Thursday, October 9

हे एक तीन अंकी नाटक ...


हे एक तीन अंकी नाटक आहे
आणि आपल्यासमोर ते नुकतंच 
पुन्हा एकदा आलं आहे

आता ते उडवीत आहेत धुरळा
एकमेकांना धूळ चारण्याच्या भाषा करीत
फिरत आहेत गावोगांव
लावत आहेत त्यांच्या सभांचे फड
दर पांच वर्षांनी
हे सगळे नट, सोंगाडे जे काही ...
ही अशी
पांच आठवड्यांची जत्रा भरवतात
आपल्याला रिंगणात गोल गोल घुमवतात
एकमेकांना धूळ चारण्याचं 
हे एक तीन अंकी नाटक सादर करतात

पहिल्या अंकात असतात
त्यांच्या बतावण्या
ज्यात ते करतात कुरघोड्या एकमेकांवर
आपण हसतो, टाळ्या पिटतो

दुसऱ्या अंकात ते देतात
चक्क आपल्याला मेन रोल ! 
एक साधं बटण दाबण्याचं सोप्पं काम 
असतं आपल्याला ... 
पहिल्या अंकाने प्रभावित होत जातो आपण
कोणाला तरी धूळ चारली जावी
म्हणून आपण घेतो तो रोल ...
दाबतो एक बटण
लावून घेतो शाई बोटावर
ते बोट मिरवीत 
आपलेच काढलेले फोटो
आपण टाकतो सोशल मिडियावर
आपण सगळे ह्या अंकाचे हिरॉइन्स किंवा हीरो होतो

तिसऱ्या अंकात कळणार असतं
कोण कोणाला धूळ चारतं ...
मतमतांतरांचा गल्बला
रणधुमाळीतली पडझड
विजया-पराजयांच्या चर्चा
या सर्वातून सावरत
तिसरा अंक आपण पाहू लागतो

सादर होतो तो तिसरा अंक मात्र
दुसऱ्या अंकाच्या मध्यंतरात बदलून टाकलेला असतो
सगळा धुरळा शेवटी खाली बसतो
आपल्याला हळू हळू शुध्द येते
आपण उठून नीट पाहायचा प्रयत्न करतो
आपल्याला आता सगळं काही 
स्पष्ट दिसू लागलेलं असतं

आपण भुईसपाट झालो होतो
सगळी धूळ आपल्यालाच चारली गेली आहे
हे आपल्या लक्षात येतं

नाटकाचा पडदा बंद होतो
ग्रीन रूममधे आता कोणालाच जाता येत नाही
पावणे पांच वर्षांनी रंग लावलेले नट
परत बाहेर पडतील तेव्हा त्यांना पकडू
ही भावना मनात ठेवून 
चरफडत, खुरडत
आपण आपल्या वाट्याला येणारं
अपमानित जिणं जगत राहातो
याच नाटकाच्या वारंवार होणाऱ्या प्रयोगात
जणू माती खाण्याचा रोल निभावण्यासाठी !

- प्रदीप वैद्य

No comments: