.
नाटकाच्या प्रयोगांबाबत बोलताना आपण सगळे चर्चा करत राहातो प्रेक्षक न येण्याबद्दल .. पण कितीतरी नाटकांना प्रेक्षक जातात की. कितीतरी नाटकांविषयी सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठे कलाकार पोस्ट्स् लिहितात की .. फक्त ते आपल्या नाटकाबाबत होत नाही. आपल्या नाटकाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे पंख आपण देतो का ? ज्या लोकांनी आपलं नाटक पाहायला यावं असं आपल्याला वाटतं, त्यांच्या डोळ्यांनी आपण एकदा आपलं नाटक पाहातो का ? का मग आपल्या घट्टपणात आपण आपल्या नाटकाला थिजवतो, बसवतो आणि मग प्रेक्षकांची वाट पाहात आपणही बसतो ?
“बघू काय होतं? पहिला प्रयोग तर ठरला आहे.”
“आमचं नाटक पाहायला कोणीही येत नाही”
“आज आम्ही जिंकलो. प्रेक्षागृहात रंगमंचावरच्या लोकांपेक्षा कमी लोक होते”
“लोकांना घरातून ओढून आणायचं कसं?”
असे उद्गार आपण आपल्या चहाबीडीच्या चर्चांमधे कधी गांभिर्याने तर कधी मजेशीर पध्दतीने काढत असतो. पण जास्तीत जास्त लोकांना आपण आपल्या नाटकाबद्दल सांगतो आहोत, इतरांच्या नाटकांबद्दल सांगतो आहोत, नाटक या कलेबद्दल किंवा ती महत्वाची आणि वेगळी का आहे याबद्दल सांगतो आहोत असे क्षण या चर्चांच्या तुलनेत नगण्यच असतात. हल्लीची मुले, काय त्यांची भाषा, काय त्यांचं भान अशा टीकात्म चर्चा सातत्याने झडवण्यात आपण अग्रेसर असतो, पण त्यांचा जो काही संस्कार असेल त्यातून मी माझ्या कलेसाठी माणसं उभी करीन, त्यांच्यामधे भाषिक संस्कार किंवा एकंदर कलात्मक जाणिवा विकसित व्हाव्यात अशी भूक निर्माण करीन यासाठी काही करण्यात मात्र आपली शेपूट मागे वळून नाहिशी होते. जे कोणी असं काही काम करतात त्यांच्या निर्भत्सनेत आपला वेळ मस्त जातो पण ज्यावेळी आपण त्यांना गांभिर्याने घ्यायला लागतो तेव्हा खूप उशीर झालेला असू शकतो.
आपल्या नाटकाला प्रेक्षकांसाठी आपण सिध्द करतो का? प्रेक्षकांना सामोरं जाण्यासाठी ते उभं राहिलेलं असतं का? का ते केवळ आपलंच बुजरेपण सोंगासारखं घेऊन, आपल्याला जेव्हढं म्हणायचंय तेव्हढं म्हणण्याची धडपड करत राहाणारं एक कमअसल किंवा कमी आत्मविश्वासाचं बाळ असतं ? किंवा ते थरथरत्या पायांचा एक केवळ लटपटता विचार असतं ? आपल्याला म्हणायचंय ते आपण मांडत असतोच कोणत्याही कलाप्रकारात, पण आपला सूर कोणता, कसा, कुणासाठी, कधी, का, नेमका किती, कुठे असे सर्व प्रश्न आपण पुरेसे सोडवलेले असतात का?
आपल्या कलेविषयी आपण जी भाषा वापरतो, त्यात आपल्याला आपण आपल्या कलेविषयी नक्की काय करतो आहोत याचं प्रतिबिंब दिसतं. नाटक चाललं नाही की आपण म्हणतो नाटक पडलं. आपल्याला ही प्रतिमा का आपलीशी करावीशी वाटते. आपण नाटक लाजलं, किंवा हिरमुसलं अशा स्वरूपाचे काही शब्द का नाही योजत, योजले? मी नाटक चालवणार असा आपला अहं म्हणतो. ते ही गंमतशीरच आहे. म्हणजे ते करता येईलच, पण त्यात “मी चालवत आहे” हा मुद्दा महत्वाचा होऊन बसला आहे, कलाव्यवहार म्हणून ते कितपत चालणार आहे असा मुद्दाही शिल्लक राहातो. नाटकाची आपण छापतो ती तिकिटं, प्रेक्षकांना नाटकाआधी किंवा नंतर आपण जसे सामोरो जातो, तिथे जे बोलतो त्या सगळ्यात आपली पराभूततेची मानसिकताच बव्हंशी छाप पाडताना दिसते का? असं मला अनेकदा जाणवतं.  आपलं नाटक लाजवट आहे. ते बुजऱ्या मुलासारखं पाहुण्यांसमोर डोळे वर करून बघायला लाजतं. अशी एक प्रतिमा मला बऱ्यापैकी सर्वत्र जाणवत राहाते.
या सर्वाचं कारण आपल्या एका मूलभूत समजात आहे. आपल्या मध्यमवर्गीय समजुतीप्रमाणे नाटक ही पुढे कुठेतरी जाण्याची पायरी आहे. नाटकात पैसे नसतातच आणि नाटक ही भिकारी कला आहे किंवा ती भीक मागायला लावते. छंद म्हणून काही वर्षं ठीक अशी ही कला आहे. वगैरे वगैरे असे जे काही आपले गैरसमज आहेत ते आपल्या समाजाच्या पैसा नांवाच्या बाबीमागे अंधपणे धावत सुटण्याचीच पडछाया आहे. पैसा हा इंधन असतो, चालक नव्हे हे आपल्याला अजून पुरेसं कळलेलं नाही. कर्ज घेणारा माणूस खरं तर आपला भविष्यकाळ निर्माण करत असतो. व्याज ही त्या भविष्यकाळ निर्मितीची किंमत असते. पण भविष्यकाळ चांगला असण्याची खात्री ठेवून ते घेणं यात शहाणपणा आहे हे न शिकवता आपण कर्ज घेणंच कसं चूक आहे हेच बिंबवत बसतो. आणि एवढं करून आपल्या पिढ्यान् पिढ्या घराच्या कर्जाचे हप्ते फेडत बँकांसाठी नोकऱ्या करत जन्म घालवण्यात खर्च होतात हे ही तितकंच खरं आहे. आपल्या अर्थशास्त्राच्या मर्यादित मध्यमवर्गीय आकलनामुळे नाटकातही त्यामुळे बुकिंग असणं म्हणजे नाटक चालणं अशी ढोबळ समीकरणं आपण टाळू शकत नाही. आपलं नाटक चालू लागण्यासाठी किती काळ आपल्याला त्याला प्रथम आधार द्यावा लागेल याचं कोणतंही ठोस उत्तर आपण मांडूच शकत नाही.
अशा सगळ्या प्रकारात एकंदर दैवाधीनतेकडेच आपला सर्वाचा कल मला सतत दिसतो. त्यामुळे दैवाधीनतेने मिळालेली प्रेक्षक श्रीमंतीही एकच माल विकत राहून शाबूत राखण्याचा असुरक्षिततेतला डाव आपण खेळत राहातो. वर्षानुवर्षं आपले अनेक कलाकार तोच खेळताना दिसत राहातात. हॉलिवूडच्या लोकांसाठी मग आपण देव्हारे रचतो आणि त्यांना तिथे मखरात ठेवलं की आपली जबाबदारी संपल्यासारखे परत आपला कोता किंवा तोकडा कलाव्यवहार करायला मोकळे होतो.
एकंदरीत, आपण आपल्या भाषेकडे या दृष्टीने लक्ष दिलं तरीही आपल्या कलाव्यवहारातल्या कितीतरी खुब्या आपल्याला जाणवू लागतील हा माझ्या या लेखनामागचा विचार आहे. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, सीक्रेट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या नांवांनी यातलं काही काही माझ्यापर्यंत नि तुमच्यापर्यंत येऊन गेलं आहे .. पण ते जेव्हा तसं ऐकलं तेव्हाही माझी आजी म्हणायची तो एक साधा शहाणपणाचा विचार मला आठवायचा.
मे महिन्याच्या सुट्टीत मी आजीकडेच असायचो. माझा रिझल्ट मी कधीच घेतला नाही. तो आई-दादा जाऊन घ्यायचे. एका कार्डावर लिहायचे आणि पोस्टाने तो यायचा, कारण आजीकडे फोन असण्याचा सवालच नव्हता. तर साधारण पांच मे पासून ते कार्ड येण्याची वाट मी पाहू लागायचो. प्रथम प्रथम मी म्हणायचो “काय असेल ? कार्डावर काय असेल?” तर आजी म्हणायची, “जे तू पेपरात लिहिलंयस तेच असेल” मग मी म्हणू लागले, “मी पेपर्स मस्त लिहिलेत, पण कार्डावर काय येतंय बघू” तर आजी म्हणायची, “हा पण नांवाचा जो शब्द आहे ना तो मनातलं काहीतरी उघडं पाडतो बरं का” पुढे मात्र मला माहित असायचं की कार्डावर काय आकडे असणारेत. मी ते आजीला सांगून ठेवलेले असायचे आणि तिने ते फडताळाच्या दरवाजावर कुठेतरी लिहून ठेवलेले असायचे. त्यात जितके आकडे तंतोतंत जुळायचे तेव्हढी आजी मला काहीतरी बक्षिस द्यायची.
“आंब्याचं झाड लावलं तर फणसाची अपेक्षा करता येते का? आणि फणस हवा, तर सोपं आहे, फणसाचं झाडं लावावं ..”
“आपण जी झाडं लावू त्यांची फुलं आपल्यावर पडणार ..”
“आपल्याकडे आंबराई असेल तर आंबा कुठे, कधी, कसा विकायचा हे आपल्याला कळायला हवं. नसेल कळत तर तसा माणूस आपल्याकडे हवा ..”
अशा साध्या साध्या वाक्यांमधून माझ्या जेमतेम चौथीही न शिकलेल्या आजीने मला हे बरचसं बेस्टसेलर ज्ञान आधीच देऊन ठेवलं होतं. माझ्या मनावरचा मध्यमवर्गीय पगडा फेकायचा अनिवार प्रयत्न करताना मला सातत्याने जाणवणारा झगडा हाच आहे. आपण आपल्याला पिढ्यान् पिढ्या उपलब्ध असलेला सामान्य शहाणपणा सोडून दिला आहे आणि साहेबाच्या राज्याला प्रतिक्रिया म्हणून आपल्यात शतकभरापूर्वी भिनवलेला सावधपणाच अजूनही “आपली” मूल्यव्यवस्था म्हणवून मिरवत बसलो आहोत.त्यामुळे पराभूत मानसिकतेच्या समाजाची भाषा आपल्या विचारधारेला दूषित करत सातत्याने आपल्या कलात्मक स्वप्नांचेही पंख कापतच बसते.
- प्रदीप वैद्य

No comments: