Sunday, May 15

नव्या शाहिरास ..


शब्दांना चढू दे धार - थांब - बोलू नको
शस्त्रांचे पडू दे वार - बोल - थांबू नको !!

धर्मांचे अफिमी रान - पूर्ण - जाणून घे
सर्पांनी भरू दे वाट - चाल - टाळू नको !!

कष्टांची धरी जो कास - फास - त्याला इथे
रक्ताचा करी तो  घाम - त्यास - कापू नको !!

शिष्टाई कराया धूर्त - फार - येतील रे
तर्कांच्या शब्द भ्रमात - मार्ग - शोधू नको !!

युगांची जरी का वाट - तीव्र - काळोख हा !
दिव्याने जळू दे दीप - माळ - तोडू नको !!

विचारी कुणी भेटेल - आज - कोणी कुठे
सुरांना मिळू दे सूर - साथ - सोडू नको !!

अपूर्ण


पांघरूण अपुरं पडतं
नेहेमीच
जरा वर ओढलं की
पाय उघडे पडतात
आपलं चांगलेपणही
असंच
अपुरंच पडत राहातं
आपण कितीही
चांगलं वागू
चांगले होऊ
चांगले विचार करू
चांगली स्वप्नं बघू
या जगात
कोणीतरी, कुठेतरी
आपल्याला
वाईट म्हणत राहावं
अशी बेटं
उरतातच
आपल्या पांघरूणाखालून
पावलं उघडी पडावीत
तसे
आपण उघडे
पडतच राहातो !

Tuesday, April 12

पुन्हा एकदा !


सूर साधेन मी पुन्हा एकदा !
गीत गाईन मी पुन्हा एकदा !

काळजाने दिशा कशी सांडली ?
वाट चालेन मी पुन्हा एकदा !

वादळाला अता पुरा भाळलो
लाट होईन मी पुन्हा एकदा !

मीच वेडापिसा तुझ्या गावचा
मी नशा, नाद मी पुन्हा एकदा !

मी तुझ्या मागुनी कधी चाललो?
दूर जाईन मी पुन्हा एकदा !

संपलो सांडलो तुला वाटले
जीव लावेन मी पुन्हा एकदा !

सूर माझा तुझा जरी वेगळा
साथ देईन मी पुन्हा एकदा !

राख माझीच ही नका आवरू
झेप घेईन मी पुन्हा एकदा !

काजवे माजले अशी रात्र ही !
सूर्य होईन मी पुन्हा एकदा !

कापले मारले जरी का मला
येथ येईन मी पुन्हा एकदा !

पुरे


जीवना, तू नको जगायला शिकवू
हात देऊ नको, नको मला दमवू !

वेगळे सांगणे नको मला कसले
सांग साधे जरा उगा नको दिपवू !

यातना वेदना पुरे अता नसत्या
हास थोडे पुन्हा, नको सदा भिववू !

काय नाहीस तू केले कुणा अजुनी?
जीवना, थांब रे, कोणा नको थकवू !

फार ना मागणे माझे अता उरले
शांत हो, शांत हो, सारे पुन्हा सजवू !

Monday, April 4

किती !


जीवना ही तुझी कमाल किती ?
श्वास झाले तुझे सवाल किती !

दूर होतो अडून मी उरलो
पावले सांगतात हाल किती ?

मीच ज्यांची मिजास चालवली
तेच मारेकरी खुशाल किती !

हाय, धोंडे जिथे तिथे सजले
देव झालेत ते विशाल किती !

जे नको तेच सारखे जगलो
बांधले यातना महाल किती !

मीच जाईन सोडुनी दुनिया
मीच होऊ अता मशाल किती ?

जिंकलो आज मी जरी असलो
वादळे वागली विजाळ किती ?

Monday, March 28

उत्सवी उत्सवी !


आम्ही उत्सवी उत्सवी
उत्सवात रमणारे
जग मरे स्ट्रेसपायी
आम्ही मजा करणारे ।

देश अमुचा महान
त्याची तुलनाच नाही
मोजावया इतिहास
भारंभार पंचांगेही ।

इंग्रजाची कृपा त्यात
कॅलेंडरही लाभले
दिवसांना आता येथ
मोल दुहेरी लाभले ।

पारंपरिक एखादा
एक इंग्रजी दिवस
साजराही होत जावा
जशी सोय ज्यास-त्यास ।

अशा सोयीने लोकांस
दोन लाभती निमित्ते
एका घटनेचे जसे
कालरूपी दोन पत्ते ।

दोन पाने जोकराची
जशी धरावी हातात
इथे उत्सवी माणसे
नित्य असे खेळतात ।

जयंती, अथवा दिन
कुणा एका महात्म्याचा
पाळायचा हे जाणून
तारखेनं अन् तिथीनं ।

कसे पुराणाच्या काळी
इंग्रज हे नव्हतेच ?
देवदेवतांच्या भाळी
तिथी प्रत्येकी एकच ।

इंग्रजांची हीच कृपा
भक्तां लागली जाणवू
दिनविशेषाच्या झेपा
भूतकाळी धावू धावू ।

सापडता दिन ऐसे
एका जागी दोन दोन
सण दोन व्हावे तसे
दोन बाह्या सर्सावून ।

असे शेकडो महात्मे
त्यांचे दिवस दुप्पट
सोडूनिया कामेधामे
सण करूया चौपट ।

असा समाज बांधावा
जो की उत्साही उत्सवी
भूतकाळी रमवावा
पुढे फिकीर नसावी ।

उत्सवांचे बळ मोठे
राज्य चालते मजेने
खुर्ची बळकट होते
अश्या गाफील प्रजेने ।

उत्साहाचे ठोस काही
जेव्हा नुरते कारण
तेव्हा द्यावे लोकां काही
असे नवे नवे सण ।

आम्ही उत्सवी उत्साही
आम्हां नाहीत दुष्काळ
खेद नाही खंत नाही
सांगू नका काळ वेळ ।

आम्ही वापरू हे रस्ते
वेठी धरू व्यवस्थेला
आम्हां अभिमान सस्ते
जागू पुढाऱ्याच्या ताला ।

परंपरा अभिमान
रसायने उतू जाती
सदा बाळगू उरात
जशा जखमा वाहती ।

आम्ही उत्साही उत्साही
जातो वाहून वाहून
आम्ही उत्सवी उत्सवी
आम्ही बेभान बेभान ।

Thursday, March 10

खरा संवाद सुरु होताना ...

खरा संवाद संपतो तेव्हा
मी पाहातो
खरा संवाद सुरू होताना ...

तुम्ही जेव्हा माझ्याशी
संवाद टाळू लागता
तेव्हा तुम्ही
किती बोलू लागता
माझ्याशी !!

फक्त तुम्हीच नव्हे ...
म्हणजे,
तुम्ही मला टाळून सारं काही
थडग्यांमध्ये पुरून ठेवलंत
तरी ती थडगी बोलतात
माझ्याशी तुम्ही
पुरलेल्या गोष्टी
शेजारीच वाहणाऱ्या वाऱ्यामार्फत !

तुम्ही अंतर राखू पाहाता
माझ्यापासून
तेव्हा ते तुमच्या मौनाची
दूरस्थ नजरेची
भाषा घेऊन बोलतंच
माझ्याशी !

एकदा का सारं काही
उपचारार्थ होऊ लागलं
की मग
अनौपचारिकतेच्या
जाळीमागून
डोकावतोच चेहरा
अवघडल्या हास्याचा !

तुमच्या मनात
माझ्याविषयी
आस्था, मान, आपलेपणा
उरलेला नाही
हे मला सांगायचं नाही
असं ठरवता
तेव्हा तुम्ही
तेच नेमकं
सांगू लागता
अगदी
क्षणोक्षणी !!

Tuesday, February 16

नव्या शाहिरास ..


शब्दांना चढू दे धार - थांब - बोलू नको
शस्त्रांचे पडू दे वार - बोल - थांबू नको !!

धर्मांचे अफिमी रान - पूर्ण - जाणून घे
सर्पांनी भरू दे वाट - चाल - टाळू नको !!

कष्टांची धरी जो कास - फास - त्याला इथे
रक्ताचा करी तो  घाम - त्यास - कापू नको !!

शिष्टाई कराया धूर्त - फार - येतील रे
तर्कांच्या शब्द भ्रमात - मार्ग - शोधू नको !!

युगांची जरी का वाट - तीव्र - काळोख हा !
दिव्याने जळू दे दीप - माळ - तोडू नको !!

विचारी कुणी भेटेल - आज - कोणी कुठे
सुरांना मिळू दे सूर - साथ - सोडू नको !!

Sunday, January 10

जिथे तेथे

माणसे माणसे जिथे तेथे
सारखी सारखी जिथे तेथे

कोणही वेगळा कसा नाही ?
आरसे आरसे जिथे तेथे

हाय आले बघा पुन्हा आले
गारदी गारदी जिथे तेथे

धर्म स्वार्थातले अनाचारी
माजले माजले जिथे तेथे

चेहऱ्यांआड द्वेष साऱ्यांच्या
भुंकती भुंकती जिथे तेथे

मान द्यावा कुठे कुठे आता?
देवळे देवळे जिथे तेथे

माणसांच्या मनातले काही
रानटी रानटी जिथे तेथे

दूर जाणे नशीब का मानू?
अंतरे अंतरे जिथे तेथे

रानवाटांवरी निभायाचे
पारधी पारधी जिथे तेथे

ह्याच माझ्या तुझ्या खुणा काही
जागती जागती जिथे तेथे

आज मी शोधतो तुझे गाणे
सारखे सारखे जिथे तेथे

मीच श्वासांत पेरतो आहे
चांदणे चांदणे जिथे तेथे

Thursday, September 3

पूर्णविराम

हा जो जो माणूस मेला आहे
तो आपल्यासारखंच बोलत होता.

फरक हा की तो आता कधीही बोलू शकणार नाही
आपण मात्र बोलतच राहू. 
कदाचित वाट्टेल तेही बोलत राहू.

त्याच्यात आणि आपल्यात एक फरक होता
कदाचित त्या फरकामुळेच तो 
आज मेला आहे.

आणि आपण अजूनही जगत आहोत
किंवा जगू दिले जात आहोत.

फरक होता तो 
त्याच्या आणि आपल्यातला
बोलण्या-बोलण्यातला फरक !

आपलं प्रत्येकाचं बोलणं जेव्हा 
अनिवार उद्गार चिन्हांनी संपणारं असे
तेव्हा त्याचं बोलणं प्रश्नचिन्हांनी संपत असे
आणि आपल्या एकेका वाक्यात शब्दाशब्दाची वाट
अडवून जेव्हा प्रश्नचिन्हं उभी राहात असत
तेव्हा त्याची सोपी सोपी वाक्यं 
पूर्णविरामांनी विभूषित होत जात

काल कोणीतरी त्याच्या जीवनावर 
एक पूर्णविराम बिंबवून गेलं
लाल भडक रंगाचा
एक अत्यंत रागीट पूर्णविराम !

ते – ते – ते

मी बघतो – ते
मी ऐकतो – ते 
मी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो – ते
मला काही समजतं – ते
मला काही समजत नाही – ते
मी काही नव्याने मांडतो – ते
मी काही जुनं मनातून खोडून काढतो – ते
मला काही कळलंय असं वाटतं – ते
मला काहीतरी काही केल्या कळत नसतं - ते
मला माझ्यासाठी योग्य वाटतं – ते
मला मिळालं असं वाटतं – ते
मी गमावलं असं वाटतं – ते
माझं चुकलं असं वाटतं – ते
मी चकवला गेलो असं वाटतं – ते
मी बरोबर होतो असं वाटतं – ते
मी जगतोय असं वाटतं – ते
मला मी मरेन की काय असं वाटतं – ते
मला मी वाचलो असं वाटतं – ते
मला आत्मविश्वास वाटतो – ते
मला कमतरता वाटते – ते
मी जगतो – ते
मी जगत जगत काढत असतो – ते
ते, ते , ते ... ते सगळं फक्त माझं असतं
किंवा ते
आणि तेव्हढंच असतं माझ्यापाशी माझं आयुष्य म्हणून ...
किंवा 
माझं आयुष्य
म्हणजे ते ते सगळं असतं
किंवा ते ते ते सगळं तसंच असणं हेच 
फक्त माझंच आयुष्य असतं
या सगळ्यात
मी दुसऱ्याला मारून टाकणं का आणि कुठे बसतं ?

Wednesday, September 2

ट्वेन्टी-फोर बाय सेव्हन्

एक भन्नाट यंत्रणा काम करत आहे सगळीकडे
त्या यंत्रणेच्या हातात आहोत आपण सगळे
ही यंत्रणाच ठरवते तिच्या विरूध्द काही पुरावे 
कसे आणि कधी उभे करायचे ते !

हे सर्व एखाद्या रहस्यकथेसारखं चाललंय
जिचा लेखक आपल्याला सतत चकवतो
रोज नवी वळणं घेणारा एक लाइव्ह डेली सोप
आपल्या तोंडाला फेस आणणारा !

ट्वेन्टी-फोर बाय सेव्हन् आपण ह्या यंत्रणेच्या टीआरपी मीटरवर
डोळे रोखलेले आहेत हीच सगळ्यातली मोठी गंमत आहे
टीव्हीच पाहात आहोत आपण सतत सगळीकडे
कॅरेक्टर्स आणि त्यांचे थ्रेड्स् 
किंवा चॅनल्सच म्हणा ना ...

भ्रष्टाचारासाठी पकडले गेलेले संशयित असो
गोळ्या घालून पळून गेलेले किंवा पळून जाऊ शकणारे असोत
खून होऊन सूटकेसमधे बंद झालेले जमिनीखालचे मृतदेह असोत
इतिहासाची पुनर्रचना करणारे असोत
भाज्या कापल्याप्रमाणे वेगवेगळ्या माणसांची मुंडकी छाटणारे धर्मकर्मठ असोत
प्रत्येकाचा आपला चॅनल आहे
जो तो आपला टीआरपी वाढवतो आहे ...

आपण सगळेच ह्या एका
"लाइव्ह शो"मधले सहभागी लोक आहोत
कधी प्रेक्षक, कधी स्पर्धक, कधी परीक्षक ...
कधी जिंकणाऱ्यांच्या तर कधी हरणाऱ्यांच्या बाजूचे

हा एक मोठा टेलिव्हिजन शो आहे
त्याचेच तर आपण नागरिक होऊन बसलो आहोत !

Sunday, August 9

थॅन्क्यू २७८१+ !

शाळेत असताना दुसऱ्यांच्या वाढदिवसाची गणितंही खूप महत्वाची ठरायची. तेव्हा ही गणितं एखाद्याचा वाढदिवस सुट्टीच्या काळात येणं, रविवारी येणं ह्यातून येणाऱ्या एका वेगळ्याच असुरक्षिततेची असायची. लहानपणी, विशेषतः प्राथमिक शाळेत हे जास्त व्हायचं. कारण वाढदिवसाला सगळ्या वर्गाला काहीतरी वाटलं जायचं. एखादी पेन्सिल ते अगदी टिफिन कॅरियरपर्यंत भेटवस्तूपासून एखादा गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स् असं काहीही. वर्गात ५२ मुलं असायची. चारपांच किंवा अगदी दहाबारा जणांचे वाढदिवस दिवाळीच्या, नाताळच्या आणि उन्हाळी सुट्टीने खाऊन टाकले तरीही चाळीसेक वाढदिवस वर्षभरात उरायचेच. आमच्या घरात तेव्हा काही वाढदिवस जोरदार साजरा करायची प्रथा नव्हती. ते परवडणारंही नव्हतं.

केक वगैरे म्हणजे "श्रीमंती थाट" वाटणाऱ्या स्तरात मी वाढत होतो त्यामुळे माझाही समज तसाच होता. अर्थात् तेव्हा केक्स् पण सर्वत्र बनत नव्हते. जे केक्स आमच्या आजूबाजूला आम्हाला पाहायला मिळायचे किंवा आम्ही ज्यांना केक म्हणायचो त्या खरंतर पेस्ट्रीज् च्या नकला असतात हे मला पुढे आठवी नववीत कळलं. माझं सगळं शिक्षण मुंबईत झालंय. मी शाळेत असताना केक कापण्याची पध्दत खरंतर जुहू भागात किंवा वांद्रा ते अंधेरीच्या पश्चिम उपनगरात जास्त प्रकर्षाने होती. माझ्या आजूबाजूला गोल्ड स्पॉटचा नंबर या बाबतीत पहिला होता. वेफर्स, एखादा समोसा किंवा बटाटा वडा किंवा कचोरी असं काही खायला देऊन सोबत गोल्ड स्पॉट असा बेत म्हणजे काय भारी वाढदिवस !

आमच्या घरी शिरा वगैरे केला जात असे. कधी तो माझ्या अगदी जवळच्या मित्रांना किंवा जवळ राहाणाऱ्या मामाला, त्याच्या आईला म्हणजे मावशी-आज्जीला किंवा माझ्या मामेभावंडाना बोलावून त्यांच्यासह खाणं, जायफळ घातलेली कॉफी सोबत पिणं असं काही वाढदिवस म्हणून केलं जायचं. पण हे काही प्लॅन वगैरे करून होत असे असं नाही. आता जिला गटारी म्हणून लोकमान्यता जास्त मिळाली आहे त्या अमावस्येचं मला माहित असलेलं नांव "दिव्यांची अंवस" असं आहे. दीप अमावस्या हा माझा तिथीप्रमाणे वाढदिवस. (पुढे जाऊन मी हे जे वेगळे किंवा नाटकातले "दिवे" लावू किंवा "पाजळू" लागलोय ते इतकं प्लॅन्ड कसं असू शकतं नाही का?) माझा वाढदिवस बऱ्याचदा आषाढ महिना संपताना दिव्याच्या पूजेसोबत आई साजरा करत असे. त्या दिवशी शिरा, खीर असा काहीतरी चांगला स्वैपाक आई करत असे, दिव्यांच्या पूजेसोबत ती मलाही ओवाळत असे त्यामुळे, "आपला वाढदिवस एखाद्या सणाच्या दिवशी असल्याची" धन्यता मला लाभे.

माझा वाढदिवस तारखेप्रमाणे सात ऑगस्टला येतो. माझ्या वर्गात माझा एकट्याचाच वाढदिवस त्या दिवशी आहे ना ह्याची पहिल्या दिवशीच खात्री पटली की बरं वाटे. तरीही मंगेश शेटे ह्या माझ्या वर्गमित्राचा वाढदिवस आठ ऑगस्ट होता. (तो आता आमच्यात नाही म्हणून "होता" असं म्हणतोय) तर माझी आणि त्याची आई (मी प्राथमिक शाळेत असताना – तिसरी पर्यंत) "वाढदिवसाला तुम्ही काय वाटणार आहात वर्गात?" ह्याची ठरवाठरव एकत्र करत असत. ह्यात परत जुलै मधल्या इतर वाढदिवसकऱ्यांनी काय वाटलंय ह्याचा हिशेबही मिळवला जात असे. 

इयत्ता पहिलीपासूनच मी गाणारा म्हणून शाळेत प्रसिध्द होऊ लागलो होतो. मग माझ्या वाढदिवसाला माझ्या वर्गशिक्षिकांनी मला गाणं म्हणायला सांगायचं ही एक प्रथा पडली होती. मला तर मी वाढदिवसांना म्हटलेली गाणी अजून आठवतात. पहिलीत "माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो", दुसरीत "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख", तिसरीत "मयुरा रे फुलवीत ये रे पिसारा" ... अशी ही सगळी गाणी म्हणताना मी कुठे उभा होतो, आमच्या बर्वेबाईंची तेव्हाची चर्या असं सगळं मला नीट आठवतं. असो. आमच्या शाळेत मला चांगली वाटणारी एक प्रथा होती. शाळा भरताना, मधली सुटी संपताना घंटी वाजल्यानंतर एक कोणतं तरी गाणं लावलं जायचं. ते गाणं संपायच्या आत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्गांमधे पोहोचलं पाहिजे असा वकूब होता. त्यासाठीच्या ह्या रेकॉर्ड्स् शाळेत असत. शाळेचे टोल मारणारे शिपाई टर्नटेबलवर ती रेकॉर्ड ठेवून तिचा पहिला शांततेचा भाग असे त्यावेळात टोल वाजवत असत. म्हणजे त्या टोलांच्या वेळात रेकॉर्डच्या कोऱ्या भागाचे दोन चार फेरे होत आणि टोलातूनच गाणं सुरू होत असे. काही गाणी अशी शाळेत ऐकत लिहून घेऊनच मी बसवली होती. कधी कधी ओळखीच्या शिपायांना मी "आज अमुक गाणं लावा ना" अशी विनंतीवजा फर्माहिशही करत असे, ती ते बऱ्याचदा ऐकतही असत. चौथीपासून मला असं वाटू लागलं की वर्गात काही वस्तूचं वाटप करायचं सोडून आपण शाळेलाच एखादी रेकॉर्ड भेट द्यावी. मी काही हे करणारा पहिला नव्हतो. ह्यापूर्वीही लोकांनी हे केलं होतं.

आमच्या चाळीत कर्णिककाकांकडे रेकॉर्डप्लेयर होता. त्यांच्या मुली (रश्मीताई आणि ज्योतीताई) त्यावर बहुतांश इंग्लिश-हिंदी गाणी ऐकत. "अभंग तुकयाचे" आणि "शोले"च्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स त्यांची कव्हर्स हातात घेऊन ऐकत त्यांच्या घरात मी तासन्तास घालवल्याचं मला आठवतं. तर ह्या रेकॉर्ड्स पार्ल्यामधे तेव्हा इस्टर्न रेडियो इलेक्ट्रीकल्स ह्या एकाच दुकानात मिळत असत. चौथीच्या ऑगस्ट महिन्यात मी तिथे गेलो. शाळेसाठी भेट म्हणून अशी रेकॉर्ड घ्यायला. मला नाट्यसंगीत (अजूनही) आवडतं. त्याचा नाटकातला अतिरेक आता आवडत नसला तरीही संगीत प्रकार म्हणून आणि माझ्या सौंदर्यदृष्टीतला माझा महत्वाचा संस्कार-टप्पा म्हणून त्याचं मला खूप महत्व वाटतं. रामदास कामत माझ्या घरासमोर असेलल्या गोमंतक सोसायटीत राहायचे. त्यांचा मुलगा कौस्तुभ माझा चांगला मित्रही होता. तर मला त्या दिवशी रामदास कामतांची छोटी रेकॉर्ड मिळाली. त्या रेकॉर्डमधे त्यांची चार गाणी होती. "यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला" आणि "देवाघरचे ज्ञात कुणाला" ही दोन त्यात होती हे मला आठवतंय. मी ती रेकॉर्ड घेतली. छान पॅकिंग करून शाळेत दिली.

गाणारा होतो (आणि मी बऱ्यापैकी गायचोही) त्यामुळे शाळेची प्रार्थना आणि शाळा संपतानाचं वंदे मातरम म्हणायला पहिल्या मजल्यावर मी जायचो. शाळा सुटायच्या आधी पांच मिनिटं मी वर्गातून यासाठी बाहेर जायचो आणि शाळा भरली की हे म्हणून मी वर्गात यायचो. तर मी रेकॉर्ड दिली आणि शाळा भरण्याची घंटा वाजल्यावर जे गाणं लागलं ते "देवाघरचे ज्ञात कुणाला" होतं. मग आमची प्रार्थना होत असे. या कुंदेंदु तुषार हार धवला ... ही प्रार्थना झाली आणि मी वर्गाकडे गेलो. तेव्हा शाळेत सर्वांसाठी असलेल्या सूचना आमचे उपमुख्याध्यापक म्हात्रे सर देऊ लागले होते. मी वर्गात पोहोचेपर्यंत सूचना संपल्या होत्या .. त्यानंतर म्हात्रेसरांनी माझं नांव घेऊन ह्या रोज प्रार्थना म्हणणाऱ्या चौथी-एक मधल्या प्रदीप वैद्यचा वाढदिवस असल्याने आज जे गाणं लावलं होतं ते त्याने शाळेला भेट दिलेल्या रेकॉर्डमधलं होतं हे सांगितलं आणि वर्गातल्या मुलांनी टाळ्या पिटल्या तेव्हा मला मी काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटून गेलं होतं. मग वर्गशिक्षिका आंबर्डेकर बाईंनी कौतुक केलं. त्या तासाच्या शेवटी मी प्रथेप्रमाणे गाणं म्हटलं वगैरे. 

अशा वाढदिवसांपासून सुरूवात होत होत आताच्या फेसबुक-व्हॉट्सऍप वाढदिवसांपर्यंत पन्नास वर्षांपैकी हा पंचेचाळीस वर्षांचा हा प्रवास फारच छान आठवतो. पुढे वाढदिवस म्हणजे गिफ्ट्स् ! द्यायची, घ्यायची ... त्यासाठी प्लॅनिंग वगैरे करायचं. अशी एक अवस्थाही गेली. एका मैत्रिणीला "आय् ऍम ग्लॅड यू वेअर बॉर्न" असा संदेश असंलेलं जे ग्रीटिंग कार्ड दिलं होतं ते आजही आठवतंय. बाकी मग फुलं, गुलाबाची फुलं, ग्रीटिंग कार्ड्स, डेअरी मिल्क, किट-कॅट, अमूल चॉकलेट्, हॉटेलमधले डोसे-इडल्या, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, मिल्कशेक, फालुदा, फाउंटन पेन्स, गुलाम अलीच्या कॅसेट्स्, पर्फ्युम्स, डिओस्प्रेज्, सीडीज् अशा गिफ्ट्स् च्या बदलत्या रेलचेलीतून वाढदिवस होत राहिले. कॉलेजमधे आवडत्या व्यक्तींसोबत सिनेमा, भटकंती वगैरे प्रकारही ... पण ह्या सगळ्यात केक मात्र नव्हता. 

मला वाढदिवसाला केक दिसायचा तो कुडाळकरांकडे. लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीपैकी) हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ होते. आमचं त्यांच्याकडे येणंजाणंही होतं. माझी आई मोदक फार छान करते, तेव्हाही करायची, त्यामुळे आईला (मंगलावहिनींना) गणेश चतुर्थीला अगदी आग्रही आमंत्रणाने मोदक बनवायला बोलावलं जायचं. तसंच लक्ष्मीकांत (म्हणजे भाई) अर्थात् भाईकाकांच्या मुलांच्या म्हणजे टिंकू आणि चुटकीच्या वाढदिवसाला आम्हाला बोलावणं असे. भल्यामोठ्या केकचा एक भलामोठा तुकडा आम्हाला मिळत असे. त्यांचे भाऊ शशिकांत (म्हणजे दादा) अर्थात् दादाकाकांच्या मुलांच्या म्हणजे बंटी आणि राखी ह्यांच्या वाढदिवसालाही केक असे. ह्या केकचं तेव्हा आम्हाला खूप अप्रूप वाटे. त्यात अंडं असतं म्हणून आई काही तिच्या वाट्याला आलेला केक खात नसे तर तो ही आम्हालाच मिळे. एव्हढीच असली तरीही चांगली मजा होती ही. आम्हाला कधीच असं वाटलं नाही (का ते माहित नाही .. संस्कार असतील, समजूतदारपणा असेल ... काहीही असेल) की आमच्या आईबाबांनी केक आणावा, तो आम्ही कापावा इतरांना द्यावा. तेव्हा केक महागही वाटत असे ते वेगळंच. पुढे पुढे केक आमच्या आसपासही दिसू लागला. म्हणजे आमच्या चाळीतही कापला जाऊ लागला. पण आम्ही मोठे झालो होतो. आम्ही आम्ही असं मी जे म्हणतोय ते मी आणि माझी बहीण ह्या अर्थी आहे. 

असो. आश्चर्य असं की माझ्या आयुष्यात मी कापलेला माझ्या वाढदिवसाचा पहिला केक २००८ साली (बहुतेक हे साल बरोबर नसेलही पण) सात ऑगस्टलाच "मात्र-रात्र"चा प्रयोग होता, तेव्हा "सुदर्शन"मधे मी कापला होता तो ! आसक्तने माझ्या आयुष्यात हे ही आणलं. आता माझ्यासोबत दिवे लावण्याच्या माझ्या कामात गुंतलेले सगळे सहकारी मित्र दरवर्षी केक घेऊन घरी येतातच. माझ्या वाढदिवसाला केक मी कापलाच नाही असं होतच नाही. पहिला केक जसा पुण्याने मला दिला तशीच आणखी एक गंमतही आहे. ह्या आधी मी सांगितलं त्याप्रमाणे मला वाढदिवसाला ओवाळलं जायचं पण ते दिव्यांच्या अंवसेला. सात ऑगस्टला मला प्रथम कोणी ओवाळलं असेल तर ते रूपालीच्या आईने. (म्हणजे माझी सासू) आहे की नाही गंमत ?

ह्या सगळ्या प्रकारांमधून येत येत मी ह्या एकावन्नाव्या वर्षापर्यंत आलो. कालच्या दिवसात व्हॉट्सॅप, फेसबुक आणि टेक्स्ट मेसेज् ह्या सर्व मार्गांनी मला सदिच्छा देणाऱ्यांची संख्या २७८१ इतकी झाली आहे. हे खूप भारावून नेणारं आहे. आजच्या जगात (ते कितीही सहजसाध्य असलं तरीही) दुसऱ्या एखाद्या माणसासाठी ते एक मिनिट माणसं काढताहेत आणि काल इतक्या जणांकरता मी तो माणूस होतो ही गोष्ट मला माझी शिधोरी वाटते. पुढे चालत राहाण्याची शिधोरी. 

ह्या २७८१ व्यक्तींशिवाय, मला प्रत्यक्ष भेटायला आलेल्या, किंवा फोन करून बोललेल्या व्यक्ती आहेतच ... काहींनी आज बीलेटेड सदिच्छा पाठवल्या आहेत .. 

आपला वाढदिवस अशा अशा स्थित्यंतरांमधून जाताना पाहून खूपच रोमांचक वाटतंय. त्यातूनच ह्या आठवणी, हे विचार ... हे सगळं ...

Friday, August 7

सामने


आपल्याकडचे कुठल्याही प्रकारचे
काळे किंवा  रंगीत चष्मे
फेकून देण्याची वेळ आलीच !

खरा उजेड किंवा खरा काळोख
कळण्यासाठी डोळे टक्क उघडे
आणि अनावृत्तच असावे लागणार आहेत
खरा सूर्य झाकून काळरात्रीचा
किंवा
खोटे पण प्रखर दिवे लावून सूर्याचा
आभास निर्माण करणाऱ्या धूर्तांची
एक टोळी अगदी अलिकडेच
गांवात आली आहे !
आपल्या या चष्मायुक्त दृष्टीवर
पोसली जात पुष्ट झालेली एक टोळी !

ही टोळी प्रथम खेळ खेळते
खेळात गांववाले
सामील करून घेत राहाते
टोळीकडे आहेत
दोन बाजू तयार करणारे खेळ
कुणीतरी कुणाच्यातरी विरूध्द
खेळात उभं ठाकतं !
निश्चित जय - पराजयासाठी
खेळू लागलं की जास्त मजा येते
आता सतत
एकच कुणी जिंकतंय
आणि
एक कुणी हरतंय
आता नेहेमी या गांवात !

टोळीने ठरवलेलंच आहे की
या गांवात यापुढे
आता असेच खेळ खेळले
जाणार आहेत

गांववाल्यांनाही आता फक्त
असेच खेळ आवडू लागले आहेत
किंवा
लागणार आहेत
सर्वांना मजा येईल असे खेळ
कंटाळवाणे वाटू लागले आहेत

यांच्या आगमनापूर्वी
इथे निखळ खेळ असत
आता असतील
फक्त सामने !
जिंकण्या हरण्याचे
नवे नवे खेळ !!

तर
आपल्याच इतिहासाने
आपल्याच डोळ्यांवर चढवलेले
काळे किंवा रंगीत चष्मे
फेकायला हवे
नाहीतर होत राहातील
भास ऐतिहासिक भव्यतेचे
जिंकण्याहरण्याच्या या धूर्त
खेळांमधे
च् च् च्
...
माफ करा
...
सामन्यांमधे !!