Wednesday, September 24

मंगल-यान

माणसे नाडती
अवघ्या सृष्टिला
रडती आम्हाला
ग्रह पीडा |

शास्त्राच्या नांवाने
ग्रह अमंगळ
दिन अनर्गळ
सांगतात |

भविष्याच्या नांवे
खिसे की कापती
कुभांडे रचती
मंत्र तंत्र |

जीवन बांधती
नित्य नशिबाला
मागल्या जन्माला
सर्व दोष |

मंगळ सदोष
दशा महादशा
शांति यज्ञ पूजा
जेथ तेथ |

भयकारी जग
अमंगळतेचे
पाप अन् पुण्याचे
माजविले |

एकिकडे यत्न
काही माणसांचा
सत्य शोधायाचा
नित्य चाले |

विज्ञानाचा मार्ग
खडतर फार
केवळ विचार
कल्याणाचा |

भय मानवाचे
करावया दूर
विज्ञान विचार
राबतो की |

प्रत्यक्षाप्रत्यक्ष
विज्ञान छेदते
प्रसंगी भेदते
कर्मकांडा |

सूक्ष्म वा विशाल
अभ्यासून तथ्य
फोडतसे मिथ्य
ज्ञान पंथ |

विज्ञान पंथाने
चौफेर निघती
याने यात्रेसाठी
अंतरिक्षी |

मंगळ ग्रहाला
लाभली की थेट
भारताची भेट
यानरूपी |

पितरांच्या दिशी
मंगळ ग्रहाला
कवेत घेतला
विज्ञानाने
|
- प्रदीप वैद्य