वड
सावित्रीची कथा पुरातन
आजही याच्या बुंध्यापाशी
घुटमळते
रणरण करता सूर्य डोईवर
जीवनदायी थंड सावली
अन् मिळते
पर्णपिसारा चहूदिशांना
सहस्रावधी किलबिल पक्षांची
घरटी
शाखा कुठल्या ? गावच अवघे
लक्ष-लक्ष चिमुकल्या जीवांची
ही वसती !
भ्रमर, किडे अन कीटक,
मुंग्या जिकडे-तिकडे
खार चिमुकली, सर्प कधी ...
वाघुळ रात्री मस्त लोंबते,
उदमांजर अन् घुबड सापडे
ढोलीमधी
संजीवन ते अविरत याच्या
पानांमध्ये, पारंब्यातुन,
मुळयात अन्
या झाडाविण झाले नाही
पूर्वीपासून पूर्ण कधी
कुठलेही वन
धर्माची धारणा इथे,
मूर्तींची स्थापना दिसे अन्
सदोदित
पारावरती वेळ काढती
कुठे टोळकी मस्त मजेशीर
गप्पात
ऋषी जणू हा, मित्र ढगांचा,
कधी मारुती दत्तात्रय
येथे वसती
बुद्ध जणू हा किंवा
येथे बलोपासना तना-मनाची
कुणी करती
मधली सुट्टी, शाळेनंतर
किंवा श्रावणमासी
पारंब्यात झुले
फळे लगडता थंडीनंतर
झाडच अवघे लालकेशरी
आणि खुले
भिती घालती कथा आगळ्या
याच्यावरती वसती म्हणती
भुते किती
देवाचे अन् झाड कधी,
पुजेत पत्री, यज्ञासाठी समिधा, का
येथून घेती ?
उभा रांगडा वृक्ष वडाचा
संस्कृतीरक्षक, अन् संजीवक
जिथे जिथे
आपोआपच अपुले मस्तक
आदरभावे अन् प्रेमाने
झुके तिथे !
No comments:
Post a Comment